Within the extended framework of the Digital Translation Academy South Asia we bring you a selection of Franz Kafka's short prose pieces which have been recently translated into Persian (Farsi).
Translations into Persian (Farsi)
By Ali Abdollahi
The Iranian translator lives at present in Berlin and has little access to his notebooks and written work that he had to leave behind in his home country. The ten texts published here have been sourced as image files from his published works in Iran, namely "Icarus: An Anthology" (Doustan Publishers,Tehran, 2016, 2nd edition 2023) and "43 Stories of Love and Other Things" (Nashre Markaz publishers, Tehran, 2000, 12th edition 2023).
The Departure(Franz Kafka)
I ordered my horse to be brought form the stables. The servant did not understand my orders. So I went to the stables myself, saddled my horse, and mounted. In the distance I heard the sound of a trumpet, and I asked the servant what it meant. He knew nothing and had heard nothing. At the gate he stopped and asked: “Where is the master going?” “I don’t know,” I said, “just out of here, just out of here. Out of here, nothing else, it’s the only way I can reach my goal.” “So you know your goal?” he asked. “Yes,” I replied, “I’ve just told you. Out of here - that’s my goal.”
(English translation fragment by Tania and James Stern)
I was stiff and cold, I was a bridge, I lay over a ravine. My toes on one side, my fingers clutching the other, I had clamped myself fast into the crumbling clay. The tails of my coat fluttered at my sides. Far below brawled the icy trout stream. No tourist strayed to this impassable height, the bridge was not yet traced on any map. So I lay and waited; I could only wait. Without falling, no bridge, once spanned, can cease to be a bridge.
It was toward evening one day - was it the first, was it the thousandth? I cannot tell - my thoughts were always in confusion and perpetually moving in a circle. It was toward evening in summer, the roar of the stream had grown deeper, when I heard the sound of a human step! To me, to me. Straighten yourself, bridge, make ready, railless beams, to hold up the passenger entrusted to you. If his steps are uncertain, steady them unobtrusively, but if he stumbles show what you are made of and like a mountain god hurl him across to land.
He came, he tapped me with the iron point of his stick, then he lifted my coattails with it and put them in order upon me. He plunged the point of his stick into my bushy hair and let it lie there for a long time, forgetting me no doubt while he wildly gazed around him. But then -- I was just following him in thought over mountain and valley - he jumped with both feet on the middle of my body. I shuddered with wild pain, not knowing what was happening. Who was it? A child? A dream? A wayfarer? A suicide? A tempter? A destroyer? And I turned around so as to see him. A bridge to turn around! I had not yet turned quite around when I already began to fall, I fell and in a moment I was torn and transpierced by the sharp rocks which had always gazed up at me so peacefully from the rushing water.
A vulture was hacking at my feet. It had already torn my boots and stockings to shreds, now it was hacking at the feet themselves. Again and again it struck at them, then circled several times restlessly around me, then returned to continue its work. A gentleman passed by, looked on for a while, then asked me why I suffered the vulture. "I'm helpless," I said. "When it came and began to attack me, I of course tried to drive it away, even to strangle it, but these animals are very strong, it was about to spring at my face, but I preferred to sacrifice my feet. Now they are almost torn to bits." "Fancy letting yourself be tortured like this!" said the gentleman. "One shot and that's the end of the vulture." "Really?" I said. "And would you do that?" "With pleasure," said the gentleman, "I've only got to go home and get my gun. Could you wait another halfhour?" "I'm not sure about that," said I, and stood for a moment rigid with pain. Then I said: "Do try it in any case, please." "Very well," said the gentleman, "I'll be as quick as I can." During this conversation the vulture had been calmly listening, letting its eye rove between me and the gentleman. Now I realized that it had understood everything; it took wing, leaned far back to gain impetus, and then, like a javelin thrower, thrust its beak through my mouth, deep into me. Falling back, I was relieved to feel him drowning irretrievably in my blood, which was filling every depth, flooding every shore.
I sit in my room, the headquarter of noise of the entire apartment. All the doors I hear slamming, and by such noise I am spared only the continuous footsteps between them – still I hear the stove's door shutting in the kitchen. Our father barges through the doors of my room and crosses through and his nightgown trails behind him; the ashes are being scraped from the oven in the next room; Valli, bellowing word by word through the hall, asks if father’s hat has been cleaned already. A hiss, that wants to befriend me, still carries the scream of a responding voice. The house door is unlatched and blows open, like a catarrhal throat that opens wider with the singing of a female voice and finally closes itself with a dull, manly and most ruthless jolt. Father has gone; now begins the delicate, scattered, helpless noise led by the voices of two canaries. I had thought of that earlier, and now with the canaries it occurs to me again, whether I should open the door a crack and, like a snake, slither into the next room and beg my sisters and their governess on the ground floor for some quiet.
"ALAS," said the mouse, "the world is growing smaller every day. At the beginning it was so big that I was afraid, I kept running and running, and I was glad when at last I saw walls far away to the right and left, but these long walls have narrowed so quickly that I am in the last chamber already, and there in the corner stands the trap that I must run into." "You only need to change your direction," said the cat, and ate it up.
A man doubted that the emperor was descended from the gods; he asserted that the emperor was our rightful sovereign, he did not doubt the emperor's divine mission (that was evident to him), it was only the divine descent that he doubted. This, naturally, did not cause much of a stir; when the surf flings a drop of water on to the land, that does not interfere with the eternal rolling of the sea, on the contrary, it is caused by it.
They were given the choice of becoming kings or the kings’ messengers. As is the way with children, they all wanted to be messengers. That is why there are only messengers, racing through the world and, since there are no kings, calling out to each other the messages that have now become meaningless. They would gladly put an end to their miserable life, but they do not dare to do so because of their oath of loyalty.
(English translation by Ernst Kaiser and Eithne Wilkins)
November 30, 1917:
The Messiah will come as soon as the most unbridled individualism of faith becomes possible - when there is no one to destroy this possibility and no one to suffer its destruction; hence the graves will open themselves. This, perhaps, is Christian doctrine too, applying as much to the actual presentation of the example to be emulated, which is an individualistic example, as to the symbolic presentation of the resurrection of the Mediator in the single individual.
December 4, 1917:
The Messiah will come only when he is no longer necessary; he will come only on the day after his arrival; he will come, not on the last day, but on the very last.
Deeply lost in the night. Just as one sometimes lowers one's head to reflect, thus to be utterly lost in the night. All around people are asleep. It's just play acting, an innocent self-deception, that they sleep in houses, in safe beds, under a safe roof, stretched out or curled up on mattresses, in sheets, under blankets; in reality they have flocked together as they had once upon a time and again later in a deserted region, a camp in the open, a countless number of men, an army, a people, under a cold sky on cold earth, collapsed where once they had stood, forehead pressed on the arm, face to the ground, breathing quietly. And you are watching, are one of the watchmen, you find the next one by brandishing a burning stick from the brushwood pile beside you. Why are you watching? Someone must watch, it is said. Someone must be there.
Many complain that the words of the wise are always merely parables and of no use in daily life, which is the only life we have. When the sage says: "Go over," he does not mean that we should cross to some actual place, which we could do anyhow if the labor were worth it; he means some fabulous yonder, something unknown to us, something that he cannot designate more precisely either, and therefore cannot help us here in the very least. All these parables really set out to say merely that the incomprehensible is incomprehensible, and we know that already. But the cares we have to struggle with every day: that is a different matter.
Concerning this a man once said: Why such reluctance? If you only followed the parables you yourselves would become parables and with that rid of all your daily cares.
Another said: I bet that is also a parable.
The first said: You have won.
The second said: But unfortunately only in parable.
The first said: No, in reality: in parable you have lost.
प्रिय फ्राउलाइन बाउर
एकदाचे रात्रीचे आठ वाजले. आज रविवार आहे- मी तुम्हाला पत्र लिहू शकतोय, तरीही आज दिवसभरात मी केलेली प्रत्येक कृती तुम्हाला लवकरात लवकर पत्र लिहिण्यावरच केंद्रित झाली होती. तुमचे रविवार आनंदात जातात ना? जात असले पाहिजेत, कारण तुम्ही किती काम करता. कारण गेल्या ६ आठवड्यांपासून रविवार हा माझ्यासाठी चमत्कारासारखा असतो. त्याचा प्रकाश मला सोमवार सकाळपासूनच दिसायला लागतो. आठवड्याभराचं काम संपवून रविवारपर्यंत येणं ही एक समस्या असते. पण मी कितीही प्रयत्न केला तरी शुक्रवारपर्यंत माझी शक्ती संपून जाते. जेव्हा मी आठवड्यातले तासनतास अशा कामा घालवतो. रात्री झोप येत नसल्यामुळे दिवस आणि रात्री सारख्याच असतात. आठवड्याच्या या निर्दय चक्राकडे पाहिलं, तर एकावर एक साचत जाणारे हे दिवस कधीतरी संपतात आणि संध्याकाळ आणि रात्र अस्तित्वात असते ही किती आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर हे कामाचे दिवस अनंतकाळ सुरुच राहिले असते.
एरवी मी रविवारी आनंदात असतो. पण आज गोष्ट वेगळी आहे. पावसामुळे मला चालायला जाता आलं नाहीये. मी- कदाचित हे माझ्या पहिल्या वाक्याच्या विरुद्ध वाटेल- अर्धा दिवस बिछान्यात लोळत काढला. उदासी आणि अतिविचार यावर रामबाण उपाय. बाल्कन युद्धात तुर्कस्थानची पिछेहाट होतेय, या पार्श्वभूमीवर माझा विश्रांतीचा सल्ला चुकीचा वाटू शकेल, फक्त सैनिकांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच( हा आपल्या वसाहतींसाठीसुद्धा मोठा धक्का आहे). यात आपण डोळे बंद करुन नेहमीच्या कामात स्वतःला बुडवून घेण्यापलिकडे काही करु शकत नाही.
तुम्हाला रिझवण्याचा मी काय मार्ग शोधून काढलाय बघा! प्रिय फ्राउलाइन बाउर, मी लिहिणं थांबवून उठू का? पण हे वाचताना मी प्रत्यक्षात आनंदी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच, त्यामुळे मी इथे थांबून लिहिणं सुरुच ठेवतोय.
त्या दिवशी संध्याकाळी प्रागमध्ये किती अस्वस्थ वाटलं ते तुम्ही पत्रात लिहिलंय. त्या परिच्छेदातून असं सूचित होतंय की ती अस्वस्थता मी खोलीत प्रवेश केल्यावर निर्माण झाली असावी. तुम्ही असा स्पष्ट उल्लेख केला नसला किंवा तुम्हाला तसं म्हणायचंही नसलं तरी तोपर्यंत मॅक्सनं त्याच्या ऑपरेताचा उल्लेख केला नव्हता-त्यामुळे त्याला फारसा त्रास झाला नाही किंवा चिंता वाटली नाही- आणि मी माझ्या हास्यास्पद अस्तित्वामुळे पार्टीची रंगत बिघडवली नव्हती. शिवाय त्या दिवसांत मी तिथे नेहमी जायचो आणि मला ओट्टो ब्रॉडला झोपायला जाण्यापासून परावृत्त करणं आवडायचं-कारण मी तेव्हा खूप उत्साही होतो-मी त्याला एवढा वेळ थांबवून ठेवायचो, की अख्खं ब्रॉड कुटुंब एकत्र येऊन मी तिथून निघून जावं यासाठी (आपुलकीनंच, अर्थात) प्रयत्न करायचं. त्यामुळे माझं एवढं उशीरा-त्यावेळी रात्रीचे ९ वाजून गेले असावेत- तिथे येणं त्यांना धोक्याचं वाटलं असणार. त्यांच्यासमोर दोन अगदी वेगळे पाहुणे होते. एक तू, जिच्याशी सगळ्यांचं चांगलं मत होतं आणि सौजन्यानं वागायचं होतं, तर दुसरा मी झोपेत विघ्न आणणारा सराईत. तुझ्यासाठी पियानोवादन झालं आणि माझ्यासाठी ओट्टो शेकोटीतल्या आगीत काहीतरी सारवासरव करत राहिला. माझ्यासाठी ती झोपेची वेळ झाल्याची अधिकृत सूचना होती. अर्थात,ज्यांना त्या कृतीचा अर्थ कळला नाही, त्यांना ती एक मूर्ख आणि दमवणारी कृती वाटली असणार हे नक्की. खरंतर तिथे कुणी पाहुणा असेल अशी माझी अपेक्षाच नव्हती. मी फक्त मॅक्सला भेटायला रात्री आठ वाजता (मी नेहमीप्रमाणे तासभर उशीरा पोहचलो) आलो, कारण मला त्याच्याशी माझ्या कथांच्या क्रमाविषयी चर्चा करायची होती. त्याकडे मी तोवर लक्ष दिलं नव्हतं. खरंतर, कथासंग्रहाचं हस्तलिखित दुसऱ्याच दिवशी सकाळी पाठवायचं होतं.[1]तशात तिथे मला तुम्ही दिसल्यामुळे मी जरा वैतागलोच. मात्र, तुम्हाला तिथे पाहून मी चकित वगैरे झालो नाही. आपली ओळख व्हायच्या आधी मोठ्या टेबलावरुन मी तुमच्यासमोर हात पुढे केला, पण तुम्ही फक्त जरासं उठल्यासारखं केलं, कारण माझ्याशी हात मिळवण्याची तुमची अजिबात इच्छा नसावी. मी तुमच्याकडे पाहिलं, बसलो आणि सगळं ठीक आहे असं मला वाटलं. एरवी परिचित अवकाशात अनोळखी व्यक्तीला पाहून माझ्यात जो उत्साह संचारतो, तो तुम्हाला पाहून मला जाणवला नाही. माझ्या कथासंग्रहाचं हस्तलिखित मॅक्सबरोबर तपासायचं राहून गेलंय, ही वस्तुस्थिती एकदा स्वीकारल्यानंतर थालियाचे फोटो बघणं हे सुखद विषयांतर ठरलं. (आता मी तुमच्यापासून एवढा लांब असल्यामुळे त्यावेळच्या मनस्थितीचं वर्णन करणारा तो शब्द वापरल्याबद्दल मी स्वतःला शिव्या देऊ शकतो.) तुम्ही त्या फोटोंचं अगदी गांभीर्यानं निरीक्षण करत होता. ओट्टो त्याविषयी काही सांगायचा किंवा मी तुला दुसरा फोटो द्यायचो, तेव्हाच फक्त तुम्ही नजर उचलून वर पहायचात. आपल्या दोघांपैकी कुणीतरी, नेमकं कोण ते आता मला नेमकं आठवत नाही, फोटोविषयी काहीतरी बोललं तेव्हा विनोदी गैरसमज झाला. त्या फोटोंकडे बघताना तुम्ही जेवायच्या थांबलात आणि जेव्हा मॅक्स जेवणाविषयी काही बोलला, तेव्हा तुम्ही म्हणालात की, सतत खात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त घृणास्पद तुला काही वाटत नाही. या सगळ्यामध्ये (आता खरंतर बरेच तास उलटून गेलेत, रात्रीचे ११ वाजलेत, या वेळी एरवी माझं लेखन सुरु होतं. पण आज मला हे पत्र सोडून उठवत नाही) घंटा वाजली. त्या वेळी तुम्ही आम्हाला ‘द ऑटोगर्ल’ [2] या ऑपरेटाच्या सुरुवातीच्या प्रसंगाविषयी सांगत होतात. तुम्ही तो रेसिडेन्झ थिएटरमध्ये पाहिला होतास.(थिएटरचं नाव बरोबर आहे का? आणि तो खरंच ऑपरेटा होता का?) तिथे आपण १५ जण होतो. मागच्या खोलीतून टेलिफोनचा आवाज यायचा तेव्हा कोणीतरी येऊन आपल्यापैकी प्रत्येकाला एकाच नावानं हाक मारुन आळीपाळीनं फोन घ्यायला सांगायचं. ते नाव कोणतं ते मला चांगलं आठवतंय, पण मला त्याचा उच्चार नक्की ठाऊक नाही, मग ते लिहिणं तर दूरच, मला ते आत्ता सांगायला लाज वाटतेय. पण त्या वेळी मी ते स्पष्ट ऐकलं, एवढंच नाही तर तुमच्या ओठांच्या हालचालींवरुन त्याचा उच्चारही समजून घेतला. मधल्या काळात ते बऱ्याचदा माझ्या डोक्यात घोळत होतं आणि मी त्याची व्युत्पत्ती शोधत होतो. यानंतर (नाही, खरंतर या आधी, कारण मी दाराजवळ बसलो होतो, तुमच्या अगदी समोर) संभाषण निंदानालस्ती आणि नातेवाईंकावर कसं घसरलं ते आठवत नाही. मी कधी ज्यांची नावंही ऐकली नव्हती अशा तुमच्या अनेक नातेवाईकांचा उल्लेख झाला.त्यात ’फेरी’ हे नावही होतं (तो तुमचा भाऊ असेल का?). लहानपणी आपण भावंडांकडून नेहमी भरपूर मार खायचो, असं तुम्ही म्हणालात (त्यात श्री. फ्रीडमनसुद्धा होते का?). तुम्हाला त्या वेळी अगदी असहाय्य वाटायचं असंही तुम्ही सांगितलं. तुम्ही डाव्या दंडावरुन हात फिरवला. त्या काळात तो ओरखड्यांनी भरलेला असायचा. पण तुम्हाला कधीच स्वतःची कीव कराविशी वाटली नाही. मी जरी हे खात्रीपूर्वक सांगू शकत नसलो, तरी तुम्हाला मारण्याची हिंमत कोणी कशी करु शकतं हे मला कळलं नाही, त्यावेळी तुम्ही कितीही लहान असलात तरी. मग तुम्ही काहीतरी वाचताना किंवा बघताना सहज म्हणालात (तुम्ही फारसं वर पाहिलं नाही, कारण पार्टी खूपच कमी वेळ चालली) की तुम्ही हिब्रू शिकला आहात. त्यावेळी मला एकीकडे तुमचं कौतुक वाटलं (ही सगळी त्या वेळी तयार झालेली मतं आहेत आणि आता ती काळाच्या चाळणीतून गाळून निघाली आहेत) आणि दुसरीकडे मला असंही वाटलं की तुम्ही एवढ्या सहज जाता जाता अतिशयोक्तीपूर्ण बेफिकिरीत ते सांगायला नको होतंस. म्हणून मग तुम्हाला जेव्हा ‘तेल अविव’ या शब्दाचा अर्थ सांगता आला नाही तेव्हा मला कुठेतरी सूक्ष्म आनंद झाला. -नंतर जेव्हा तुम्ही झिओनिस्ट असल्याचा उल्लेख झाला तेव्हा मला बरं वाटलं-त्याच वेळी तुमच्या नोकरीविषयीही चर्चा झाली. कु.ब्रॉडनं तुमच्या हॉटेलच्या खोलीत अतिशय तलम ड्रेस पाहिल्याचं सांगितलं. बहुतेक तेव्हा तुम्ही बुदापेश्तमध्ये एका लग्नाला गेला होतात (मी आठवण्यापेक्षा अंदाजच जा्स्त करतोय)- तुम्ह उठलात तेव्हा कु.ब्रॉडच्या स्लिपर्स घातल्या होत्या, कारण तुमचे बूट वाळायचे होते. दिवसभर अतिशय खराब हवामान होतं त्या दिवशी. त्या स्लीपर्सचा तुम्हाला थोडा त्रासच झाला, कारण आपल्याला उंच टाचांच्या स्लीपर्स घालायची सवय आहे, असं तुम्ही मधल्या खोलीतून जाताना मला सांगितलं.- संगीत कक्षात तुम्ही माझ्या समोर बसला होता आणि मी माझ्या हस्तलिखितावर सगळ्यांची मत घेत होतो. ते प्रकाशकाकडे कसं पाठवायचं याविषयी प्रत्येकानं मला मजेशीर सल्ले दिले, पण तुम्ही नेमकं काय म्हणालात ते मला आठवत नाहीये. मला दुसऱ्या खोलीत काय झालं ते आठवतंय आणि ते मला एवढं आवडलं की टेबलावर हात आपटला होता. तुम्हाला हस्तलिखितांच्या प्रती तयार करायला आवडतात आणि बर्लिनमध्ये कोणा सभ्य गृहस्थासाठी (या शब्दाचा नाद मला अजिबात आवडत नाही, विशेषतः त्यासोबत नाव आणि अर्थ नसतो तेव्हा) तुम्ही हे काम करत होता असं तुम्ही सांगितलं. तुम्ही मॅक्सला काही हस्तलिखितं पाठवायलाही सांगितली.- त्या रात्री मी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती केली असेल, तर पॅलेस्टिनाची[3] प्रत जवळ बाळगणं. त्यासाठी मला शंभर गुन्हे माफ व्हायला हवेत. त्यावेळी पॅलेस्टाईनच्या प्रवासाविषयी चर्चा झाली आणि तेव्हा कुठे तुम्ही माझ्याशी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला किंवा खरंतर मी तो करायला लावला- पियनोवादनाच्या वेळी मी नेमका तुमच्या मागे बसलो होतो; तुम्ही पायावर पाय टाकून बसला होतात आणि वेळोवेळी आपल्या केसांमध्ये हात घालत होतात, ते मला पुढून नीट दिसलं नसतं. पियानो वाजत असताना तुमचे केस दोन्ही बाजूंनी बाहेर निघाल्याचं मला चांगलं आठवतं.- नंतर सगळेजण विखुरले. कु.ब्रॉड सोफ्यावर डुलकी घ्यायला लागली, श्री. ब्रॉड बुकशेल्फमधली पुस्तकं चाळण्यात गुंतून गेले. ओट्टो शेकोटीतल्या आगीशी चाळा करायला लागला. मॅक्सच्या पुस्तकांविषयी चर्चा झाली, तुम्ही अरनॉल्ड बिअरविषयी[4] काही बोललात आणि ‘ऑस्ट उन्ड वेस्ट’[5] मधल्या परीक्षणाचा उल्लेख केलात.शेवटी ग्यथंच्या साहित्याच्या प्रॉपायलियन प्रतीची पानं चाळताना, आपण ‘नॉर्निपिग्गं कासल’[6] (Nornepygge Castle) वाचायला सुरुवात केली, पण ते संपवू शकलो नाही असं तुम्ही म्हणालात. हा अभिप्राय ऐकून मी भीतीनं गोठून गेलो- माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. हा अनावश्यक अपमान नव्हता का? तरीही तुम्ही एखाद्या नायिकेसारख्या त्या बिकट परिस्थितीतून बाहेर आलात. आम्ही पुस्तकावर वाकलेल्या तुमच्या डोक्याकडे बघत राहिलो. नंतर असं निष्पन्न झालं की तो अपमान नव्हता किंवा सौम्य टीकाही नव्हती, तर तुम्हाला स्वतःलाच चकित करणारं एक साधं तथ्य होतं, त्यामुळे तुम्ही ती कादंबरी नंतर पुन्हा एकदा वायचायचं ठरवलंत. त्या वेळी निर्माण झालेलं अवघडलेपण याहून जास्त चांगल्या रितीनं निवळणं शक्य नव्हतं. तेव्हा आम्हा सर्वांनाच स्वतःची जरा लाज वाटली.- मग विषयांतर करण्यासाठी ब्रॉडसाहेबांनी प्रॉपायलियन प्रतीची सचित्र आवृत्ती बाहेर काढली कारण तुम्हाला ग्यथंचं अंडरवेअरमधलं चित्र दाखवण्याचा त्याचा विचार होता. त्यावेळी तुम्ही म्हणालात, ‘तो अजून राजाच आहे, अंडरवेअरमध्ये असला तरी,’’ त्या रात्री मला न आवडलेली ही तुमची एकमेव गोष्ट. त्यानं मी एवढा अस्वस्थ झालो, की माझ्या घशात आवंढा आला. खरंतर मला त्यात एवढं गुंतण्याचं काय कारण आहे, असं मी स्वतःला विचारायला हवं होतं. पण मी एवढा सुसंगत कधीच नसतो.-तुम्ही ज्या वेगानं खोलीतून बाहेर पडलात आणि बूट घातले, त्यानं मी भांबावून गेलो.पण त्या वेळी कु.ब्रॉड हिनं तुमची दोनदा हरिणीशी केलेली तुलना काही मला आवडली नाही.- तुम्ही तुमची हॅट कशी घातली आणि त्यात हॅटपिन्स कशा खोवल्या ते मला अजून लख्ख आठवतंय. ती हॅट जरा मोठी आणि आतल्या बाजूला पांढरी होती.- बाहेर पडल्यावर मी लगेच माझ्या नेहमीच्या अर्ध-तंद्रीत गेलो. त्या स्थितीत मला स्वतःच्या निरुपयोगितेशिवाय काहीच जाणवत नाही. परग्लासंपर्यंत पोहचल्यावर तुम्ही, माझी अवघडलेली शांतता भंग करण्यासाठीच बहुतेक, मी कुठे राहतो याची चौकशी केलीत. साहजिकच, तुमच्या हॉटेलकडे जाण्याचा मार्ग आणि माझा घरचा रस्ता एकच आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं होतं. पण मी तुम्हाला माझा पत्ता हवाय का, असं जातीवंत मूर्खपणानं विचारलं, कारण माझी अशी समजूत झाली की, तुम्ही नुकत्याच बर्लिनमध्ये परतल्यामुळे आणि पॅलेस्टाईनला जायच्या कल्पनेमुळे उत्साहात असल्यामुळे, तुम्हाला लगेच मला पत्र लिहावंसं वाटेल. त्यामुळे माझा पत्ता नसल्यामुळे तुम्हा बेचैन झाला आहात ही कल्पनाच मला सहन झाली नाही. या गोंधळामुळे मी रस्ता संपेपर्यंत अस्वस्थ होतो, हे सांगायची गरज नाही. खरंतर, माझ्या आत आणखी अस्वस्थ व्हायला जागाच शिल्लक नव्हती म्हणा.- त्यादिवशी ब्रॉडच्या घरात आणि नंतर रस्त्यावर चालताना तुम्ही तुमच्या प्राग ब्रँचमधल्या कुणा माणसाचा उल्लेख केलात. तो तुम्हाला त्या दुपारी घोडागाडीतून ऱ्हाडचॅनी किल्ल्यात घेऊन गेला होता. या माणसाच्या अस्तित्वामुळे मला दुसऱ्या दिवशी दुपारी स्टेशनवर तुम्हाला फुलं देऊन निरोप देणं अशक्य होऊन बसलं. खरंतर,त्याबद्दल मी काही काळ विचार करत होतो. तुम्ही लवकर निघून गेलात आणि त्या वेळी फुलं विकत घेणं मला शक्य नव्हतं, त्यामुळे तो विचार सोडून देणं मला सोपं गेलं.- ऑब्स्टगास्सं आणि ग्राबेनमध्ये ब्रॉडसाहेबच जास्त बोलत होते. त्यावेळी तुम्ही एक किस्सा सांगतलात की तुम्ही टाळ्या वाजवल्यावर तुमच्या आईनं कसं दार उघडलं. या गोष्टीबद्दल मला तुम्हाला बरंच काही विचारायचं आहे. प्रागमधल्या रहदारीची बर्लिनशी तुलना करता, हा सगळा वेळ फुकटच गेला. मी जर चुकत नसेन, तर तेव्हा तुम्ही तुमच्या हॉटेलसमोर असलेल्या रिप्रेझेन्टेशन हाउसमध्ये न्याहारी केल्याचाही उल्लेख झाला. शेवटी श्री. ब्रॉड यांनी तुम्हाला तुमच्या प्रवासाविषयी सल्ला दिला आणि जिथे तुम्हाला काही खाता येईल अशा काही स्थानकांची नावं सांगितली. तुमचा ट्रेनमध्येच न्याहारी करण्याचा विचार होता. त्यावेळी तुम्ही ट्रेनमध्ये छत्री विसरल्याचं मी ऐकलं. हा तपशील क्षुल्लक (माझ्या दृष्टीनं) वाटला, तरी त्यामुळे तुमची माझ्या मनातली प्रतिमा ठळक झाली.- तुम्ही अद्याप सामानाची बांधाबांध केलेली नाही आणि रात्री झोपण्यापूर्वी वाचन करण्याचा तुमचा विचार आहे, हे ऐकून मी अस्वस्थ झालोय. काल रात्री तुम्ही पहाटे चारपर्यंत वाचत बसला होतात. वाचण्यासाठी तुम्ही ब्यॉर्नसनचं ‘फ्लॅग्स आर फ्लाइंग इन टाऊन अँड हार्बर’ आणि अँडरसनचं ‘पिक्चर बुक विदाऊट पिक्चर्स’ आणलंय. तुम्ही ही पुस्तकं आणाल याचा अंदाज मला यायला हवा होता, कारण मला ती कधीच आणत आली नसती.
हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर मला विचित्र अवघडलेपण जाणवलं. त्यामुळे मला तिथल्या तुमच्या बाजूच्या फिरत्या प्रवेशद्वारात अडकायला झालं आणि मी जवळजवळ तुमच्या पायावर पाय दिला.- मग आपण तिघं लिफ्टजवळ वेटरसमोर काही वेळ उभे राहिलो. तुम्हाला लगेच त्या लिफ्टमध्ये शिरुन लगेच अदृश्य व्हायचं होतं आणि तिचं दार उघडलं होतं. मग तुम्ही त्या वेटरशी त्रोटक आणि दांभिक संभाषण केलंत. त्याचा नाद, मी जरा थांबलो तर, मला अद्याप ऐकू येतो. जवळच्या स्टेशनला जाण्यासाठी कारची गरज नाही, हे तुम्हाला पटवून देणं सोपं नव्हतं. आपल्याला फ्रान्त्झ योजेफ स्टेशनला जायचंय असं तुम्हाला वाटत होतं. मग आपण एकमेकांचा निरोप घेतला, आणि शक्य तितक्या वेंधळेपणानं पुन्हा एकदा पॅलेस्टाईनला जाण्याचा विषय काढला. तेव्हा माझ्या अचानक लक्षात आलं, की त्या संपूर्ण संध्याकाळी या ट्रिपबद्दल, जी फक्त मीच गांभीर्यानं घेतली होती, मी खूपच जास्त वेळा बोललो.
काही क्षुल्ल्क, बिनमहत्वाच्या गोष्टी सोडून त्या संध्याकाळी घडलेल्या या सगळ्या बाह्य घटना मला आठवतात. त्यानंतर मी ब्रॉड कुटुंबाबरोबर कदाचित आणखी तीस संध्याकाळी घालवल्या असतील, त्यामुळे ती संध्याकाळ काहीशी पुसट झालीय. त्या संध्याकाळी तुमच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, या तुमच्या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी मी या आठवणी लिहिल्या. शिवाय, त्या आठवणी विसरण्याआधी लिहून काढण्याची इच्छा मी बराच काळ दाबून ठेवली होती. पण मी एवढा कागद बरबरटून काढलेला पाहूनच कदाचित तुम्ही निराश व्हाल. आधी, तुम्ही मला हे लिहायला भाग पाडणाऱ्या उद्गारांना दोष द्याल, मग हे सगळं वाचावं लागतंय म्हणून स्वतःला. कदाचित, थोड्या क्षीण उत्सुकतेनं तुम्ही हे सगळं शेवटपर्यंत वाचाल. तोपर्यंत तुमचा चहा अगदी थंडगार झालेला असेल. नंतर तु्म्ह तुमच्या सगळ्यात आवडत्या गोष्टीची शपथ घ्याल, की काहीही झालं तरी माझ्या आठवणींना पूरक अशा तुमच्या आठवणी तुम्ही सांगणार नाही. मात्र, आठवणींच्या प्राथमिक नोंदीपेक्षा त्यांना पुस्ती जोडायला कमी त्रास पडतो असं तुम्हाला वाटणार नाही आणि तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्यामुळे हे वाचताना तुम्हाला झाला त्यापेक्षा कितीतरी जास्त मला आनंद होईल.- पण आता मात्र खरंच मी तुम्हाला एकटं सोडायला हवं, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो.
तुमचा फ्रान्त्झ के.
अजून संपलं नाही. उलट जास्तच अवघड प्रश्न विचारायचाय: चॉकलेट खराब न होता जास्तीत
[1] काफ्काच्या ‘मेडिटेशन्स’( Meditations) या कथासंग्रहाचा संदर्भ
[2] या ऑपरेटाचं खरं नावं ‘द ऑटो स्वीटहार्ट’ (The Auto Sweetheart) असं आहे.
[3] पॅलेस्टाईन मधल्या ज्यू लोकांविषयी व्हिएन्नामधून निघणारं मासिक
[4] मॅक्स ब्रॉडची कादंबरी
[5] एक दैनिक. यात ऑगस्ट १९१२ मध्ये ब्रॉडच्या कादंबरीचं परीक्षण छापून आलं होतं.
[6] मॅक्स ब्रॉडची कादंबरी
प्रिय कु. फेलिस
मी तुम्हाला असं नावानं संबोधल्याचा राग येणार नाही अशी आशा आहे. किमान या वेळी तरी. याचं कारण असं की, मला स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहायला तुम्ही सांगितलं आहे आणि काही नाजूक गोष्टींबद्दल बोलातना मी ‘’फ्राऊलाईन बाऊर’’ हे संबोधन वापरणं मला अवघड वाटतं. शिवाय, हे नवं संबोधन तितकं वाईटही नाही, त्याशिवाय ते वापरताना मला एवढं दीर्घकाळ टिकणारं समाधान मिळालं नसतं.
माझं आयुष्य पहिल्यापासूनच लिहिण्याच्या प्रयत्नांनी व्यापलेलं आहे. यातले बहुतेक प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. पण मी जेव्हा लिहित नसतो, तेव्हा मी पूर्ण निरुपयोगी आणि अगदी कचऱ्यात फेकून द्यायच्या लायकीचा असतो. माझी शक्ती आधीपासूनच अगदी क्षीण आहे; त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की, माझ्या लेखनाच्या मुख्य उद्दीष्टासाठी शक्ती शिल्लक ठेवायची असेल तर बाकी सगळ्या गोष्टींपासून मी स्वतःला लांब ठेवायला हवं, प्रत्येक गोष्टीतला थोडा भाग सोडून द्यायला हवा. मी जेव्हा असं करत नाही (अगदी जेव्हा मी ड्यूटी ऑफिसर म्हणून काम करतो अशा सुटीच्या दिवशीसुद्धा अजिबात निवांतपणा नसतो.चिमुकल्या नरकाचं दार उघडल्यासारखं सतत कुणी ना कुणी भेटायला येतच राहतं.) आणि माझ्या शक्तीच्या मर्यादेपलिकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी आपसूकच जखमी, लीन आणि कायमचा अशक्त होऊन मागे ढकलला जातो; तरीही मला तात्पुरती दुःखी करणारी ही गोष्टच मला दीर्घकाळासाठी बळ देत असते आणि जिथ शांतपणे जगता येईल अशी जागा कुठेतरी सापडेलच असं मला वाटायला लागतं. मग ती शोधणं कितीही अवघड असो. लेखनासाठी मी ज्यांचा त्याग केला आहे अशा गोष्टींची विस्तृत यादी मी एकदा तयार केली. त्या यादीत लेखनासाठी माझ्याकडून हिरावल्या गेलेल्या आणि ज्यांचं हिरावलं जाणं फक्त अशा स्पष्टीकरणातून सुसह्य होईल अशा गोष्टींचाही समावेश होता.
मी कृश आहे, किंबहुना माझ्या परिचयातल्या व्यक्तींपैकी सगळ्यात कृश माणूस मीच असेन.(यात तथ्य आहे कारण मी सॅनॅटोरियम पाहिलेलं आहे), शिवाय माझ्यासाठी लेखनाशी संबंधित कोणतीही गोष्ट ज्याला अतिरिक्त म्हणता येईल अशी नाही. इथे मी अतिरिक्त हा शब्द ओसंडून वाहणारा या अर्थाने वापरतो आहे. जर एखाद्या उच्च शक्तीला मला माध्यम म्हणून वापरायची इच्छा असेल किंवा ती मला माध्यम म्हणून वापरत असेल, तर मी पूर्णपणे एक साधन म्हणून तिला शरण आहे. असं जर झालं नाही तर मी अगदी नगण्य असेन आणि एका भयाण पोकळीत फेकला जाईन.
आता तुमच्याविषयीच्या विचारांना सामावण्यासाठी मी माझ्या आयुष्याचा विस्तार केलाय. तुझी आठवण येत नाही असा माझ्या जागृत अवस्थेचा एकही क्षण नसतो. मग बराच वेळ मी तुम्हाला आठवण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. पण याचा संबंधही शेवटी माझ्या लेखनाशीच आहे, माझं आयुष्य माझ्या लेखनातल्या चढ-उतारांशिवाय काहीही नाही. जेव्हा मी काही लिहित नसतो, तेव्हा मला तुमच्याशी बोलायची हिंमत होत नाही. हे अगदी खरं आहे. शिवाय, हेही तितकंच खरं आहे की त्या संध्याकाळीनंतर माझ्या छातीत एक असा मार्ग उघडल्यासारखा मला वाटतोय ज्यातून सतत ये-जा सुरु असते. एका रात्री या जाणीवेमुळे झोपताना मला बायबलमधील कथा आठवली आणि त्याच वेळी या कथेची सत्यताही मला पटून गेली.
अलिकडे तुमचा माझ्या लेखनाशी किती जवळचा संबंध निर्माण झाला आहे, हे लक्षात येऊन मी चकित झालो. माझ्या हेही लक्षात आलं की फक्त लिहितानाच मला तुमची आठवण येत नाही. मी लिहिलेल्या छोट्या परिच्छेदात तुमच्याशी आणि तुमच्या पत्रांशी संबंधित पुढील संदर्भ होते: कुणीतरी कुणाला तरी चॉकलेट देतं. काम करताना कुणाचं तरी लक्ष भरकटण्याविषयी कुणीतरी बोलतं. मग फोन येतो. नंतर कुणीतरी कुणाला तरी झोपायला जायची विनंती करतं आणि त्या व्यक्तीने तसं केलं नाही तर तिला तिच्या खोलीत घेऊन जाण्याची धमकीच देतं.- याचा थेट संबंध तुम्ही उशीरापर्यंत ऑफिसमध्ये काम केल्यामुळे तुमच्या आईच्या वैतागण्याशी आहे.- असे परिच्छेद मला विशेष प्रिय आहेत, कारण त्यातून मी तुमच्या नकळत तुमचा ताबा घेत असतो, त्यामुळे तुम्ही मला विरोधही करु शकत नाही. तुम्ही माझं लेखन वाचलंत तरी हे छोटे तपशील तुमच्या नजरेतून निसटतील. पण माझ्यावर विश्वास ठेवा, जगात कुठेही तुम्ही एवढ्या निर्धोकपणे स्वतःला दुसऱ्याच्या ताब्यात सोपवू शकणार नाही.
माझ्या आयुष्याची रचना मी पूर्णपणे लिहिण्याला केंद्रस्थानी ठेवून केलेली आहे. त्यात काही बदल झालेच, तर ते फक्त लेखनच्या अनुकूलतेसाठीच होऊ शकतात. कारण वेळ कमी आहे, माझी शक्ती मर्यादित आहे, ऑफिस ही एक भीषण गोष्ट आहे आणि घरात नेहमी कोलाहल असतो. त्यामुळे जर आनंदी, सरळसोट आयुष्य शक्य नसेल, तर माणूस त्यात काही सूक्ष्म बदल करुन जगण्यासाठी त्यातल्या त्यात कमी त्रासदायक मार्ग शोधून काढतो.
अश्या काही युक्त्या करुन दैनंदिन वेळापत्रक मनाजोगतं करुन घेण्यातलं समाधान, लेखनातून येणारा थकवा काहीही बोलण्यापेक्षा जास्त असतो हे कळण्यातून येणाऱ्या खिन्नतेच्या तुलनेत टिकत नाही. गेल्या सहा आठवड्यांपासून, असह्य थकव्यामुळे येणारा अशक्तपणा आणि त्यामुळे पडणारा खंड वगळता, माझं वेळापत्रक असं आहे: सकाळी ८ ते दुपारी २ किंवा २.३० ऑफिसमध्ये, मग ३ ते ३.३० जेवण, त्यानंतर बेडरुममध्ये झोप (खरंतर झोपण्याचा फक्त प्रयत्न: कारण गेला आठवडाभर मी झोपेत फक्त मॉन्तेनिग्रो लोकच पाहिले. तेसुद्धा अगदी अशक्य स्पष्टपणे. त्यांच्या कपड्यांच्या बारीकसारीक तपशिलांसह. त्यामुळे माझं डोकं दुखायला लागलं) ७.३० ला झोपून उठलं की दहा मिनिटं कपडे काढून खिडकीजवळ व्यायाम, मग तासभर चालणं- एकट्याने, मॅक्सबरोबर किंवा दुसऱ्या एखाद्या मित्राबरोबर. नंतर कुटुंबियांसह रात्रीचं जेवण.(मला तीन बहिणी आहेत. एकीचं लग्न झालंय, एकीचं ठरलंय आणि मला सगळ्यांविषयी प्रेम असलं, तरी तिसरी अविवाहित बहीण माझी सर्वाधिक लाडकी आहे) मग १०.३० वाजता (बऱ्याचदा ११.३० पर्यंत) मी लिहायला बसतो आणि माझी ताकद, कल आणि नशीबानुसार रात्री १, २ किंवा ३ वाजेपर्यंत लिहित राहतो. एकदा तर पहाटे ६ वाजेपर्यंत लिहिणं सुरु होतं. मग पुन्हा वर दिल्याप्रमाणे व्यायाम, अर्थात दगदग टाळून. मग आंघोळ. नंतर हृदयात किंचित वेदना आणि पोटाच्या स्नायूंचा पीळ यांसह झोपण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न. म्हणजेच, अशक्य ते शक्य करणं. कारण मी झोपू शकत नाहीच.(श्री. के यांची तर स्वप्नरहित झोपेची अपेक्षा असते). त्याचवेळी डोक्यात कामाचे विचारही येत असतात आणि एका निरुत्तर प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही सुरु असतो, तो म्हणजे, उद्या तुमचं पत्र येईल का? आलंच तर किती वाजता? त्यामुळे रात्रीचे सरळ दोन भाग पडतात: एक जागपणाचा आणि दुसरा निद्रानाशाचा. या विषयी जर मी तुला सांगायचं ठरवलं आणि तुझी ऐकायची तयारी असली, तर ही कहाणी कधीच संपणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम सुरु करण्यासाठी माझ्याकडे अगदी थोडीच शक्ती शिल्लक असते, हे वेगळं सांगायला नको. माझ्या टायपिस्टकडे मी ज्या कॉरिडॉरमधून जातो तिथे फायली आणि कागदपत्रांची ने-आण करण्यासाठी कॉफिनसारखी दिसणारी एक ट्रॉली ठेवलेली आहे. तिच्यासमोरुन मी जेव्हा जातो तेव्हा ती मलाच नेण्यासाठी ठेवलीय आणि माझी वाट बघतेय असं मला वाटतं.
नेमकेपणानं सांगायचं तर, आपण फक्त कारकून नाही, तर कारखानदारही आहोत हे मी विसरता कामा नये. कारण माझ्या मेव्हण्याचा ॲस्बेस्टॉसचा कारखाना आहे आणि मी (अर्थात फक्त माझ्या वडिलांनी त्यात गुंतवलेल्या पैश्यांमुळेच) त्यात भागीदार आहे. त्यामुळे मी संचालक मंडळावर आहे. या कारखान्यामुळे आधीच पुरेसा त्रास आणि काळजी माझ्या वाटेला आलेली आहे. पण मला आत्ता त्याविषयी बोलायची इच्छा नाही. असंही, मी कारखान्याच्या कामाकडे बराच वेळ शक्य तेवढं दुर्लक्ष केलेलं आहे (म्हणजे मी माझं निरुपयोगी सहकार्य केलेलं नाही) आणि ते तसं चालूनही गेलं आहे.
पुन्हा एकदा मी तुला किती कमी सांगितलं आणि तुझी काहीच चौकशी केली नाही. आता मला थांबलं पाहिजे. पण एकही प्रश्न आणि त्याहून महत्वाचं म्हणजे, एकही उत्तर वाया जाणार नाही. दोन माणसं एकमेकांना न भेटता, एकमेकांशी न बोलता, एकमेकांच्या भूतकाळाविषयी बरंच काही जाणून घेऊ शकतात, तेही एका क्षणात, एकमेकांना सगळं न सांगता ही काहीतरी जादू असली पाहिजे. हा, खरंतर, काळ्या जादूचा प्रकार आहे (वाटत नसला तरी). काळ्या जादूचं अपेक्षित फळ मिळत असलं, तरी कुणी शक्यतो निरागसपणे त्या वाटेला जात नाही. त्यामुळे तू अंदाज केल्याशिवाय मी ते स्वतःहून सांगणार नाही. जादूच्या सगळ्या मंत्रांसारखा हासुद्धा अगदी लहान आहे.
आता मी निरोप घेतो आणि तुझ्या लिहित्या हातावर रेंगाळत राहून माझ्या शुभेच्छा अधिक बळकट करतो.
तुझा, फ्रान्त्झ के.
प्रियतम फेलिस, ही वाईट कथा बाजूला ठेवून मी पुन्हा एकदा तुझ्या आठवणींनी ताजातवाना होण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत कथा अर्ध्याहून जास्त लिहून झालीय आणि एकूण तिच्याबद्दल मी तसा असमाधानी नाही. पण मला ती खूप कच्ची वाटतेय. या सगळ्या गोष्टी तुझं वास्तव्य असलेल्या आणि तू निवासस्थान म्हणून स्वीकारलेल्या माझ्या हृदयातूनच उत्पन्न होतात. पण याविषयी फारसा विषाद बाळगू नकोस कारण मी जेवढं लिहीन तेवढा मुक्त होत जाईन आणि तेवढा जास्त तुझ्यायोग्य बनेन असं मला वाटतं. खरंतर अजून अशी बरीच ओझी उतरवायची आहेत. या अतिशय आनंददायक कामासाठी रात्रीचा वेळ नेहमीच अपुरा असतो.
आता मी झोपण्याआधी (आता पहाटेचे ३ वाजलेत. खरंतर मी रात्री १ वाजेपर्यंतच लिहितो, तुझा माझ्या गेल्यावेळच्या पत्रांपैकी एकावरुन काहीतरी गैरसमज झाला असावा, मला दुपारचे ३ म्हणायचं होतं. तेव्हा मी ऑफिसमध्ये थांबून लिहित बसलो होतो) माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला तुझ्या कानात सांगायचंय, कारण तुझी तशी इच्छा आहे आणि ते अगदी सोपं आहे. माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे फेलिस, की तू जर माझ्याजवळ असलीस, तर मला कायमचं जगावसं वाटेल, पण फक्त निरोगी आणि तुझा समतुल्य माणूस म्हणूनच. तर हे असं आहे सगळं. तुला ते माहित असलं पाहिजे. हे चुंबनाच्याही पलीकडचं असं काही आहे. त्या चुंबनाची आठवण आली की मला दुसरं काहीही न करता तुझा हात हळुवार थोपटत रहावंसं वाटतं. म्हणूनच मी तुला ‘प्रियतमे’ म्हणून न संबोधता फक्त ‘फेलिस’ म्हणणार आहे आणि प्रिय न म्हणता फक्त ‘तू’ म्हणणार आहे. पण खरंतर माझ्या आयुष्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी तुझ्याशी जोडायच्या असल्यामुळे तुला प्रियतमासुद्धा म्हणायला मला आवडेल. थोडक्यात, मला तुला काहीही म्हणायला आवडतंच.
रविवार [२४ नोव्हेंबर १९१२] दुपारच्या जेवणानंतर
दोन पत्रं! दोन पत्रं! कोणत्याही रविवारची अशी सुरुवात होऊ शकत नाही. पण आता, प्रिय फेलिस,तू मला केवळ माफच केलं नाहीस, तर मला समजूनही घेतल्यामुळे, आपण आता शांत राहून आणखी अडचणी निर्माण न करता एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. माझ्या पत्रांनी तुला जिंवंत आणि आनंदी वाटायला लावण्याएवढा मी सशक्त असतो तर किती बरं झालं असतं. पण दुर्दैवाने मी अशक्त असल्यामुळे तुला दुःखी आणि रडवेलं करुन ठेवलं बघ. मी तुला आनंदी ठेवू शकेन असं मला वाटत होतं. पण ते शक्य झालंच तर, तू माझी मैत्रीण असल्याच्या समाधानामुळे आणि तुझ्यासारख्या व्यक्तीवर अवलंबून असण्यामुळे.
पण प्रियतमे, कृपया, मी तुला विनंती करतो, यापुढे रात्री लिहू नकोस; तुला झोपेच्या मोबदल्यात लिहावी लागलेली ही पत्रं मी आनंद आणि दुःखाच्या संमिश्र भावनेतून वाचतो. त्यामुळे पुन्हा असं करुन नकोस; शांत झोप घे, तुला त्याची गरज आहे; तू अद्याप जागी आहेस हे ठाऊक असताना मी नीट लिहू शकत नाही. पण तू झोपली आहेस हे कळल्यावर मी जास्त हिंमतीने लिहितो; कारण तेव्हा तू निरोगी झोपेतल्या असहाय्यतेतून स्वतःला माझ्यावर सोपवलं आहेस आणि मी तुझ्यासाठी आणि तुझ्या भल्यासाठी काम करतोय ही जाणीव मला असते. असे सुंदर विचार असतील तर माझ लेखन चांगलं का होणार नाही! त्यामुळे झोप घे, झोप घे, तू दिवसा माझ्यापेक्षा किती जास्त काम करतेस याचा विचार कर. उद्या न चुकता झोपी जा; झोपायच्या वेळी पत्रं लिहू नकोस. माझी इच्छाशक्ती पुरेशी तीव्र असेल, तर तू आजही तसं करणार नाहीस. मग झोपायच्या वेळी तू तुझा ॲस्पिरिनच्या गोळ्यांचा साठा खिडकीतून बाहेर फेकून दे. तर मग, आता रात्री उशीरा लिहिणं बंद. ते माझ्यावर सोड. रात्री केलेल्या लेखनाचा अभिमान वाटण्याची पुसटशी संधी मला दे. तुझ्यासमोर अभिमान वाटेल अशी ही एकच गोष्ट आहे. त्याशिवाय मी अगदी अगतिक होऊन जाईन आणि तुलाही ते आवडणार नाही. पण जरा थांब, जगात सर्वत्र, अगदी चीनमध्येसुद्धा, रात्रीचं लेखन हे पुरुषांचं काम आहे हे सिद्ध करण्यासाठी मी पुस्तकांच्या कपाटाकडे जाऊन (ते शेजारच्या खोलीत आहे) तिथल्या एका पुस्तकातून एक छोटी चिनी कविता उतरवून काढतो. तर ही ती कविता (माझे वडील त्यांच्या पुतण्यासोबत किती गोंगाट करतायत!): ही कविता लिहिलीय युआन झू साई या कवीने. त्याच्याविषयी मला ही टिप्पणी सापडली: ‘’अतिशय प्रतिभावंत आणि लहान वयात प्रगल्भ झालेला कवी. सरकारी नोकरीत उज्ज्वल कारकीर्द. माणूस आणि कवी म्हणून असामान्य बहुमुखी प्रतिभेचा धनी.” ही कविता समजण्यासाठी चिनी लोक झोपण्यापूर्वी झोपण्याच्या जागी अत्तर शिंपडतात हे माहित असणं आवश्यक आहे. कविता कदाचित जराशी अयोग्य वाटू शकेल, पण तिच्या सौंदर्यानं या अयोग्यतेची पुरेपूर भरपाई केलीय असं मला वाटतं. तर ही आहे कविता:
रात्रीच्या शांततेत
या थंड रात्री पुस्तक वाचताना
मी विसरलो झोपायची वेळ.
अत्तर केव्हाच उडून गेलंय
जरीचं विणकाम केलेल्या चादरीवरुन.
शेकोटीतील आगही गेलीय विझून.
माझी सुंदर प्रिया, जिने आतापर्यंत मुश्किलीने ताबा ठेवलाय
रागावर, हिसकावून घेते दिवा आणि विचारते,
‘’तुला माहितीय का किती उशीर झालाय ते?’’
या कवितेचा संपूर्ण आस्वाद घ्यायला हवा. या कवितेमुळे मला तीन गोष्टींची आठवण होतेय, पण मी त्यांच्यातला संबंध शोधण्याच्या फंदात पडणार नाही. सर्वप्रथम, तू मनापासून शाकाहारी आहेस याचा मला खूप आनंद झाला.मला कडक शाकाहारी माणसं फारशी आवडत नाहीत, कारण मी स्वतःही शाकाहारी आहे आणि मला शाकाहारात फारसं काही आवडण्याजोगं दिसत नाही. तो फक्त नैसर्गिक असतो एवढंच. जे लोक मनातून शाकाहारी असतात, पण आरोग्याच्या कारणामुळे किंवा ते खाण्याविषयी उदासीन असल्यामुळे किंवा ते खाण्याला फारसं महत्व देत नसल्यामुळे असेल, मांसाहार करतात किंवा पुढ्यात जे येईल ते विनातक्रार खातात ते मला आवडतात.
खरंतर, माझं तुझ्यावरचं प्रेम इतक्या लवकर वाढत गेलं, की तुझ्या खाण्याच्या सवयीवर प्रेम करण्यासाठी माझ्या हृदयात जागाच उरलेली नाही. तुलाही माझ्यासारखं खिडकी उघडी ठेवून झोपायला आवडतं ना? वर्षभर? अगदी हिवाळ्यातसुद्धा? अगदी पूर्ण खिडकी उघडी ठेवून? यात तू माझ्याही पुढे गेलीस. मी हिवाळ्यात खिडकीला अगदी जराशीच फट ठेवतो. माझ्या खिडकीबाहेर मोठा रिकामा जमिनीचा तुकडा आहे, त्यापलिकडे मॉल्डाऊ नदी आणि नदीपलिकडच्या चढानंतर सार्वजनिक बागा. त्यामुळे आमच्याकडे भरपूर खेळती हवा, वारा आणि थंडी असते. त्यामुळे तू इमानुएल-कर्ख मार्गावरची तुझी खिडकी जरी उघडी ठेवत असलीस, तरी मी राहतो तशा ठिकाणी तू खिडकी उघडी ठेवली असतीस याची खात्री नाही. याशिवाय मी आणखी एका गोष्टीत तुला हरवलंय: माझ्या खोलीत उष्णता निर्माण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तरीही मी इथेच लेखन करतो. आत्ताच माझ्या एक गोष्ट लक्षात आली (मी खिडकीजवळच बसलोय): आतली खिडकी सताड उघडी आहे, बाहेरची किंचित लोटलेली आहे आणि खालच्या पुलाचा कठडा आच्छादलेला आहे बर्फानं नव्हे, तर पांढऱ्या गोठलेल्या दंवानं. आता तू या बाबतीत माझ्याशी स्पर्धा करुन दाखव!
तुझ्या मैत्रिणींनी केलेली कविता अप्रतिम आहे. मी ती परत पाठवत असलो, तरी एक प्रत मी स्वतःकडे ठेवलीय. पण तुझ्या त्या फ्राउलाईन ब्र्यूल या मैत्रिणीनं तुला ‘फॉन’ ही उपाधी असलेला नवरा मिळावा, किंबहुना त्याला तुझ्यासारखी बायको मिळावी अशा ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यासाठी मी तिला पुढील शिक्षा करणार आहे: आज रात्रीपासून रोज, प्रत्येक रात्री,थेट तिच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत पूर्ण वर्षभर, दोन वेडे मॅनेजर तिच्याकडे येऊन डावीकडे एक आणि उजवीकडे एक असे उभे राहतील आणि एकाच वेळी मध्यरात्रीपर्यंत अखंड पत्र डिक्टेट करत राहतील. आता फक्त ती एवढ्या चांगल्या कविता लिहिते म्हणून, तू तिची रदबदली केलीस तरच अर्थात, मी ही शिक्षा सहा महिन्यांपर्यंत कमी करायला तयार आहे. पण तुला ती आवडते आणि ती एवढ्या चांगल्या प्रकारे स्वतःचं मनोरंजन करत असते, म्हणून मी क्राट्झाउमधून (ते राइखेनबर्गमागे डोंगरावर आहे) तिला एक छानसं चित्रमय पोस्टकार्ड पाठवणार आहे. तिथे मला दुर्दैवानं उद्या जावं लागतंय. त्या पोस्टकार्डावर मी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून सहीशिवाय असं लिहून घेईन: ‘’अभिनंदन! पण कोणाकडून बरं?’’ मला तुला हे बऱ्याच दिवसांपासून विचारायचं होतं आणि सारखं माझ्या डोक्यातून निघून जायचं की तू एवढी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं कशी वाचू शकतेस? तुझ्या दैनंदिन टपालात ती येतात असं तू आपल्या दुसऱ्या पत्रात म्हटलं होतंस. तू कितीतरी पुस्तकांचा उल्लेख करुन त्यातही शेवटी ‘इत्यादि’ लावलंस. असं असेल तर, म्हणजे मला ते नीट समजलं असेल तर, आपण आपल्या दोघांमध्ये एक नवी देवाणघेवाण सुरु करु शकतो. तू स्पर्श केलेल्या खूप जास्त गोष्टींना मी स्पर्श करु शकत नाही आणि माझा संबंध असलेल्या खूप जास्त गोष्टी मी तुलाही पाठवू शकत नाही. विविध वर्तमानपत्रांमधल्या कोणत्या ना कोणत्या कारणानं मला चकित करुन गेलेल्या, माझ्यावर परिणाम करणाऱ्या आणि मला दीर्घकाळ महत्वाच्या वाटलेल्या गोष्टींची कात्रणं काढून ठेवायचं मी बरेच दिवस ठरवतोय, पण फक्त आळसामुळे मला अजून ते करता आलेलं नाही. कदाचित या बातम्या इतरांना फारश्या महत्वाच्या वाटणारही नाहीत. उदा. ही अलिकडची बातमी:’’युगांडामध्ये २२ कृष्णवर्णीय ख्रिश्चन तरुणांना मरणोत्तर ‘स्वर्गीय’ उपाधी प्रदान’’(ही बातमी मी अलिकडेच वाचली आणि ती सोबत जोडतोय). असं काहीतरी मला रोज वर्तमानपत्रांमध्ये सापडतं. जणू त्या बातम्या फक्त माझ्यासाठीच छापल्या असाव्या. पण त्यांची कात्रणं काढून बाजूला ठेवण्याचा संयम माझ्याकडे नाही, मग संग्रह करणं वगैरे तर दूरच. पण तुझ्यासाठी मी ते आनंदाने करायला हरकत नाही आणि तुला जर ते आवडलं, तूही माझ्यासाठी तसं करु शकतेस. काही बातम्या अशा असतात, की त्या प्रत्येकासाठी नसून फक्त काही लोकांसाठीच असतात, त्यात इतरांना काही विशेष दिसत नाही. तुला आवडलेल्या अश्या बातम्यांना मी माझ्या कोणत्याही संग्रहापेक्षा जास्त महत्व देईन. माझा संग्रह मी तुला असाही कोणत्याही पश्चात्तापाशिवाय पाठवणार आहेच. पण मी काय म्हणतोय ते लक्षात आलं ना? फक्त रोजच्या वर्तमानपत्रातली छोटी कात्रणं, दैनंदिन घटनांसंबंधी असलेल्या बातम्यांची. त्यात मासिकांमधील कात्रणं अगदी अपवादनेच असतील. माझ्यासाठी तू सुंदर मासिकांचे तुकडे करावेस असं मला वाटत नाही. असंही मी फक्त ‘प्रागर टागब्लाट’ हे एकच मासिक वाचतो. तेही वरवर. इतर मासिकांमध्ये फक्त ‘नॉय रुन्डशाउ’ आणि ‘पॅलॅस्टिना’. तेही त्यांनी आता मला पाठवणं बंद केलंय. माझी वर्गणी सुरु असली तरीही.(कदाचित आपण भेटलो त्या रात्री मला एक प्रत देऊन आपण इतर वर्गणीदारांना जे देतो त्यापेक्षा खूप जास्त दिलंय, असं त्यांना वाटत असावं.- आणि ते बरोबर आहे). तुझा कात्रणांचा संग्रह सुरु करण्यासाठी योग्य असं कात्रण मी तुला पाठवतोय. एका भीषण खटल्याचं.
आता मी माझ्या क्राटझाउच्या भेटीविषयी सांगितल्यावर एक दमवणारा विचार मला डोक्यातून काढता येत नाहीये. मी लिहित असलेली छोटी कथा उद्यापर्यंत नक्की पूर्ण झाली असती, पण आता मला उद्या संध्याकाळी ६ वाजता निघावं लागणार आहे. रात्री १० वाजता मी राइखेनबर्गला पोहचेन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता क्राटझाउला कोर्टात जाण्यासाठी निघेन. या काहीश्या गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या केसमध्ये मी असा मूर्खासारखा वागणार आहे, की अश्या कामासाठी यापुढे मला कोणीही पाठवणार नाही. असंही, मंगळवारी दुपारी ४ वाजता मी प्रागमध्ये परतणार आहे आणि थेट ऑफिसमध्ये जाणार आहे. तिथे जर तुझं पत्र आलेलं असलं(पण मी अजिबात चिंता करणार नाही, मुळीच नाही) तर मी समाधानी असेन, नसलं तर शांत राहीन. मग तिथून मी सरळ घरी जाऊन झोपेन. जर ही योजना यशस्वी व्हायची असेल, तर मला क्राटझाउमध्ये कोर्टातलं काम ३ तासांत आटपावं लागेल. त्यामुळे तिसऱ्या तासाच्या अखेरीस मी हळूहळू बेशुद्ध पडेन, जेणेकरुन मला स्टेशनवर नेऊन ठेवलं जाईल. माझ्या सहीऐवजी कोर्टाच्या कामकाजात पुढील गोष्ट नमूद केली जाईल: ‘’वर्कर्स ॲक्सिडंट इन्शुरन्स इन्स्टिट्यूटचा( कंपनी नाही, लक्षात घे) प्रतिनिधी बेशुद्ध पडल्यामुळे त्याला कोर्टातून घेऊन जावं लागलं.’’ असं झालं तर मला ट्रेनमध्ये किती हायसं वाटेल आणि मी प्रागकडे कशी धाव घेईन याची कल्पना कर.
प्रिय फेलिस, मला अजून कितीतरी सांगायचंय आणि कितीतरी प्रश्न विचारायचेत, पण खूप रात्र झालीय आणि मला थांबलं पाहिजे. नेहमीप्रमाणे या रविवारी मी बाउमला भेटायला गेलो होतो (तुला ऑस्कर बाउम माहितीये का?). तिथे मी माझ्या छोट्या कथेचा पहिला भाग वाचून दाखवला. (तिथे मॅक्सही आला होता, होणाऱ्या बायकोबरोबर). नंतर एक मुलगी तिथे आली. तिला पाहिल्यावर मला थोडीशी तुझी आठवण झाली.(तुझी आठवण होण्यासाठी मला फार काही करावं लागत नाही). मी मंत्रमुग्ध झालो. मग तुमच्यातलं किंचित साम्य पुरेसं पाहून झाल्यावर मला खिडकीजवळ जाऊन बाहेर बघत रहायचं होतं. शून्यात. फक्त तुझ्या आठवणींत बुडून जायचं होतं.
माझं आईशी खूप छान नातं आहे. आमच्यात आता एक समाधानकारक नातं निर्माण होतंय. रक्त एक असण्याचा अर्थ उलगडतोय. तिला तू आवडतेस असं दिसतंय. तिने तुला पत्रही लिहिलंय, पण मी तिला ते पाठवू देणार नाही ते नको इतकं नम्र आहे. अशा पत्राची मी कदाचित त्या वाईट रात्री मागणी केली असती आणि ते फारसं योग्य ठरलं नसतं. मला वाटतं, लवकरच ती तुला एक शांत मित्रत्वाचं पत्र लिहील.
मग तू मला तुझा फोटो पाठवणार नाहीस तर? आणि त्या दिवशी कुणालाही ‘’ ह्यूमर’’चा फोटो काढावासा वाटला नाही? अशी संधी गमावली म्हणजे कमालच आहे त्या लोकांची. कर्मचाऱ्यांचे ग्रुप फोटो नाहीत का? ऑफिसची किंवा फॅक्टरीची दृश्य दाखवणारे फोटो? इमॅन्युएल-कर्खस्ट्राशं? फॅक्टरीचं एखादं माहितीपत्रक? बरं, तुमच्या प्रागमधल्या शाखेचा पत्ता? तुझ्या कामाचं स्वरुप काय आहे? मला तुझ्या ऑफिसविषयीचा लहानात लहान तपशील जाणून घ्यायचा आहे(माझ्या ऑफिसच्या अगदी उलट). तू किती आकर्षक घोषवाक्यं वापरतेस! तू रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करतेस का? ते नेमकं आहे तरी काय? तू दोन मुलींना एकाच वेळी कसं डिक्टेट करु शकतेस? तू तुझ्या ऑफिसविषयी काही रोचक गोष्टी मला पाठवल्यास तर मी माझे लेख असलेले माझ्या इन्स्टिट्यूटचे वार्षिक अहवाल तुला पाठवीन.
आणि आता मी तुला निरोपादाखल जवळ घेतो.
प्रियतम फेलिस,
मी लिहिता लिहिता पुन्हा खूप उशीर झालाय. रोज पहाटे २ वाजता मला त्या चिनी विद्वानाची आठवण येते. पण दुर्दैवानं त्याच्यासारखी माझी प्रेयसी मला बोलवत नाही, तर तिला लिहायचं असलेलं पत्र मला हाक मारतं. मी लिहित असताना तुला माझ्या शेजारी बसायला आवडेल असं तू एकदा म्हणाली होतीस. ऐक, असं झालं तर मला लिहिता येणार नाही (असंही मी फार लिहित नाहीच), पण तसं झालं तर मला अजिबातच लिहीता येणार नाही. कारण लिहिणं म्हणजे स्वतःला जे अतिरिक्त आहे त्यासमोर खुलं करणं, ती अत्युच्च आत्मप्रगटीकरण आणि शरणीगती आहे. त्यात माणूस जर इतरांमध्ये गुंतलेला असेल तर त्याला स्वतःला गमावण्याती भीती वाटेल आणि त्याचं डोकं ठिकाणावर असेपर्यत तो त्यापासून दूर पळेल-कारण आपण जिवंत असेपर्यंत प्रत्येकालाच जगायचं असतं- अगदी त्या पातळीचं आत्मप्रगटीकरण आणि शरणागतीसुद्धा लिहिण्यासाठी पुरेशी नसते. अस्तित्वाच्या फक्त पृष्ठभागावरुन येणाऱ्या लेखनाला काही अर्थ नसतो. जेव्हा लेखनाचा दुसरा काही मार्ग नसतो आणि सगळ्या विहीरी कोरड्या पडतात तेव्हाच अशाप्रकारचं लेखन होतं. जेव्हा एखाद्या सच्च्या भावनेमुळे हा पृष्ठभाग हादरतो तेव्हा असं लेखन लगेच कोसळतं. त्यामुळे लेखक लिहिताना कधीच पुरेसा एकटा नसतो, लिहिताना त्याच्याभोवती कधीच पुरेशी शांतता नसते, अगदी रात्रही पुरेशी रात्र नसते. त्यामुळे लेखकाच्या हाताशी कधीच पुरेसा वेळ नसतो, कारण रस्ते लांब असतात आणि वाट चुकण्याची भीती असते. ज्यावेळी लेखकाला भीती वाटते आणि परत फिरण्याची तीव्र इच्छा होते अशाही वेळा येतात, अगदी कोणतंही बंधन आणि मोह नसेल तरीही. अर्थात, नंतर अशा इच्छेची कडक शिक्षाही मिळते. आपल्या सगळ्यात आवडत्या ओठांकडून चुंबन मिळणार असेल तर असं परत फिरण्याची जास्तच इच्छा होते. मला नेहमी असं वाटतं, की माझ्यासाठी सगळ्यात चांगलं आयुष्य कुठलं, तर जेव्हा मी एखाद्या ऐसपैस कोठडीच्या अगदी आतल्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं असेल आणि माझ्याकडे फक्त माझं लेखनसाहित्य आणि एक दिवा असेल. अन्न आणून माझ्या खोलीपासून खूप लांब, कोठडीच्या सगळ्यात बाहेच्या दाराबाहेर ठेवलं जाईल. रोज ड्रेसिंग गाऊन घालून बंद कोठडीतून त्या अन्नापर्यंत चालत जाणं हाच माझा व्यायाम. मग मी माझ्या खोलीत परतेन. अगदी सावकाश विचार करत जेवेन. मग लगेच पुन्हा लिहायला सुरुवात. मग मी काय काय लिहिन, किती खोलवर आतून ते बाहेर येईल! अगदी सहज! कारण अतीतीव्र एकाग्रता साधल्यावर लेखनासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. अडचण अशी आहे की, ही अशाप्रकारे मी फार काळ लेखन करु शकणार नाही आणि पहिलं अपयश आलं-ते अगदी अशा परिस्थितीतही टाळणं शक्य नाही म्हणा- की मला वेडाचा मोठा झटका येईल. तुला काय वाटतं प्रियतम फेलिस, तुझ्या या कोठडीत राहणाऱ्यासाठी गप्प बसू नकोस.
फ्रान्त्झ
असं लिहू नकोस, फेलिस. तुझं चुकतंय. आपल्यात काही गैरसमज आहेत. ते मला कोणत्याही किंमतवर आत्मविश्वासाने दूर करायचेत. कदाचित, पत्राने ते शक्य होणार नाही. मी बदलेलो नाही (दुर्दैवानं), आपल्या दोघांमधला समतोल, त्यातला मी अस्थिर भाग आहे, तसाच आहे; ओझं दुसरीकडे सरकणं हाच काय तो जरासा बदल; मी आपल्या दोघांनाही ओळखतो असं मला वाटतं. आता माझ्यासमोर एक तात्पुरतं उद्दीष्ट आहे. आपणं जर व्हिटसनला भेटलो तर तिथे त्याविषयी बोलता येईल. येऊ घातलेली व्यवस्था आणि अस्वस्थता यांचं मला असह्य आणि घृणास्पद ओझं वाटत नाही असं समजू नकोस. मला अगदी सगळं भिरकावून द्यावसं वाटतंय. मला थेट पद्धत जास्त योग्य वाटते. मी आता आनंदी नसेन असंही समजू नकोस. मी माझ्या छोट्या जवळच्या वर्तुळात आनंदी आहे आणि इतरांना आनंद देऊही शकतो.
पण हे शक्य नाही. मला हे ओझं सक्तीनं सहन करावं लागतंय, मी असमाधानानं थरथरतोय, माझं अपयशसुद्धा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघतं. फक्त अपयशच नाही, तर सगळ्या आशेचा ऱ्हास आणि अपराधी भावनेचा स्थिर रोखसुद्धा. मी इतर कोणत्याही प्रकारे वागू शकत नाही. खरंच फेलिस, इथे प्रागमध्ये आपल्याला एकत्र राहता येईल असं तुला का वाटतं? तुला खरंच काही वेळा असं वाटत असावं असं दिसतं. आधी तुला याविषयी गंभीर शंका होत्या. त्या कशामुळे मिटल्या? हे मला अजून समजलेलं नाही.
आणि त्या पुस्तकातल्या ओळी. त्या वाचून मला वाईट वाटतं. काहीच संपलेलं नाहीये. अंधार नाही, थंडी नाही. पण मला हे लिहायला भीती वाटतेय. कारण, अशा गोष्टी खरंच लिहिल्या जाऊ शकतात याची ती पुष्टी आहे. किती भीषण गैरसमज साचायला लागलेत पुन्हा.
ऐक फेलिस, फक्त एकच गोष्ट बदललीय, ती म्हणजे माझी पत्रं. ती कमी झालीयत आणि त्यांचं स्वरुप बदललंय. मी आधी वारंवार लिहिलेल्या आणि आतापेक्षा वेगळ्या पत्रांचा काय परिणाम झाला? तुला माहित आहेच. आपण पुन्हा नव्यानं सुरुवात केली पाहिजे. या ‘आपण’ मध्ये तू येत नाहीस. कारण तुझ्या एकटीच्या संदर्भात विचार केला तर तू नेहमीच बरोबर होतीस.[1] त्यामुळे इथे ‘आपण’ म्हणजे मी आणि आपल नातं. पण अशी नव्यानं सुरुवात करण्यासाठी पत्र पुरेशी नाहीत; आणि जर त्यांची गरज असलीच- आणि ती आहेच- तर ती वेगळी असली पाहिजेत. अगदी मुळातून वेगळी, फेलिस. तुला मी फ्रँकफर्टला सुमारे दोन वर्षांपूर्वी वर्षाच्या याच काळात लिहिलेली पत्रं आठवतात? माझ्यावर विश्वास ठेव, मी सध्या पुन्हा तशी पत्रं लिहिण्याच्या मनस्थितीत आहे. ती माझ्या पेनाच्या टोकावर वाट बघत थांबलीयत. पण मी ती लिहिणार नाही.
मी सैन्यात भर्ती होणं माझ्यासाठी चांगलं असेल हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? फक्त माझ्या तब्येतीनं साथ दिली पाहिजे. आणि चांगल्या गोष्टी एकमेकांना दिल्या पाहिजेत. दुःखं नव्हे. (तू बहुतेक हे ‘सालाम्बो’मध्ये लिहिलं होतंस, मला खात्री नाही, पण तू ते ‘एज्युकेशन’मध्ये लिहिलं असणं शक्य नाही.[2]), मला खात्री आहे तब्येत मला साथ देईल. मला या महिनाअखेर किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला बोलावणं येईल. माझी निवड व्हावी अशी आशा कर, कारण माझी तशी इच्छा आहे.
मग आपण व्हिटसनमध्ये भेटू. मला अजून तुझं पत्र आलं नाही हे दुर्दैव. बोडेनबाखला यायला तुझी थोडी जरी हरकत असली, तर मी पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि तुला भेटेन, गरज असेल तर बर्लिनमध्येही.
ते चरित्र तुझी विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी किंवा प्रभावित करण्यासाठी पाठवलं नव्हतं; माझा तो हेतू नव्हता. पण ते चरित्र वाचण्यासारखं आहे. स्वतःचा बळी द्यायला ते किती उत्सुक आहे आणि तसं घडतंसुद्धा! जिवंतपणीच खरी आत्महत्या आणि पुनरुत्थान. बलिदान असतं कशासाठी? त्यातलं यश, पु्स्तकाबाहेरसुद्धा, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतं, हे किती वाचकांना कळेल? तू ते वाचतेयस याचा मला आनंद आहे. मुझ्झी टेबलाशेजारचा नळ उघडते त्याचा तुला फारसा त्रास होत नसेल अशी आशा आहे.
तुम्हा दोघींनाही माझ्या शुभेच्छा.
फ्रा
[1] फ्लोबेरच्या dans le vrai चा संदर्भ
[2] ‘सालाम्बो’ आणि ‘द सेन्टिमेन्टल एज्युकेशन ‘या फ्लोबेरच्या कादंबऱ्या फेलिसनं काफ्काला पाठवल्या होत्या.
प्रियतम फेलिस,
आत्ताच तुझं पत्र वाचलं, खरंतर अनेकदा वाचलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ते वाचल्यावर आपली परिस्थिती किती भीषण आहे याची मला कल्पना आली. पत्र वाचल्यावर मी लगेच माझ्या टेबलासमोर बसणाऱ्या सहकाऱ्याकडे पाहिलं. या जरा विचित्र, पण छान माणसाबद्दल मी तुला आधी सांगितलं असणारच. आपण एकमेकांना ‘अरेतुरे’ करायला हवं असं मी त्याला सांगितलं. कारण तोसुद्धा सध्या त्याच्या स्वभावाला साजेशा दुःखी आणि विचित्र प्रेमप्रकरणात गुंतलेला आहे, पण त्या प्रकरणाचा शेवट चांगलाच होईल याची मला खात्री आहे. तर तो नेहमी त्याबद्दल रडगाणं गात असतो. मग मलाच त्याला धीर देऊन मदत करावी लागते. तुझ्या पत्रांच्या आगमनातून निर्माण झालेल्या आनंद आणि दुःख यात हेलकावताना, एका अत्यंत असहाय्य क्षणी, त्याला जास्त विश्वासात न घेता (खरंतर तो अत्यंत समर्पित आणि एकनिष्ठ आहे), मी हात पुढे करुन त्याच्यासमोर ‘तू’ म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला. खरंतर ते जरा अतीच झालं आणि लगेचच मला त्याचा पश्चात्तापही झाला.
तुझ्या पत्राला उत्तर देण्याइतकी आज माझी मनस्थिती चांगली नाही, फेलिस. माझं डोकं दुखतंय. मला तुला बरंच काही सांगायचंय, पण ते कसं सांगावं हे कळत नाहीये. तू जरी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नसलीस तरी तुझ्या उत्तरांमध्ये एक गोडवा असतो. ती तुझ्यासाठी त्या वेळेपुरती सर्वसमावेशक असतात याची मला जाणीव आहे. याहून जास्त मी कसली अपेक्षा करु? शिवाय, तुझ्या पत्रांमधून काही मुद्दे अधिक स्पष्ट आणि नेमकेपणाने समोर येतात, हीसुद्धा चांगलीच गोष्ट आहे.
गेले दोन दिवस मी तुला काहीच लिहिलं नाही. कारण एकतर तुला थोडा वेळ आणि निवांतपणा मिळावा अशी माझी इच्छा होती आणि दुसरं म्हणजे, तुझ्या सोमवारच्या पत्राने मी जरा खिन्न झालो. कारण त्यातला मजकूर आणि तू मला त्या दिवशी संध्याकाळी पत्र लिहिण्याचं न पाळलेलं वचन. खरंतर तू लिहिणार नाहीस हे मला आधीच ठाऊक होतं आणि तसंच झालं. या आधी तू अनेकदा जी वचनं पाळता येतील अशी पक्की खात्री असेल, अशीच वचनं देण्याचं वचन दिलं होतंस, तरीही हे वचन काही तुला पाळता आलं नाही. असो.
माझ्या सध्याच्या निर्बुद्ध मनस्थितीत मला जे लक्षात येतंय, ते असं की, आपल्या दोघांचाही आनंद तुझ्या पत्रांमधल्या काही ‘जरतर’ च्या शक्यता प्रत्यक्षात येण्यावर अवलंबून आहे. पण त्या प्रत्यक्षात आणायच्या कशा? आपण अगदी थोड्या काळासाठी तरी एकत्र येण्यातून ते होण्याची खात्री देता येणार नाही हे नक्की. शिवाय, आपण काही काळासाठी एकत्र येण्याची शक्यताही अस्तित्वात नाही. आपल्या सुटीच्या वेळा आणि जागा जुळत नाहीत आणि बर्लिन हे काही त्यासाठी योग्य ठिकाण नव्हे. धावती भेट घेऊन काही उपयोग नाही. खरंतर, थोडा किंवा जास्त वेळ त्यासाठी पुरेसा नाहीच. कारण हा संपूर्णपणे तुझ्या बाजूने श्रद्धा, धैर्य आणि आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. श्रद्धा हा शब्द वापरण्याचं कारण, माझ्यावर विश्वास ठेव फेलिस, तुझी गृहीतकं चुकीची आहेत.माझ्या लेखनाबद्दलचा माझा दृष्टीकोन आणि जगाबद्दलचा माझा दृष्टीकोन कधीही बदलणार नाही. कारण तो एखाद्या तात्पुरत्या परिस्थितीतूम उद्भवलेला नसून माझ्या स्वभावाचा भाग आहे. माझ्या लेखनासाठी मला निखळ एकांताची गरज आहे. एखाद्या संन्याशाचा एकांत नाही, कारण तो पुरेसा नाही, तर मृताचा एकांत. या अर्थाने, लेखन ही मृत्यूहून गाढ अशी झोप आहे. जसं प्रेताला त्याच्या थडग्यापासून वेगळं करता येत नाही, तसं मला रात्री माझ्या लेखनाच्या टेबलापासून विलग करणं अशक्य आहे. याचा माझ्या लोकांशी असलेल्या नात्याशी थेट संबंध येत नाही. याचा अर्थ एवढाच, की मी फक्त अशा नियमित, सतत आणि कष्टप्रद पद्धतीनंच लिहू शकतो आणि अशाच प्रकारे जगू शकतो. पण तू म्हणतेस तसं, हे सगळं तुला ‘जरा जड जाईल’. मला लोकांची नेहमीच भीती वाटत आलीय. म्हणजे, प्रत्यक्ष माणसांची नाही, पण माझ्या दुर्बल आयुष्यात त्यांनी केलेल्या हस्तक्षेपाची. कारण अगदी जवळच्या मित्रानं जरी माझ्या खोलीत पाऊल ठेवलं तरी मी घाबरतो. ही माझ्यासाठी साध्या भीतीहून जास्त खोल भावना आहे. हे सगळं जरी बाजूला ठेवलं, खरंतर ते बाजूला ठेवणं शक्य नसलं तरीही, पानगळ आणि हिवाळ्याच्या दिवसांत भेटायला येणाऱ्या लोकांचा माझ्यावर असह्य अस्वस्थ करणारा प्रभाव पडल्याशिवाय रहात नाही. मग माझ्या आईवडिलांविषयी तर बोलायलाच नको. असाच प्रभाव माझ्या होणाऱ्या बायकोवरही पडल्यावाचून कसा राहील? ‘’ पण अशा एकांतात तू राहू शकशील की नाही हे तुला माहित नाहीये.’’ किंवा ‘’ तुझ्यासाठी मी इतर सगळ्यांची जागा घेऊ शकेन की नाही हे तुला माहित नाही’’ ही उत्तरं आहेत की तू विचारलेले प्रश्न?
माझी नोकरी? एक दिवस मला ती सोडता येईल असं अजिबात नाही. पण नोकरी करायला सक्षम नसल्यामुळे कधीतरी मला ती सोडायला सांगण्यात येईल, यात काहीच शंका नाही. या संदर्भात मला होणारी अंतर्गत असुरक्षितता आणि अस्वस्थता यांची जाणीव भीषण आहे. इथे पुन्हा त्याचं एकमेव आणि खरं कारण माझं लेखन हेच आहे. आपल्या दोघांबद्दल मला वाटणारी काळजी म्हणजे आयु्ष्यबद्दलची काळजी आहे. ती आयुष्याच्या ताण्याबाण्याचा भाग आहे. म्हणूनच तिची तुलना ऑफिसमधल्या माझ्या कामाशी करता येईल. म्हणून माझं लेखन आणि नोकरं यात समेट घडवणं शक्य नाही, कारण लेखनाचा गुरुत्वमध्य खोलवर दडलेला आहे, तर नोकरी आयुष्याच्या पृष्ठभागावर आहे. त्यामुळे ती हेलकावे खात असते आणि मी त्यात भरडून निघतो. तुझ्या पत्रातून अखेर एक गोष्ट वगळलेली दिसते, ती म्हणजे पैशाच्या टंचाईबद्दल असलेले माझे गैरमज. हा एकच मुद्दा खरंतर पुरेसा आहे. पण तू त्याचा नीट विचार केलायस का?
बघ, वेळ असाच प्रश्नांमध्ये निघून गेला. ‘हे खूप तातडीचं आहे’ असं लिहिल्याचं मला आठवत नाही, पण मला तसं म्हणायचं आहे हे नक्की.
फ्रान्त्झ
(शेवटच्या पानावर डाव्या समासात) मोन्टाग्सझाइटुन्ग?[1] त्यात जर ‘स्टोकर’[2]विषयी काहीच आलं नसेल तर अर्थातच ते मला नको.
[1] मोन्टाग्सझाइटुन्ग(Montagszeitung)- एक तत्कालीन वर्तमानपत्र
[2] द स्टोकर(The Stoker)- काफ्काची कथा
प्रियतम फेलिस,
फक्त या शेवटच्या पत्रातच मला खरी तू दिसलीस. अहदी अलिकडच्या सोमवारच्या(ते पत्र बहुतेक पोस्टेज अपुरं असल्यामुळे मला आज,गुरुवारी, मिळालं) आणि मंगळवारच्या पत्रापर्यंत तू जणू ढगाआड लपल्यासारखी होतीस. या सगळ्या पत्रांबाबत असमाधानी असल्याची वाईट खोड मलाच आहे की काय असं मी स्वतःला विचारलं. ती सगळी पत्रं मला उलस्टाईनहालंच्या त्रुटींबद्दल सांगत राहिली. तिथे राहून पत्रं लिहिण्यातल्या अडचणी कुणीच नाकारणार नाही, पण तू तिथे राहून पत्रं लिहिलीसच का? त्या ठिकाणचं नुसतं चित्रं जरी डोळ्यांपुढे आणलं तरी मला त्रास होतो. तू असंही पेन्सिलनंच लिहिलंस, तर तुला नाश्त्याच्या वेळी किंवा समुद्रकिनाऱ्यावरुन काही ओळी लिहायला काय अडचण होती? महत्वाचं म्हणजे, तू माझी पत्रं अतिशय निष्काळजीपणे वाचल्याच्या खुणा मला तुझ्या पत्रात सर्वत्र विखुरलेल्या दिसल्या. एक उदाहरण: मी माझ्या माद्रीदमधल्या काकांविषयी लिहिलं होतं. तू त्यांना थेट मिलानमध्ये नेऊन ठेवलंस. अर्थात, त्यामुळे काही फारसा फरक पडत नाही. पण तू माझ्या काही महत्वाच्या गोष्टींनाही दुसरीकडे हलवलं असतंस. शब्दांत न मांडता आणि माझ्या लक्षात न येता.
तुझ्या दुसऱ्या मंगळवारच्या पत्रानं मात्र मी काहीसा आश्वस्त झालो आणि ही माझी फेलिसच आहे अशी खात्री पटली. ती शेवटी परतलीच. कदाचित तू दमल्यामुळे असं झालं असेल, फेलिस. तू दमली नसशील तरच नवल. मला तरी दुसरी शक्यता दिसत नाही. या पत्राबरोबरच तुझ्या आईवडिलांचं पत्रंही रवाना झालं असेल. ते दोघंही एकत्र बर्लिनला जाणार आहेत.
तुझ्या इमारतीतल्या त्या माणसानं हस्ताक्षरविज्ञानाचा नाद सोडला पाहिजे. माझं वागणं ‘‘अतिशय निश्चयी’’ नक्कीच नाही (तुला तसा अनुभव आला नसेल अशी मी अपेक्षा करतो); मी कोणत्याही अर्थानं ‘‘अतिशय भोगलोलुप’’ नाहीये. उलट माझ्यात बैरागीपणाची उपजत अप्रतिम लक्षणं आहेत. मी काही गुणी बाळ नाही. मी जरा काटकसरी आहे हेही खरंच, पण ते ‘‘गरजेपोटी’’ नक्कीच नाही. मी उदारही नाही. त्या माणसानं सांगितलेल्या आणि तुला न आठवणाऱ्या इतर गोष्टीही अशाच चुकीच असणार. अगदी माझ्या ‘’ कलात्मक रुची’’ विषयीचं त्याचं भाकितही फारसं खरं नाहीये. खरंतर, त्याच्या चुकीच्या विधानांपैकी हे सगळ्यात जास्त चुकीच आहे. मला साहित्यात ‘रस’ नाही, तर मी साहित्याचा बनलेलो आहे. साहित्याशिवाय मी कुणीच नाही, असू शकत नाही. मागे मी ‘द हिस्टरी ऑफ डेव्हिल वरशिप’ (The History of Devil Worship) या पुस्तकात एक गोष्ट वाचली होती. एक धर्मगुरु होता. त्याचा आवाज एवढा गोड होता, की ऐकणारा आनंदानं भरुन जायचा. एकदा दुसऱ्या एका धर्मगुरुनं त्याचं गाणं ऐकलं. तो म्हणाला, की एवढा गोड आवाज माणसाचा असूच शकत नाही, हा सैतानाचा आवाज आहे. त्याच्या अनेक अनुयायांच्या साक्षीनं त्यानं त्या सैतानाला मंत्राच्या सहाय्यानं हुसकावून लावलं. मग ते प्रेत (कारण त्या शरीरात आत्मा नसून सैतानाच होता) कुजायला लागलं आणि घाण यायला सुरुवात झाली. माझं आणि साहित्याचं नातं अगदी असंच आहे. फरक इतकाच, की माझं साहित्य त्या धर्मगुरुच्या आवाजाएवढं गोड नाही.- मात्र माझ्या हस्ताक्षरावरुन एवढं समजण्यासाठी तो माणूस हस्ताक्षरविज्ञानातला पंडितच असायला हवा.
तुझ्या त्या हस्ताक्षरतज्ञाच्या जोडीला मला एका समीक्षकाला बसवायचंय. काही दिवसांपूर्वी, माझ्या ‘मेडिटेशन’(Meditation) या कथेचं परीक्षण ‘लिटररी एको’ (Literary Echo)मध्ये आलं होतं. ते खूप अनुकूल असलं तरी स्वतंत्रपणे फारसं दखलपात्र नव्हतं. त्यातला फक्त एक शेरा लक्षात राहण्याजोगा होता.कथेविषयी लिहिताना समीक्षक म्हणतो,’’काफ्काची अविवाहित कला...’’ आता याला तू काय म्हणशील, फेलिस?
आता इतर मुद्द्यांबद्दल थोडक्यात: म्युलरच्या स्वाध्यायाविषयी मी अतिशय आग्रही आहे. मी तुला आज ते पुस्तक पाठवतोय; जर त्यानं तुला कंटाळा आला, तर तू तो स्वाध्याय नीट करत नाहीस असा त्याचा अर्थ होतो; ते अगदी जसे दिले आहेत तसेच करण्याचा प्रयत्न कर (अगदी खूप काळजीपूर्वक पुढे जा), मग त्यांचे लगेच लक्षात येण्याजोगे परिणाम तुला कंटाळू देणार नाहीत; तुला तुझ्या स्वयंपाकाविषयी काळजी करायचं कारण नाही; तुझी चुलत बहीण जेव्हा झोपल्यावर तिच्या तोंडावर हळूच टॉवेल टाक म्हणजे तिची झोपेतली बडबड तुला ऐकू येणार नाही.
आपलं सगळं बोलून झालंय, फेलिस. घाबरु नकोस. पण बहुतेक सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून तुझ्या पूर्णपणे लक्षात आलेली नाहीये. यात मी तुला दोष देत नाही किंवा माझा तसा हेतूही नाही. सामान्य माणसाला जे करणं शक्य होतं ते सगळं तू केलं आहेस. पण तुझ्याकडे नेमकं काय नाही हे तुला कळत नाही. तसं ते कुणालाच कळत नाही. कारण मी एकटा सगळ्या विवंचना आणि भीती जिवंत सापासारख्या माझ्या आत बाळगून आहे. मी त्यांचं सतत विश्लेषण करत असतो. त्यामुळे त्या नेमक्या काय आहेत, हे फक्त मलाच ठाऊक आहे. तुला त्या माझ्याकडून किंवा माझ्या पत्रांतूनच कळल्या आहेत. पत्रांतून तुला त्यांच्याविषयी जे समजलंय- म्हणजे त्यांची भयावहता, स्वरुप, सातत्य आणि अजिंक्यपणाबद्दल- त्याचा त्यांच्या प्रत्यक्ष असण्याशी माझ्या पत्रांहूनही कमी संबंध आहे. म्हणजे खूपच कमी. हे सगळं कालचं पत्र वाचतना माझ्या लक्षात आलं. त्यात खूपच सहृदयता आणि माझ्यावरचा विश्वास होता. बहुतेक ते लिहिताना तुला माझे बर्लिनमधले अनुभव लक्षात नसावे. आपलं भावी आयुष्य तुला वेस्टरलँडमध्ये फिरताना दिसणाऱ्या आनंदी जोडप्यांसारखं नसेल हे लक्षात घे. त्यांच्यासारखं हातात हात घेऊन हलक्याफुलक्या गप्पा मारणं आपल्याला शक्य नाही. तुला एका अशा माणसाबरोबर बैरागी आयुष्य जगावं लागेल, जो चिडचिडा, दुःखी, गप्प,अस्वस्थ आणि आजारी आहे. मी असं म्हणणं कदाचित तुला वेडेपणाचं वाटेल, पण असा माणूस जो अदृश्य वाङमयाला अदृश्य साखळ्यांनी बांधला गेला आहे. त्याच्याजवळ जाऊन कुणी त्या साखळ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला की तो किंचाळतो.
तुझ्या वडिलांच्या उत्तरात मला काहीसा संकोच दिसला आणि ते समजण्यासारखं आहे. पण त्यांनी प्रश्न विचारतानाही संकोच करणं हे मला त्यांच्या शंका किती सर्वसाधारण आहेत हे दर्शवणारं वाटतं. कारण त्यांनी माहिती मिळवली असती-बरीच खोटेपणाने- तर त्यांची उत्तरं लगेच मिळाली असती. माझ्याविषयी खरी माहिती उघड करणाऱ्या एका परिच्छेदाकडे त्यांचं लक्ष गेलं नाही, कारण तो त्यांच्या वैयक्तिक अनुभवाच्या कक्षेबाहेरचा होता. असं होता कामा नये, हे मी स्वतःला रात्रभर सांगत राहिलो आणि ज्यातून त्यांना या गोष्टी स्पष्ट कळतील असं पत्र लिहायला घेतलं. ते पूर्ण झालेलं नाही आणि झालं तरी मी ते पाठवणार नाहीये. तो फक्त एक उद्रेक होता. त्यातून खरंतर मला मोकळंसुद्धा वाटलं नाही.
फ्रान्त्झ
प्रियतम फेलिस,
मोलकरणीनं मला अर्धवट गुंगीतून उठवलं आणि तुझं पत्र हातात ठेवलं. ते पत्र म्हणजे जणू अर्धवट झोपेत माझ्या डोक्यात भिरभिरणाऱ्या भीषण प्रतिमांना जोडलेली पुस्तीच होती. हल्ली माझ्या रात्री अशाच अर्ध्यामुर्ध्या झोपेच्या असतात. पण मोलकरणीनं ते पत्र कोणत्याही वेळी आणून दिलं असतं तरी ते माझ्या विचारांशी जुळणारंच ठरलं असतं, कारण माझे विचार फक्त तू आणि तुझ्या भविष्याभोवतीच फिरत असतात.
बिचारी प्रियतम फेलिस. मला इतर कुणाहीपेक्षा तुझ्याबरोबर असताना जास्त त्रास होतो आणि मी तुला इतर कुणाहीपेक्षा जास्त त्रास देतो, हे एकाच वेळी भीषण आणि योग्य आहे.या सगळ्यात, योग्य उपमाच वापरायची झाली तर, मी जणू अर्धा मोडून पडतो. मी स्वतःचेच फटके चुकवण्याचा प्रयत्न करतो आणि ते मारताना मला प्रचंड त्रास होतो. आपल्यासाठी हा जणू सर्वात मोठा अपशकुन आहे!
माझा लेखनाकडे कल नाही, प्रिय फेलिस, कल नाही, तर माझं समग्र अस्तित्वच लेखनानं व्यापलेलं आहे. कल असला तर तो समूळ नष्ट करता येतो. पण मी आहे हा असा आहे; अर्थात, मी स्वतःही समूळ नष्ट होऊ शकतो, पण तुझं काय? मी तुझी साथ सोडली तरी तू माझ्या शेजारी उभी आहेस. मला जसं जगायचंय तसा मी जगलो, तर तुला वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटेल.पण मी तसा जगलो नाही, तर तू खरंच एकटी पडशील. म्हणूनच मी म्हणतो, माझा साहित्याकडे ‘कल’ नाही, नक्कीच नाही. माझ्या आयुष्याचा सूक्ष्मातिसूक्ष्म कण साहित्यावर अवलंबून आहे, त्याला जोडलेला आहे. प्रियतम फेलिस, तू म्हणतेस की तुला याची सवय होईल, पण त्यासाठी तुला किती असह्य यातना सहन कराव्या लागतील! आपल्याला दिवसातला फक्त एक तास एकत्र घालवता येईल, तोही, मी आधी तुला सांगितल्याप्रमाणे फक्त पानगळ आणि हिवाळ्यात, असं आयुष्य तुला डोळ्यासमोर आणता येईल का? आता एक अविवाहित मुलगी म्हणून परिचित आणि सवयीच्या वातावरणात तुला माझ्यापासून लांब राहून जे एकटेपण सहन करावं लागतंय, तसं एकटेपण लग्नानंतर सहन करणं तुला चालेल? कॉन्व्हेन्टनध्ये रहायच्या कल्पनेनंसुद्धा तुझ्या कपाळाला आठ्या पडतील, तरीही तू अशा एका माणसाबरोबर आयुष्य घालवण्याचा विचार करतेस, ज्याच्या नैसर्गिक उर्मी (आणि योगायोगानं परिस्थिती) त्याला बैराग्याचं आयुष्य जगायला भाग पाडतात. जरा शांतपणे विचार कर, फेलिस. मला आज तुझ्या वडिलांचं शांत, विचारपूर्वक लिहिलेलं पत्र मिळालं. त्याच्या तुलनेत मी सध्या ज्या मनस्थितीत आहे, तो निखळ वेडेपणा ठरेल. तरीही तुझ्या वडिलांचं पत्र शांतपणे लिहिलेलं आहे, कारण मी त्यांना फसवलंय. त्यांचं पत्र शांत आणि खुलं होतं, तर माझं पत्र म्हणजे ज्या अत्यंत निंदनीय दुष्ट हेतूंनी मी तुझ्यावर हल्ला करत असतो, ते झाकण्यासाठी घातलेला पडदा होता. प्रियतम फेलिस, मी तुझा शाप आहे. तुझ्या वडिलांनी साहजिकच, कोणताही निर्णय घेतलेला नाही, तर निर्णय तू आणि तुझ्या आईशी होणाऱ्या चर्चेवर सोडलेला आहे. तुझ्या वडिलांशी प्रामाणिक रहा, फेलिस, कारण मी तसा नव्हतो. त्यांना मी कोण आहे ते सांग, माझी काही पत्रं दाखव. त्यांच्या मदतीनं या दुष्टचक्रातून बाहेर पड, ज्यात माझ्या तुझ्यावर असलेल्या आंधळ्या प्रेमामुळे मी पत्रांच्या, याचनांच्या आणि विनंत्यांच्या सहाय्यानं तुला ओढून आणलं होतं.
फ्रान्त्झ
प्रिय कु.मिलेना
आज खरंतर मला दुसऱ्याच गोष्टींबद्दल लिहायचं होतं, पण मी ते लिहू शकत नाहीये.अर्थात, त्यानं मला फार फरकही पडत नाही. तसं झालं तर मी दुसरं काही लिहेन, पण तुझ्यासाठी बागेत कायम एक झुलती खुर्ची खरंच ठेवायला हवी, त्यावर अर्धी सावली असली पाहिजे आणि हाताभराच्या अंतरावर दहा दुधाचे ग्लास ठेवले पाहिजेत. हे व्हिएन्नातही असू शकेल, अगदी आत्ता उन्हाळ्यातसुद्धा, पण भुकेशिवाय आणि शांततेत. हे अशक्य आहे का? आणि हे शक्य करणारं कुणीच नाहीये का? डॉक्टर काय म्हणतात?
तुझं भाषांतर मोठ्या लिफाफ्यातून बाहेर काढलं, तेव्हा मी काहीसा निराश झालो. मला तुझ्याकडून काहीतरी ऐकायचं होतं. तो जुनाट आवाज ऐकायचा नव्हता. तो मला चांगलाच ठाऊक आहे. त्यानं आपल्या मध्ये का यावं? हाच आवाज मध्यस्थ म्हणून आपल्या मध्ये आला होता, हे मला नंतर आठवलं. पण तू एवढं त्रासदायक काम स्वीकारावंस याची मी कल्पना करु शकत नाही. पण प्रत्येक लहानात लहात वाक्याशी तू ज्या प्रकारे प्रामाणिक असतेस त्यानं मला भावुक केलं. चेक भाषेत असा प्रामाणिकपणा शक्य असेल असं मला वाटलं नव्हतं, मग तू साध्य केलेला नैसर्गिक अधिकार तर दूरच. जर्मन आणि चेक भाषा एकमेकींना एवढ्या जवळच्या आहेत? ते काही असो, माझी कथा अतिशय वाईट आहे हे मी अगदी अतुलनीय सहजतेनं सिद्ध करु शकतो, कु.मिलेना. फक्त ते सिद्ध करताना माझी त्या कथेबद्दलची घृणा पुराव्याच्या आड येईल. अर्थात, तुला ती कथा आवडल्यामुळे तिला थोडं तरी मूल्य प्राप्त झालंय. पण त्यामुळे माझी जीवनदृष्टी जरा अंधुक झालीय. हा विषय इथेच थांबवू. वोल्फ[1] तुला ‘कंट्री डॉक्टर’ ची प्रत पाठवेल, मी त्याला तसं लिहिलंय.
अर्थातच मला चेक समजतं. तू चेकमध्ये का लिहित नाहीस असं मी तुला बऱ्याचदा विचारणारही होतो. अर्थात, तुझं जर्मनवर कमी प्रभुत्व आहे असं मला अजिबात सुचवायचं नाहीये. पण जेव्हा तू अडखळतेस तेव्हा जर्मन भाषा फक्त तुझ्यासाठी स्वतःहून लवचिक बनते आणि त्यातून अतिशय सुंदर असं काहीतरी निर्माण होतं, एखाद्या जर्मनभाषकला जे कधीही जमणार नाही असं काही; जर्मन माणूस कधीच एवढं वैयक्तिक पातळीवर लिहिण्याची हिंमत करणार नाही. पण मला तुझं चेक वाचायचं होतं, कारण शेवटी ती तुझी मातृभाषा आहे, कारण तिथेच मिलेना तिच्या समग्रतेसह सापडू शकते (तुझ्या भाषांतरातून हे सिद्ध होतं), पण इथे फक्त व्हिएन्नामधील मिलेना किंवा व्हिएन्नासाठी तयारी करणारी मिलेना दिसते. त्यामुळे कृपया चेकमध्येच लिही. आणि तू उल्लेख केलेली साप्ताहिकंसुद्धा. ती कितीही बाष्कळ असोत. तू माझ्या कथेच्या बाष्कळपणातून वाट काढत ती वाचलीसच ना? किती वाचलीस ते मला माहित नाही. मीही त्या साप्ताहिकांच्या बाबतीत तसंच करेन; मी जरी शेवटपर्यंत वाचू शकलो नाही, तरी मी सर्वोत्तम पूर्वग्रहात अडकून राहीन.
माझं लग्न ठरलं होतं का असं तू विचारलंस. माझं लग्न दोनदा ठरलं होतं. (खरंतर, तीनदा. त्यापैकी दोनदा एकाच मुलीशी), त्यामुळे तीनदा मी लग्नापासून फक्त काही दिवसांवर येऊन थांबलो. यापैकी पहिलं प्रकरण आता पूर्ण संपलंय. (त्या मुलीचं लग्न होऊन तिला मूलही आहे, असं मी ऐकलं), दुसऱ्यात अजून धुगधुगी शिल्लक आहे, पण त्यात लग्नाची काहीही शक्यता नाही. म्हणजे खरंतर तेही संपल्यातच जमा आहे, किंवा त्यात गुंतलेल्या माणसांच्या बदल्यात स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगतंय. एकूणच या आणि इतर प्रकरणांतून माझ्या असं लक्षात आलं, की यात पुरुषांना जास्त त्रास होतो किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर या बाबतीत त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. बायका कोणत्याही अपराधगंडाशिवाय त्रास सहन करतात. त्या असहाय्य असतात म्हणून नव्हे, तर ‘सहन करणं’ या शब्दाचा खरा अर्थ त्यांना माहित असतो म्हणून. तो शेवटी ‘असहाय्यता’ हाच असावा. असो, या विषयावर जास्त विचार करण्यात अर्थ नाही. हे नरकातली कढई फोडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे; एकतर त्यात यश येत नाही आणि जर आलंच, तर आपण उकळत्या तेलात पोळून निघतो. नरक आहे तसाच दिमाखात राहतो. त्यामुळे हा प्रश्न वेगळ्या मार्गानं सोडवायला हवा. पहिलं म्हणजे बागेत झोपावं आणि आजारपणातून जेवढा गोडवा शोषून घेता येईल तेवढा घ्यावा. विशेषतः, आजार खरा नसेल तर त्यात खूप गोडवा असतो.
फ्रान्त्झ के.
[1] कुर्ट वोल्फ ( Kurt Wolf), काफ्काचा प्रकाशक
प्रिय कु. मिलेना
सुरुवातीला तू माझ्या पत्रावरुन अंदाज बांधू नयेस म्हणून एक गोष्ट सांगून टाकतो: गेल्या १४ सुमारे दिवसांपासून मी चढत्या क्रमानं निद्रानाश सहन करतोय, मी त्याचा फारसा त्रास करुन घेत नाही. असे दिवस येतात आणि जातात. त्यांना बहुतेक प्रत्येक वेळी गरजेपेक्षा जास्त कारणं असतात (हे हास्यास्पद वाटेल, पण बिडेकरनुसार, हे मेरानच्या हवेमुळेसुद्धा होऊ शकतं). शिवाय ही कारणं बऱ्याचदा लक्षातही न येण्यासारखी असली तरी त्यामुळे मी लाकडाच्या ओंडक्यासारखा निश्चल आणि जंगलातल्या श्वापदासारखा अस्वस्थ असतो.
तरीही, मला एका बाबतीत त्याची भरपाई मिळालीय. तू शांतपणे झोपतेस. जरा ‘विचित्र’ प्रकारे का असेना किंवा काल तुला जरा ‘हलल्यासारखं’ वाटलं तरीही एकूण तुला शांत झोप लागली हे महत्वाचं. त्यामुळे झोप मला डावलून रात्री कुठे जाते ते आता मला कळलंय आणि तुला ते मान्य करावंच लागेल. अर्थात, झोपेला विरोध करणं हा वेडेपणा आहे. झोप हा जगातला सर्वात निरागस प्राणी आहे आणि झोप येत नसलेला माणूस सर्वात पापी असतो.
तू तुझ्या मागच्या पत्रात या निद्राहीन माणसाचे आभार मानलेस म्हणजे बघ. जर एखाद्या नवख्या माणसानं ते पत्र वाचलं तर त्याला वाटेल, ‘’ काय माणूस आहे! त्यानं नक्कीच काहीतरी महान कार्य केलं असणार.’’ पण प्रत्यक्षात त्यानं काहीही केलेलं नाही, अगदी बोटही उचलेलं नाही (लिहिण्यासाठी सोडून), तो फक्त दूध आणि काही चांगल्या गोष्टींवर जगतोय, ‘चहा आणि सफरचंद’ यांच्याकडे नेहमीच (खरंतर बऱ्याचदा) न पाहता. हा माणूस आयुष्य जसं समोर येईल तसा जगतो आणि महान कार्यांना एकटं सोडून देतो. तुला दस्तयेवस्कीला पहिल्यांदा यश कसं मिळालं ते माहित आहे? त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. शिवाय, मी हा उल्लेख करण्याचं कारण एखादी गोष्ट मोठ्या माणसांशी संबंधित असली की ती सांगणं सोपं जातं. नाहीतर शेजारच्या घरातली किंवा त्याहून जवळची गोष्टही तेवढीच महत्वाची असेल. माझी या गोष्टीची आठवण आणि नावंसुद्धा नेमकी नाहीत. जेव्हा दस्तयेवस्कीनं त्याची ‘पुअर फोक’ ही पहिली कादंबरी लिहिली, तेव्हा तो त्याच्या ग्रिगोरिएव नावाच्या लेखक-मित्रासह रहात होता. हा मित्र बऱ्याच महिन्यांपासून दस्तयेवस्कीला लिहिताना बघायचा. टेबलावर लिहून झालेल्या कागदांच्या थप्प्या जमा होत होत्या. पण कादंबरी लिहून पूर्ण होईपर्यंत दस्तयेवस्कीनं त्याला वाचायला दिली नाही. त्यानं ती वाचली, त्याला खूप आनंद झाला आणि तो ती त्यावेळचा प्रसिद्ध समीक्षक नेक्रासोवकडे घेऊन गेला. मात्र याचा त्यानं दस्तयेवस्कीला थांगपत्ता लागू दिला नाही. एकदा रात्री ३ वाजता दस्तयेवस्कीची डोअरबेल वाजली. ग्रिगोरिएव आणि नेक्रासोव आत घुसले. त्यांनी दस्तयेवस्कीला मिठी मारुन त्याचा मुका घेतला. नेक्रासोवनं, जो त्याला ओळखत नव्हता, दस्तयेवस्कीला रशियाची आशा म्हटलं. पुढचे एक ते दोन तास ते दोघंही कादंबरीविषयी बोलत राहिले आणि सकाळ होईपर्यंत तिथेच थांबले. दस्तयेवस्की खिडकीतून खाली वाकून त्यांना जाताना बघत राहिला आणि मग स्वतःवरचा ताबा सुटून रडायला लागला. ही आपल्या आयुष्यातली सर्वाधिक आनंदी रात्र होती असं तो नेहमी म्हणायचा. त्यावेळच्या भावना त्यानं लिहून ठेवल्या आहेत. अर्थात, नेमक्या कुठे ते आता मला नीट आठवत नाही. तो म्हणतो: ’’ किती चांगले आहेत हे लोक! किती छान आणि उमदे! आणि मी किती वाईट आहे! जर ते माझ्या आत डोकावून बघू शकले तर! मी स्वतः जरी त्यांना सांगितलं तरी ते विश्वास ठेवणार नाहीत.’’ दस्तयेवस्की नंतर त्यांच्याशी स्पर्धा करायला लागला हे केवळ अलंकरण आहे. तरुणांना गोष्टीच्या शेवटी काहीतरी नाट्यपूर्ण लागतं त्यातला प्रकार. माझी गोष्ट इथेच संपते. कु.मिलेना, तुला यातलं रहस्य दिसलं का? जे बुद्धीला आकळणार नाही ते लक्षात आलं का? माझ्या जे लक्षात आलं ते असं: आपण जर सर्वसाधारणपणे म्हटलं, तर ग्रेगोरिएव आणि नेक्रोसोव काही दस्तयेवस्कीपेक्षा जास्त उमदे नक्कीच नव्हते. पण आपण थोडा वेळ हा सामान्य दृष्टीकोन बाजूला ठेवू, कारण दस्तयेवस्कीलाही त्या रात्री तो अभिप्रेत नव्हता. शिवाय, विशिष्ट प्रकरणांमध्ये तसा तो निरुपयोगीच असतो. आपण जर फक्त दस्तयेवस्कीवर लक्ष केंद्रित केलं तर असं दिसतं की ग्रेगोरिएव आणि नेक्रोसोव ही खरंच खूप छान माणसं होती आणि दस्तयेवस्की हा कलुषित, खूप वाईट माणूस होता. तो कधी ग्रेगोरिएव आणि नेक्रोसोव यांच्या जवळपासही फिरकू शकला नसता, मग त्यांच्या अत्यंत दयाळू, अनाठायी चांगल्या वागणुकीची भरपाई करणं तर दूरच. आपण खिडकीतून त्यांना प्रत्यक्षात दूर जाताना बघू शकतो. त्यातून त्यांचा दूरस्थपणा सूचित होतो. खरंतर, दस्तयेवस्कीच्या मोठेपणामुळे या गोष्टीचा अर्थ पुसला गेलाय.
माझा निद्रानाश मला कुठे घेऊन गेला बघ. मला खात्री आहे की,ज्याला फारसा अर्थ नाही अशा गोष्टीकडे नसावा.
फ्रान्त्झ के.
प्रिय कु.मिलेना (हो, हे संबोधन आता ओझ्यासारखं वाटायला लागलंय खरं, पण या भोवतालच्या अनिश्चित जगात आजारी माणसाच्या कुबडीसारखी जिला मी घट्ट धरुन ठेवू शकतो अशी ही एकच गोष्ट आहे; पण कुबडीचंच ओझं होणं हे काही आजार बरा होण्याचं लक्षण नव्हे), मी कधीच जर्मन लोकांमध्ये राहिलो नाही. जर्मन ही माझी मातृभाषा आहे, आणि माझ्यासाठी जास्त नैसर्गिक आहे. पण मला चेक भाषा जास्त जिव्हाळ्याची वाटते, म्हणूनच तुझ्या पत्रांनी माझे कितीतरी संभ्रम नाहीसे होतात; मी तुला अधिक स्पष्टपणे पाहू शकतो, तुझ्या शरीराच्या आणि हातांच्या हालचाली, अतिशय जलद आणि निश्चयी, हे जवळजवळ प्रत्यक्ष भेटीसारखंच आहे. असं असलं तरीही मी जेव्हा पत्र लिहिताना तुझ्याकडे नजर उचलून पाहतो, तेव्हा अचानक आग लागल्यासारखं होतं आणि मला आगीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.
स्वतःच्या आयुष्यासाठी तू आखलेल्या नियमांवर विश्वास ठेवण्याचा मला मोह होतो. तू ज्या नियमांचं कसोशीनं पालन करतेस, त्यांच्यामुळे तुझी कुणाला दया यावी, असं तुला साहजिकच वाटत नसणार, कारण असे नियम आखून घेणं म्हणजे शुद्ध अहंकार आणि घमेंडखोरपणाचं लक्षण आहे. (‘’प्रत्येक वेळी मीच बिल देणार’’); तरीही ज्या वेळी तू या नियमांचा वापर करतेस त्याविषयी अधिक बोलण्याची गरज नाही. मी फक्त शांतपणे तुझ्या हाताचं चुंबन घेऊ शकतो. माझ्याविषयी बोलायचं तर तुझ्या नियमांविषयी मला आदर आहे, पण त्यांचं तुझ्या आयुष्यावर जे कायमचं आणि स्पष्टपणे क्रूर असं सावट आहे, ते काही मला पटत नाही. अर्थात, हे माझंच वाटणं आहे, पण जाता जाता सुचलेलं आणि हा रस्ता अनंत आहे.
हा विषय बाजूला ठेवू, पण तू ज्या अतिउष्ण अशा भट्टीच जगतेस ते माझ्यासारख्या अल्पमतिला भीषण वाटतं. सध्या मला फक्त स्वतःविषयी बोलायचं आहे. आपण या सगळ्याकडे एखाद्या गृहपाठासारखं पाहिलं, तर तुला तो सोडवण्याचे तीन मार्ग आहेत: उदारहणार्थ, तू स्वतःविषयी काहीही न सांगणं, पण तसं केलंस तर तुला जाणून घेण्याचं भाग्य मला कसं लाभेल? आणि त्याहून महत्वाचं, स्वतःला तपासून बघण्याचंही. त्यामुळे तुला स्वतःला माझ्यापासून लपवण्याची परवानगी नाही. दुसरा मार्ग म्हणजे, तू काही गोष्टी माझ्यापासून लपवणं किंवा त्यांचा सहज जाता जाता उल्लेख करणं. हे तू अजूनही करु शकतेस, पण माझ्या सध्याच्या परिस्थितीत मी ते बोलून दाखवलं नाही तरी मला तू काहीतरी लपवते आहेस हे जाणवेल आणि त्याचा मला दुप्पट त्रास होईल. त्यामुळे तुला तेही करण्याची परवानगी नाही. आता फक्त तिसरा पर्याय शिल्लक उरतो: स्वतःविषयी जागरुक राहणं. खरंतर, तुझ्या पत्रांवरुन याची थोडी शक्यता असल्याचं दिसतं. त्यात नेहमी स्थैर्य आणि शांततेचा उल्लेख असतो, पण मला त्या पत्रांमध्ये बऱ्याचदा इतर गोष्टीही दिसतात. (त्या जरी तात्पुरत्या असल्या तरी) आणि सध्या तर निखळ भीषणताही दिसते.
तुझ्या तब्येतीविषयी तू जे सांगतेस (माझी तब्येत बरी आहे, फक्त डोंगराळ हवेत मला नीट झोप लागत नाही एवढंच) त्यानं माझं समाधान होत नाही. मला डॉक्टरांचं निदान फारसं सकारात्मक वाटत नाही, खरंतर ते सकारात्म आणि नकारात्मक दोन्ही वाटत नाही. त्याचा अर्थ कसा लावायचा हे सरस्वी तुझ्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. डॉक्टर अर्थातच मूर्ख असतात किंवा इतर लोकांपेक्षा जास्त मूर्ख नसतात,पण त्यांचे दावे मात्र हास्यास्पद असतात. तरीही त्यांच्या संपर्कात आल्यापासून आपल्याला त्यांच्या जास्तीत जास्त मूर्खपणावर अवलंबून रहावं लागतं. सध्या तुझ्या डॉक्टर जे करायला सांगतोय, ते जास्त मूर्खपणाचं किंवा अशक्य नाहीये. तरीही जास्त आजारी पडणं तुझ्यासाठी अशक्य आहे आणि असेल. तू डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर तुझ्या आयुष्यात काय फरक पडला, हा महत्वाचा प्रश्न.
आता कृपया मला इतर विषयांबद्दल काही प्रश्न विचारु दे: तुला पैशाची चणचण का आणि केव्हापासून भासायला लागली? तू तुझ्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेस का?(असली पाहिजेस, कारण मागे तू मला ज्या पत्त्यावरुन तुला नेहमी पार्सल्स येतात तो पत्ता दिला होतास, ते आता थांबलंय का?). मागे तू व्हिएन्नामध्ये लोकांमध्ये मिसळत होतीस, मग आता का मिसळत नाहीस?
तुला तुझे मासिकांमध्ये आलेले लेख मला पाठवायचे नाहीत. याचा अर्थ, मी तुझी जी प्रतिमा मनात तयार करतोय, त्यात त्यांना योग्य ती जागा देण्याएवढा तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. ठीक आहे तर मग, मी यावरुन तुझ्यावर रागावणार आहे. ते तसं फारसं वाईट आहे अशातला भाग नाही, कारण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात जेव्हा तुझ्याविषयी राग असतो, तेव्हा माझ्या आयुष्यात काही संतुलन आपोआप साधलं जातं असा माझा अनुभव आहे.
फ्रान्त्झ के
आता मी काल ज्या स्पष्टीकरणाविषयी बोललो ते: मला व्हिएन्नाला यायचं नाहीये (मिलेना कृपया मला मदत कर, मला काय म्हणायचंय ते समजून घे), यायचं नाही (हा तोतरेपणा नाही), कारण मला मानसिक ताण सहन होत नाही. माझा आजार आध्यात्मिक आहे, फुप्फुसांचा आजार हे त्याचं फक्त बाह्य रुप आहे. माझ्या पहिल्या दोन साखरपुड्यांनंतरच्या ४ ते ५ वर्षांपासून मी असा आजारी आहे. (तुझं मागचं पत्रं एवढं आनंदी का होतं हे समजायला मला थोडा वेळ लागला; तू किती तरुण आहेस हे मी सारखं विसरतो; कदाचित तू जेमतेम पंचविशीची असशील, कदाचित २३ वर्षांचीसुद्धा. मी ३७ वर्षांचा आहे, जवळजवळ ३८ चा. म्हणजे म्हणजे आपल्यात अख्ख्या पिढीचं अंतर आहे. रात्रीची जागरणं आणी डोकेदुखीमुळे माझे केस पांढरे झालेत. मला तुला तुलनात्मक तपशिलांच्या जंजाळासकट सगळी गोष्ट सांगायची नाहीये, ती मला लहान मुलासारखी अजून घाबरवते. फरक एवढाच की, लहान मुलाची विस्मरणशक्ती माझ्याकडे नाही. माझ्या तिन्ही साखरपुड्यांमध्ये समान काय असेल तर ती माझी चूक होती. संपूर्णपणे आणि निर्विवाद माझीच चूक होती. माझ्यामुळे त्या दोन्ही मुली दुःखी झाल्या हे नक्की.-खरंतर इथे मला फक्त पहिलीच मुलगी अभिप्रेत आहे, मी दुसरीविषयी काही सांगू शकत नाही. ती खूपच संवेदनशील आहे. कोणत्याही शब्दानं, अगदी जिव्हाळ्याच्यासुद्धा, ती प्रचंड दुखावली जाऊ शकते. मी ते समजू शकतो.- हे असं आहे हे तिला वारंवार स्वतःहून सांगूनही, मी काही वेळा तिच्यावर असोशीनं प्रेम करुनही, मला लग्नाहून चांगली महत्वाकांक्षा नसूनही ती मला दीर्घकाळ आनंदी, शांत, निश्चयी, लग्नासाठी सक्षम करु शकली नाही. मी सतत पाच वर्षं तिला (किंवा स्वतःला) छळत राहिलो, पण सुदैवानं ती मोडून पडली नाही. तिच्यात पर्शियन आणि ज्यू वंशांचं सशक्त विजयी मिश्रण होतं.मी स्वतः तेवढा सशक्त नव्हतो. तिला त्रास सहन करण्यावाचून पर्याय नव्हता आणि मला त्रास देत राहून त्रास सहन करावा लागत होता.
------
बस्स एवढंच. खरंतर आत्ता कुठे पत्राला नुकतीच सुरुवात झाली होती. पण मी याहून जास्त लिहू शकत नाही, किंवा स्पष्ट करुन सांगूही शकत नाही. अर्थात, मी माझ्या आध्यात्मिक आजाराविषयी सांगायला हवं, तिला सोडून न जाण्याच्या इतर कारणांबद्दल सांगायला हवं. तुझी तार आली: ‘’ कार्ल्सबादला भेट. हे आठवं विनंतीपत्र आहे’’. ती वाचल्यावर मला खूप भीती वाटली हे मी कबूल करतो. ती एका अतिशय निःस्वार्थी आणि शांत व्यक्तीनं पाठवलेली असूनही आणि त्यामागे माझीच इच्छा असूनही. मला माझ्या आजाराचं वर्णन करता येणार नाही, त्यामुळे मी हे सगळं आता सांगू शकत नाही. पण एवढं नक्कीः मी सोमवारी इथून निघणार. मी अधूनमधून तुझ्या तारेकडे बघतो. मी ती जेमतेमच वाचू शकतो- जणू त्यात गुप्त संदेश असावा, की त्यामुळे लिहिलेली अक्षरं पुसल्यावर त्याखाली खरा संदेश दिसेल: व्हिएन्नामधून प्रवास कर!- हा एक उघड आदेश आहे, पण आदेशांमध्ये अध्याहृत असलेली भीती त्यात नाही. मी तसं करणार नाहीये. खरंतर, प्रथमदर्शनी म्युनिकमधून जवळच्या रस्त्यानं न येता दुप्पट अंतरावर असलेल्या लिन्झमधून आणि नंतर त्याहून लांब असलेल्या व्हिएन्नामधून येणं वेडेपणाचं ठरेल. मी एक प्रयोग करुन पाहतोयः एक चिमणी बाल्कनीत बसलीय आणि मी टेबलावर असलेल्या ब्रेडचा तुकडा तिला कधी घालतो याची वाट पाहतेय. पण मी तुकडा तिथे टाकण्याऐवजी माझ्या समोर खोलीच्या मध्यभागी असलेल्या फरशीवर टाकतो. चिमणी बाहेर बसलीय आणि अर्धवट अंधारात तिला तिचं अतिशय आकर्षक खाणं दिसतं, ती पिसं झटकते. जास्त आत येते. पण इथे आत अंधार आहे आणि ब्रेडजवळ मी आहे. तिच्या दृष्टीनं एक रहस्यमय अस्तित्व. तरीही ती उंबरठ्यावर उड्या मारते. थोडी आणखी आत येते, पण तिची आणखी पुढे येण्याची हिंमत होत नाही आणि ती एकदम घाबरुन उडून जाते. पण या चिमुकल्या पक्ष्यात किती चैतन्य आहे! थोड्या वेळानं ती परत येऊन परिस्थितीचा आढावा घेते. तिला आत येणं सोपं जावं म्हणून मी ब्रेडचे आणखी काही तुकडे टाकतो. पुन्हा माझ्या जराश्या हालचालींना (रहस्यमय अस्तित्वं असंच करतं ना) घाबरुन ती उडून गेली नसती तर तिला ब्रेड नक्की मिळाला असता.
वस्तुस्थिती अशी आहे की माझी सुटी जूनअखेरपर्यंत संपतेय आणि हवाबदल म्हणून मला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जायचंय; शिवाय इथे आतापासूनच उकाडा जाणवतोय. तिलाही जायचंय. आता आम्ही बहुतेक तिथेच भेटू. मी तिथे काही दिवस राहीन, मग आणखी काही दिवस माझ्या आईवडिलांबरोबर कॉन्स्टंन्टिन्सबादमध्ये. नंतर प्रागला जाईन. प्रवासाच्या या योजना लक्षात घेऊन त्यांची माझ्या मनस्थितीशी तुलना केल्यावर मला नेपोलियनची आठवण होते. तो रशियन मोहिमेची तयारी करत असताना त्याला तिचं फलित कळत असतं तर त्याला असंच वाटलं असतं.
तुझं पहिलं पत्र आलं तेव्हा मला आनंद झाला आणि मी ते तिला दाखवलं. बहुतेक ते नियोजित लग्नाच्या काहीच दिवस आधी आलं होतं. (त्या लग्नाचं आयोजन मीच केलं होतं). नंतर- नाही काहीच नाही, आणि आता मी हे पत्र दुसऱ्यांदा फाडून टाकणार नाही. आपल्या स्वभावात काही साम्यं आहेत, माझ्या जवळ एखादा अव्हन नाहीये. एकदा असं झालं होतं, तुला अर्धवट लिहिलेल्या अशाच पत्राच्या मागे मी त्या मुलीला पत्र लिहिलं असावं अशी मला भीती वाटतेय.
पण या सगळ्याला काही अर्थ नाही, तुझी तार आली नसती तरी मी व्हिएन्नाला येऊ शकलो नसतोच. उलट ही तार मला व्हिएन्नाला जाण्याच्या बाजूनं वळवणारी आहे. मी येणार तर नाहीये, पण जर आलोच, तर मला न्याहारी किंवा रात्रीच्या जेवणापेक्षा स्ट्रेचरची जास्त गरज असेल. त्यावर मी काही काळ झोपू शकेन.
आता निरोप घेतो- हा आठवडा माझ्यासाठी सोपा नसेल.
-एफ
ता.क. तुला जर मला कार्लबादला पत्र लिहायचं असेल तर मी प्रागला परते पर्यंत लिहू नकोस. तू ज्या शाळांमध्ये शिकवतेस त्या शाळा आहेत तरी कशा? २०० विद्यार्थी काय, ५० विद्यार्थी काय. मला तासभर तुझ्या वर्गात शेवटच्या रांगेत खिडकीजवळच्या बेंचवर बसायचं आहे. मग आपण भेटलो नाही तरी चालेल (अर्थात, असं होणार नाहीच), सगळे प्रवास केले नाही तरी चालेल. बस्स. हा अथांग पांढरा कागद माझे डोळे जाळतोय. म्हणूनच मी लिहितो बहुतेक.
-------
हे मी दुपारी लिहिलं. आता दोन वाजलेत. सध्या मला जे करता येईल ते मी केलंय. मी प्रागला तार पाठवून कार्ल्सबादला येणं शक्य नसल्याचं कळवलंय. याचं कारण म्हणून मी माझ्या गोंधळलेल्या मनस्थितीकडे बोट दाखवू शकतो. ती एकीकडे खरी असली तरी दुसरीकडे तेवढी सलग नाही. खरंतर याच गोंधळलेल्या मनस्थितीमुळे मला कार्ल्सबादला जावंसं वाटलं होतं. बघ, मी खऱ्या जिवंत माणसांशी कसा खेळतो. पण मला दुसरं काही करता येत नाही. कार्ल्सबादमध्ये मी बोलूही शकणार नाही आणि गप्पही राहू शकणार नाही. किंवा खरंतर गप्प राहून बोलेन. कारण सध्या मी एका शब्दापेक्षा जास्त बोलत नाहीये. मी सोमवारी म्युनिखहून प्रवास करेन, व्हिएन्नामधून नाही, हे नक्की. नेमकं कुठे, कार्ल्सबाद की मरीनबाद, कोणास ठाऊक. पण एकट्यानं प्रवास करेन हे नक्की. मी तुला पत्र लिहिन, पण तुझं उत्तर मला तीन आठवड्यांपूर्वी, म्हणजे मी प्रागला परतेपर्यंत मिळणार नाही.
... सगळं तुझ्यावर सोडण्यासाठी.
प्रिय कु. मिलेना, आजचा दिवस एवढा लहान होता की तुझ्या विचारांत आणि इतर काही क्षुल्लक कामांमध्ये तो पटकन संपूनच गेला. खऱ्या मिलेनाला पत्र लिहायला वेळच उरला नाही, कारण तिच्याहून खरी मिलेना दिवसभर इथेच होती. माझ्या खोलीत, बाल्कनीत, आकाशात.
तुझ्या गेल्या पत्रांतला जिवंतपणा, प्रसन्न मूड, निश्चिंतपणा कुठून येतो? काही बदललंय का? की माझी चूक होतेय आणि ते गद्याचे तुकडे हा परिणाम करतायत? की तुझा स्वतःवर आणि इतर गोष्टींवरसुद्धा एवढा ताबा आहे? नक्की आहे तरी काय?
एखाद्या न्यायाधिशानं निवाडा करावा तसं तुझं पत्र सुरु होतं. हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय. आणि गेल्या वेळी तू ‘’ एवढं काही पूर्णपणे बरोबर नाही’’ असा जो आरोप केलास तो खरा आहे, तसाच तू ‘’ चांगल्या अर्थाने’’ बद्दल केलेला आरोपही. हे उघड आहे. मी पत्रात लिहिल्याप्रमाणे खरंच एवढी काळजी करत असतो, तर असा आरामखुर्चीत निवांत पहुडलो नसतो आणि सगळे अडथळे ओलांडून दुसऱ्या दिवशी तुझ्याकडे आलो असतो. माझ्या प्रामाणिकपणाचा एवढाच पुरावा, बाकी नुसतं बोलणं. किंवा सुप्त भावनेला केलेलं आवाहन, ती भावना तरीही अंगठे मुडपून शांत राहिलेली दिसते.
तुझ्या पत्रात तू (प्रेमानं आणि त्यामुळेच, कौशल्यानं) ज्या वैतागवाण्या लोकांचा उल्लेख केलायस त्यांचा तुला उबग कसा येत नाही? तो अति-चौकस माणूस आणि बाकीचेही सगळे? खरंतर तू त्यांचा निवाडा केला पाहिजेस. कारण शेवटी बाईच न्याय देते.(पॅरीसची दंतकथा याच्या जरा विरुद्ध आहे खरी, पण शेवटी पॅरीसही कोणती देवी सर्वाधिक कठोर अंतिम निवाडा करते हेच सांगतय). असो. तर तुझ्या सभोवतालच्या या लोकांचं वागणं किती हास्यास्पद आहे यानं काही फरक पडत नाही.काही काळ ते असंबद्ध वाटेल. मग कालांतरानं त्यांचं वागणं गंभीर आणि योग्य वाटायला लागेल. ही आशा तुला त्या लोकांशी जोडून ठेवते की काय? शेवटी न्यायाधिशाच्या मनातलं कोण ओळखणार? पण मला वाटतं तू या लोकांचं असंबद्ध वागणं असं स्वीकारतेस की त्यात समजूतदारपणा आणि जिव्हाळा असतो. त्यामुळे ते आपोआपच चांगलं वाटायला लागतं. पण त्यांचं वागणं हे कुत्र्याच्या नागमोडी धावण्यासारखं असतं. त्याचा मालक सरळ चालला काय किंवा त्यानं वाट वाकडी केली काय, तो जिथे वाट नेईल तिथे वेडावाकडाच धावत असतो. असं असलं तरीही तुझ्या या जिव्हाळ्यामागे काहीतरी कारण नक्की असलं पाहिजे असं मला वाटतं. (तुला ते विचारणं मला अजूनही विचित्र वाटतं). त्यावरुन मला आमच्या ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याची आठवण झाली. ती मी तुला सांगतो. फक्त या समस्येची एक बाजू अधोरेखित करण्यासाठी.
काही वर्षांपूर्वी मी मोल्डाउ नदीवर बोट चालवायला जायचो. एका छोट्या वल्ही मारण्याच्या बोटीतून. मी वल्ही मारत नदीच्या वरच्या अंगाला जायचो आणि मग आरामात प्रवाहाबरोबर तरंगत पुलाखालून पुढे जायचो. अगदी आरामात बोटीवर ताणून द्यायचो. माझ्या काटकुळ्या अंगयष्टीमुळे पुलावरुन हे दृश्य बऱ्यापैकी मजेशीर दिसत असणार. ही मजा आमच्या ऑफिसातल्या एका कारकुनानं एकदा पुलावरुन पाहिली. त्यानं त्या दृश्याचं वर्णन काहीसं असं केलं: ते दृश्य पाहून असं वाटलं की शेवटचा निवाडा सुरु आहे. शवपेट्या नुकत्याच उघडलेल्या आहेत. पण मुडदे मात्र तसेच निश्चल पडून आहेत.
------------
मी एक छोटी सुटी घेतली. (मी ज्याचा उल्लेख केला होता ती मोठी सुटी नव्हे, ती कधी प्रत्यक्षात आलीच नाही) आणि सुमारे तीन दिवस थकव्यामुळे मी काहीही करण्याच्या अवस्थेत नव्हतो, अगदी लेखनसुद्धा. अर्थात तो थकवा काही अगदीच वाईट नव्हता. मी नुकतंच तुझं पत्र आणि निबंध पुन्हा पुन्हा वाचले. ते वाचून माझी खात्री पटली की हे गद्य केवळ स्वान्तसुखाय लिहिलं गेलेलं नाही, तर मानवतेला दिशा दाखवण्यासाठी निर्माण झालेलं आहे. अशा रस्त्यावरुन जाताना दिशा दाखवण्यासाठी, ज्यावरुन आपण आनंदानं चालत असतो आणि एका क्षणी आपण पुढे जात नाही आहोत आणि आपल्याच चकव्यात गरगरत आहोत, हे आपल्या लक्षात येतं. फक्त जास्त खिन्न होऊन आणि जास्त गोंधळल्या मनस्थितीत. ते काही असलं तरी, हे कुणा सामान्य लेखकाचं लेखन नाहीये. ते वाचल्यावर माझा तुझ्याएवढाच तुझ्या लेखनावर विश्वास बसला. चेक भाषेत असं संगीत मला फक्त बोशेना नेमकोव्हामध्ये जाणवलं होतं. तुझ्या भाषेतलं संगीत वेगळ्या घराण्याचं असलं तरी त्यातली निष्ठा, उत्कटता, मोहिनी आणि विशिष्ट अलौकिक बुद्धीमत्ता तशीच आहे. हा फक्त गेल्या काही वर्षातल्या लेखनाचा परिपाक आहे? की तू आधीही लिहित होतीस? अर्थात, मी तुझ्या बाबतीत खूपच जास्त पक्षपाती आहे असं तुला वाटू शकेल आणि मी तसा आहेच. पण मी पक्षपाती आहे तो मला तुझ्या लेखनात पहिल्यांदा जे आढळलं त्याबद्दल नाही (त्यात उंचसखलपणा होता आणि वर्तमानपत्रीय लेखनाचा वाईट प्रभावसुद्धा), तर पुन्हा वाचताना जे दिसलं त्याविषयी. तुझ्या लेखनातल्या दोन परिच्छेदांमुळे तो काटछाट केलेला फॅशनवरचा लेखही तुझाच होता असा माझा समज झाला, यावरुन माझ्या आकलनातल्या उणीवा तुझ्या लगेच लक्षात येतील. मी बरेच दिवस तुझ्या लेखांची कात्रणं जपून ठेवणार आहे, किमान माझ्या बहिणीला दाखवेपर्यंत तरी. पण तुला ती लगेच परत हवी आहेत, त्यामुळे मी ती या पत्राबरोबरच पाठवतोय. मला त्यात समासात काही आकडेमोडसुद्धा केलेली आढळली.
आधी माझं तुझ्या नवऱ्याविषयी वेगळं मत होतं. त्या कॅफेच्या वर्तुळात तो मला सगळ्यात शांत, सगळ्यात विश्वासू, खूपच जास्त वडिलधारा वाटला. मला तो निर्विकारसुद्धा वाटला, पण वर दिलेल्या विशेषणांना छेद देण्याएवढा नाही. मला नेहमीच त्याच्याविषयी आदर वाटत आलाय. त्याला जास्त जाणून घेण्याची संधी किंवा क्षमता मला लाभली नाही, पण माझ्या मित्रांचं, विशेषतः मॅक्स ब्रॉडचं, त्याच्याविषयी खूप चांगलं मत आहे आणि त्याचा विचार मनात आल्यावर मला नेहमी ते मत आठवतं. एके काळी प्रत्येक कॅफेमध्ये बसून संध्याकाळचे टेलीफोन क़ॉल्स घेण्याची त्याची विशिष्ट सवय मला आवडली होती. बहुधा, एक माणूस नेहमी फोनशेजारी आरामखुर्चीत बसून पेंगत असायचा आणि वारंवार फोन घेण्यासाठी उडी मारुन उठायचा. मी ती मनस्थिती एवढी चांगली समजू शकतो की फक्त त्याच कारणासाठी मी हे लिहितोय.
खरंतर याबाबतीत स्टाशा आणि तो दोघांचंही बरोबर आहे: मी स्वतः जे करु शकत नाही त्याचं मी समर्थन करत असतो. आणखी एक गोष्ट: जेव्हा कुणी पहात नसेल, तेव्हा स्टाशाचं जास्त बरोबर आहे असा मी विचार करतो.
फ्रान्त्झ के
ता.क. तुला काय वाटतं? मला रविवारपर्यंत पत्र मिळेल? मिळायला हवं. पण पत्रांविषयीच्या या वेडाला काही अर्थ नाही. खरंतर एकच पत्र पुरेसं नाही का, एकदाच ओळखणं पुरेसं नाही का? अर्थातच आहे, पण तरीही मी माझं डोकं खूप मागे नेऊन ही पत्रं पिऊन टाकतो. तेव्हा मला फक्त एवढंच कळतं की मला हे पिणं थांबवायचं नाहीये. आता हे समजावून सांगा बरं, मिलेनाबाई!
आज सकाळी उठायच्या थोडं आधी, म्हणजेच झोप लागल्यावर थोड्याच वेळात मला एक भयानक स्वप्न पडलं. ते अगदी थरकाप उडवणारं होतं असं मी म्हणणार नाही. (सुदैवानं स्वप्नांचा परिणाम फारसा टिकत नाही). शिवाय मी थोडी झोप त्या स्वप्नाचं देणं लागतो, कारण मी अशी स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय झोपेतून उठत नाही, त्यांच्या तावडीतून सुटणं अशक्य असतं कारण ती अगदी तुमची मानगूटच घट्ट धरुन ठेवतात.
तर मी व्हिएन्नामध्ये होतो. हे व्हिएन्ना अगदी मी तिथे जायच्या दिवास्वप्नांत जसं पाहतो तसंच होतं. माझ्या या दिवास्वप्नांमधल्या व्हिएन्नात फक्त एक शांत चौक असतो. त्याच्या एका बाजूला तुझं घर. तुझ्या घरासमोर माझं हॉटेल. डावीकडे मी जिथे उतरतो ते वेस्टबानहॉफ. त्याच्या डावीकडे फ्रान्त्झ योसेफ बानहॉफ. तिथून मी परत जायला निघतो. माझ्या हॉटेलच्या तळमजल्यावर असतं एक समजूतदार शाकाहारी रेस्टॉरंट. मी तिथे जेवायला जात नाही, तर प्रागला परत जाताना थोडं वजन वाढावं म्हणून जातो. मी तुला हे का सांगतोय? हा काही माझ्या कालच्या स्वप्नाचा भाग नाही, तरीही त्यामुळे मला भीती वाटतेय. कालचं स्वप्न अगदी असं नव्हतं. ते एक मोठं शहर होतं.संध्याकाळ होत आलेली. ओलसर, गडद, अंधारी. प्रचंड रहदारी. एक लांबलचक आयताकृती सार्वजनिक बाग. तिच्या एका बाजूला तुझं घर आणि विरुद्ध बाजूला माझं.
मी स्वतःच्या पत्रांना मागे टाकत एकदम व्हिएन्नात अवतरलोय. ती पत्रं अजून तुला मिळायची आहेत. (या गोष्टीचा मला नंतर विशेष त्रास झाला). असं असलं तरी तुला मी येणार हे कळलेलं आहे आणि मी तुला भेटणारही आहे. सुदैवानं मी एकटा नाहीये (मला त्याच वेळी याचा खेदही झाला). एक छोटा ग्रुप माझ्याबरोबर आहे. त्यात एक मुलगीही आहे. पण मला त्या लोकांविषयी काही माहिती नाहीये. ते जणू माझे कनिष्ठ कर्मचारी आहेत. ते गप्प बसले तर फार बरं होईल, पण ते बोलायचे थांबतच नाहीत. बहुतेक माझ्या प्रकरणांविषयी बोलत असावेत. मला फक्त त्यांची कुजबूज ऐकू येतेय. त्यानं मी काहीसा निरुत्साही होतो: मला काही समजत नाही आणि समजून घ्यायचंही नाही. मी माझ्या घराच्या उजवीकडे असलेल्या फुटपाथच्या कडेवर उभा राहतो आणि तुझ्या घराकडे बघतो. तुझं घर म्हणजे छोटा टुमदार बंगला आहे. त्याच्या समोरच्या भागात सुंदर, साधी, बंदिस्त असा दगडी सज्जा आहे. तो दुसऱ्या मजल्यापर्यंत जातो.
मग अचानक नाश्त्याची वेळ होते. सज्जामध्ये टेबल मांडलेलं आहे. मी लांबून बघतो. तुझा नवरा येतो. उजवीकडच्या वेताच्या खुर्चीत बसतो. तो अजून अर्धवट झोपेत आहे. तो हात लांबवून ताणतो. मग तू येऊन टेबलामागे बसतेस. मला तुझी पूर्णाकृती दिसते. पण अंतर जास्त असल्यामुळे तपशील कळत नाहीत. मात्र मला तुझा नवऱा जास्त स्पष्ट दिसतो.- नक्की का ते माहित नाही, पण तुझी आकृती मला निळसर-पांढरी, प्रवाही, भुतासारखी दिसते. तू सुद्धा हात पसरलेले असतात, पण ते ताणण्यापेक्षा एखादा विधी करत असल्यासारखे भासतात.
त्यानंतर थोड्याच वेळात -पण आता पुन्हा आदल्या दिवशीची संध्याकाळ असते- तू माझ्याबरोबर बाहेर फूटपाथवर उभी असतेस. माझा एक पाय रस्त्यावर आहे, मी तुझा हात धरलाय. अत्यंत घाईघाईत आपलं संभाषण सुरु होतं. त्यातली वाक्यं अतिशय छोटी असतात. हे संभाषण झरझर पुढे सरकतं आणि जवळजवळ विनाव्यत्यय पूर्ण स्वप्नभर सुरु राहतं.
मला ते सगळं संभाषण सांगता येणार नाही; पण फक्त पहिली दोन आणि शेवटची दोन वाक्यं आठवतात. मधला सगळा भाग अतिशय त्रासदायक होता. तो तपशीलात सांगणं अशक्य आहे. तुला शुभचिंतन करण्याऐवजी मी तुझ्यासमोर उभा राहून कशाच्यातरी उत्तरादाखल म्हणतो: ’’ माझ्या कल्पनेतली तू वेगळी होतीस.’’ त्यावर तू म्हणतेस, ‘’ खरंतर, तू थोडा जास्त स्मार्ट असशील असं मलाही वाटलं होतं.’’ (प्रत्यक्षात तू जास्त अस्सल व्हिएन्नीज भाषेत काहीतरी बोललीस, पण आता मी ते विसरलोय.)
ही ती पहिली दोन वाक्यं. (त्यावरुन आठवलं, मी अगदी अट्टल संगीतशत्रू आहे हे तुला माहितिय का, किमान माझ्या परिचितांमध्ये तरी माझ्यासारखा अ-सांगितिक माणूस कोणीच नाहीये) या दोन वाक्यात जणू सगळं ठरुन गेल्यासारखं झालं. बाकी उरलंच काय? तरीही आपण दुसऱ्या भेटीची योजना आखायला सुरुवात करतो: तुझ्या चेहऱ्यावर अतिशय धूसर भाव असतात, मी न थांबता प्रश्न विचारत राहतो. मग माझ्या बरोबल आलेलं कुणीतरी संभाषणात हस्तक्षेत करत, मला व्हिएन्ना शहराजवळ असलेलं कृषी महाविद्यालयसुद्धा बघायचं आहे असं सांगतं. तेव्हा अचानक माझ्याकडे वेळ असल्याचं लक्षात येतं; ते सगळे उपकारबुद्धीनं मला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. माझ्या ते लक्षात येतं, पण तंमी त्यांच्याबरोबर स्टेशनवर जातो. तिथून जाण्याची निकड बघून तू प्रभावित होशील असं मला वाटत असतं. आपण सगळेच स्टेशनवर जातो, पण तेव्हा मी ते कृषी महाविद्यालय जिथे आहे त्या ठिकाणाचं नावच विसरलेलो असतो. आपण सगळे भल्या मोठ्या टाईमटेबल्ससमोर उभे राहतो. ते सगळे स्टेशन्सच्या नावावरुन बोट फिरवत मला ‘हे नाव होतं का?’ असं विचारत राहतात, पण त्यातलं कुठलंच नाव नसतं.
मधल्या वेळेत मी तुझं निरीक्षण करतो, पण तू कशी दिसतेस याच्याशी मला काहीच देणंघेणं नसतं- मला फक्त तुझे शब्दच महत्वाचे वाटतात. तू तुझ्यासारखी अजिबात दिसत नाहीस. तू प्रत्यक्षात आहेस त्यापेक्षा गडद वर्णाची, बारीक चेहऱ्याची असतेस- असंही, गुबगुबीत चेहऱ्याची व्यक्ती एवढी निर्दय कशी असेल? (पण ते खरंच क्रौर्य होतं का?) तू घातलेला सूट माझ्या सुटाच्या कापडाचाच असतो, शिवाय अतिशय पुरुषीसुद्धा. ते मला अजिबात आवडत नाही. पण मग मला तुझ्या पत्रातलं एक वाक्य आठवतं (ती कवितेची ओळ: माझ्याकडे दोनच कपडे आहेत, पण तरीही मी चांगली दिसते) आणि तुझ्या शब्दांचा माझ्यावर एवढा जबरदस्त प्रभाव असतो, की तेव्हापासून मला तुझे कपडे एकदम आवडायला लागतात.
आता संपत आलंय. माझे साथीदार अजून टाईमटेबलकडे बघत असतात, आम्ही एका बाजूला उभे राहून बोलत असतो. आमचं शेवटचं बोलणं काहीसं असं असतं: उद्या रविवार आहे. रविवारी तुला वेळ असेल असं मी गृहीत धरणं ही तुझ्यासाठी अकल्पनीय, अगदी वैतागवाणी, गोष्ट आहे. पण शेवटी तू नाईलाजानं तयार होतेस आणि तू माझ्यासाठी ४० मिनिटं काढशील असं सांगतेस. (या संभाषणातली सगळ्यात भयंकर गोष्ट अर्थातच त्यातले शब्द नव्हते, तर तुझा सूर होता, तसंच या सगळ्यातली निरर्थकता होती आणि तुझे न उच्चारलेले शब्द,’’ मला यायचं नाहीये, त्यामुळे मी आले तर तुला काय फरक पडतो?’’) पण तुझ्याकडे ही ४० मिनिटं केव्हा असतील हे मला कळू शकत नाही. ते तुलाही माहित नसतं. तू तीव्र एकाग्रतेनं आठवूनही तुला ते सांगता येत नाही. शेवटी मी विचारतो,”मी दिवसभर वाट बघू का?” ‘’हो.’’ तू उत्तरतेस आणि तुझ्यासाठी थांबलेल्या लोकांकडे वळतेस. तू अजिबात येणार नाहीस, असा तुझ्या उत्तराचा अर्थ असतो आणि तू मला वाट बघायची दिलेली परवानगी हीच एकमेव सवलत असते. ‘’मी थांबणार नाही’’ मी स्वतःशी शांतपणे म्हणतो. तू ते ऐकलं नसशील असं वाटून आणि तो माझा शेवटचा हुकुमाचा एक्का असल्यामुळे तुझ्याकडे पाहून ते शब्द निराशेनं ओरडतो. तू पर्वा करत नाहीस, कारण तुला काही फरक पडणार नसतो.
मी हतबुद्ध होत शहरात परततो.
पण या नंतर दोन तासांनी पत्रं आणि फुलं येतात आणि त्याबरोबर दयार्द्रता आणि दिलासाही.
तुझा एफ.
ता.क. मिलेना, तुझा पत्ता पुन्हा अस्पष्ट आहे. पोस्ट खात्यानं त्यावर गिरवून सगळं बरबटून टाकलंय. माझ्या सुरुवातीच्या विनंतीनंतर पत्रावरचा पत्ता अप्रतिम होता. सुंदर, वैविध्यपूर्ण, पण नीट वाचता न येण्याजोग्या हस्ताक्षरांचा आदर्श संग्रहच. पोस्ट खात्याकडे माझे डोळे असते, तर कदाचित फक्त त्यांनाच तुझा पत्ता वाचता आला असता, दुसऱ्या कोणालाही ते शक्य नाही. पण शेवटी ते पोस्ट ऑफिस आहे...
काल मला तुझं आणखी एक स्वप्न पडलं. आपण समोरासमोर बसलो होतो आणि तू मला दूर सारत होतीस, रागानं नव्हे, तर मैत्रीच्या नात्यानं. मी खूपच उदास होतो. तू मला दूर सारत होतीस म्हणून नाही, तर मी तुला एखाद्या मुक्या मुलीसारखं वागवत होतो, तू मला जे सांगत होतीस त्याकडे दुर्लक्ष करत होतो. किंवा कदाचित असं असेल की मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत नसून मला काय बोलावं हे सुचत नसेल. थोडक्यात, मी आधीच्या स्वप्नापेक्षा जास्त खिन्न मनस्थितीत तिथून निघून गेलो.
मला आत्ता कुणाच्या तरी घरी वाचलेल्या काही ओळी आठवतायत:’’ माझी प्रिया अग्निशिखा आहे. तिनं मला स्वतःत बंदिस्त केलंय. पण ती बंदिस्त असलेल्यांना मार्ग दाखवत नाही, तर फक्त जे तिच्याकडे बघू शकतात त्यांना दाखवते.’’
तुझा
(आता मला स्वतःचं नावंही आठवेनासं झालंय. ते प्रत्येक पत्रागणिक लहान होत गेलं आणि आता ते तुझं झालंय.)
सत्य सांगणं अवघड असतं, कारण सत्य एकच असतं, ते जिवंत असल्यामुळे त्याचा चेहरा चैतन्यमय आणि सतत बदलणारा असतो.(“ते प्रत्यक्षात सुंदर असेलच असं नाही, पण देखणं असू शकतं”). मी तुला सोमवारी रात्री उत्तर पाठवलं असतं तर ते भीषण ठरलं असतं, कारण मी बिछान्यात एखाद्या कपाटावर झोपावं तसा पडून राहिलो होतो आणि रात्रभर तुला पाठवायच्या उत्तराची मनाशी जुळवाजुळन करत होतो, तुझ्यापाशी तक्रार करत होतो, स्वतःला शिव्या देत तुला माझ्यापासून घाबरवून दूर पिटाळण्याचा प्रयत्न करत होतो (याचं एक कारण असंही आहे, की तुझं पत्र मला संध्याकाळी उशीरा मिळालं आणि रात्री तुला उत्तर लिहायच्या कल्पनेनं मी खूप हळवा आणि अस्वस्थ झालो होतो.) मग मी क्लोबेनश्टाईनला जाणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये बसून बोल्झानोसाठी निघालो. १२००मीटर उंचावर गेल्यावर डोलोमाईटसच्या पहिल्या साखळीसमोर मी शुद्ध, जवळजवळ थंड हवेत श्वास घेतला, अर्थात तेव्हा माझी मनस्थिती फारशी चांगली नव्हती. नंतर तिथून परत येताना मी तुला पुढील ओळी लिहिल्या. त्या मी आता उतरवून काढतोय. तरीही किमान आज तरी मला हे खूप कठोर वाटतंय; तर दिवस असे बदलतात:
शेवटी मला एकांत मिळालाय. इंजिनियर बोल्झानोलाच राहिलाय आणि मी परत येतोय. तो इंजिननियर आणि इथला आसमंत आपल्या मध्ये यावे याचं मला फारसं दुःख वाटत नाहीये, कारण मी तिथे पूर्णांशानं नव्हतोच. मी कालची रात्र १२.३० वाजेपर्यंत तुझ्या सहवासात होतो, लिहित होतो, आणि त्याहून जास्त विचार करत होतो. मी सकाळी सहा पर्यंत जागा होतो. जराही झोप लागली नाही. मग उडी मारुन उठून बसलो, एखाद्या अनोळखी माणसानं दुसऱ्या अनोळखी माणसाला बिछान्यातून उठवल्यासारखा. ते एका अर्थी बरंच झालं, नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि दिवसभर मेरानमध्ये डुलक्या काढल्या असत्या. या प्रवासानं माझ्या जाणिवेला जेमतेमच स्पर्श केला आणि त्याची स्मृती माझ्या आठवणींत अगदी अंधुक असेल. अर्थात, त्यानं काही फरक पडत नाही. रात्र अशी गेली, कारण तुझ्या पत्रामुळे तू पुन्हा एकदा माझ्यातली सगळी जुनी भुतं जागवलीस. ती नेहमी एक डोळा मिटून आणि एक उघडा ठेवून संधीची वाट पहात दबा धरुन बसलेली असतात.( तुझी दृष्टी फार भेदक आहे. त्याला एरवी तसा अर्थ नव्हता, कारण अशा दृष्टीची याचना करणारे लोक मी रस्त्यावर फिरताना पाहिलेत, पण तुला तुझी दृष्टी आणि शक्ती त्या पलिकडे जाण्यासाठी कशी वापरायची ते चांगलं माहित आहे; पलिकडे पाहण्याची ही क्षमताच फार महत्वाची आहे आणि तुझ्याकडे नेमकी तीच आहे). हे अर्थातच भीतिदायक आहे. त्यानं मला अक्षरशः घाम फुटलाय. (फक्त या अनाकलनीय शक्तीमुळे, मी शपथेवर सांगतो). एका अर्थी हे चांगलंच आहे, निरोगी आहे. मी या शक्तींचे खेळ बघतोय आणि मला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आहे. तरीही ‘’ तू व्हिएन्ना सोडलं पाहिजेस’’ या माझ्या वाक्याचा तू लावलेला अर्थ पूर्ण बरोबर नाही. मी ते वाक्य असंच जाता जाता लिहिलं नव्हतं. (ते तुझे सगळे रिपोर्टस पाहिल्यावरच म्हटलं होतं; त्या आधी मला ते जाणवलंही नव्हतं; त्यावेळी मी एवढी स्वतःत मश्गुल होतो, की तुझं तातडीनं व्हिएन्ना सोडणं मला अगदी नैसर्गिक वाटलं. मला वाटतं -अगदी स्वार्थीपणे- तुझ्या नवऱ्याला ज्या गोष्टींची थोडीशी चिंता वाटते, त्या माझ्यावर दहापट, शंभरपट जास्त जोरात आदळतात आणि माझ्या ठिकऱ्या उडवून टाकतात. हे तुझ्याबाबतीत माझं जे होतं त्यापेक्षा वेगळं नाही. मला भौतिक गोष्टींचं ओझं वाटत नाही (मी फारसं कमवत नाही, पण जे कमावतो ते आपल्या दोघांना सहज पुरेल एवढं नक्कीच आहे. अर्थात, आजारपण गृहीत न धरता), शिवाय, माझ्यात जोवर विचार करण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता असते, तोवर मी प्रामाणिक असतो. (आधीही मी प्रामाणिक होतोच, पण हे उपयुक्त निरीक्षण नोंदवणारी तू पहिलीच). मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते- आणि डोळे टक्क उघडे ठेवूनही मला ही भीती जाणवते, इतकी की मी त्यात असहाय्यतेनं बुडून जातो- ( या भीतीमध्ये मी जसा खोलवर बुडते तशी गाढ झोप लागली तर मी जिवंतच राहणार नाही)- तर मला ज्या गोष्टीची भीती वाटते ती म्हणजे माझ्या आत स्वतःविरुद्ध सुरु असलेला कट (माझं वडिलांना लिहिलेलं पत्र वाचलंस तर तुला हे जास्त चांगलं समजून घेता येईल, अर्थात पूर्णपणे नाही, कारण ते पत्र पूर्णपणे एकाच विषयावर केंद्रित आहे), तर माझ्या आत सुरु असलेला हा कट एकाच गोष्टीवर आधारित आहे. ती म्हणजे माझ्यासारखा बुद्धीबळाच्या खेळात एखाद्या प्याद्यापेक्षाही क्षुद्र असलेला माणूस आता खेळाचे नियम झुगारुन आणि खेळात गोंधळ निर्माण करुन वजीराची जागा घेऊ पाहतोय. पुढे कदाचित मला राजाची जागाही घ्यावीशी वाटण्याची शक्यता आहे किंवा कदाचित पूर्ण पटच काबीज करावासा वाटेल. शिवाय, हे घडायचं असेल तर ते इतर, एखाद्या याहून जास्त अमानुष मार्गानं घडावं लागेल. म्हणून मी तुला केलेली सूचना तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठीच अर्थपूर्ण आहे. सध्या ही एकच गोष्ट संशयापलिकडची, रोगट नसलेली आणि मला निर्विवाद आनंद देणारी आहे.
हे झालं कालचं. आज, उदाहरणार्थ, मी नक्कीच व्हिएन्नाला येईन. पण आज हा आज आहे आणि उद्या हा उद्या, त्यामुळे मला स्वतःला थोडं स्वातंत्र्य द्यायला आवडेल. ते काही असलं तरी मी तुला चकित करणार नाही, मी गुरुवारनंतर आणि मंगळवारपूर्वी येणार नाही. मी येणार असलो तर तुला हवाई पोस्टानं तसं पत्र पाठवेन- तिथे आल्यावर तुझ्याशिवाय इतर कुणाला भेटता येणार नाही, हे मला पक्कं ठाऊक आहे- मी स्यूडबानहॉफला येईन. अजून मी कुठे जायचं ते ठरवलेलं नाही. त्यामुळे मी स्यूडबानहॉफजवळच कुठेतरी मुक्काम करेन; तू स्यूडबानहॉफमध्ये नक्की कुठे शिकवतेस हे मला माहित नाही, ही किती शरमेची बाब आहे. तिथे मी ५ वाजता तुझी वाट बघू शकतो. (हे वाक्य मी कुठल्यातरी परिकथेत दुसऱ्या एखाद्या वाक्याशेजारी वाचलं होतं, तेव्हा पासून ती दोघं एकत्र सुखानं नांदत आहेत.) आज मी व्हिएन्नाचा नकाशा पाहिला. तुला राहण्यासाठी एकाच खोलीची गरज असताना त्यांनी एवढं अवाढव्य शहर बांधावं याचं कारण मला कळू शकलं नाही.
- एफ
ता.क. मी पोलॉकलाही पत्र लिहिली आहेत. ती त्यानं पोस्टातून घेईपर्यंत तिथे राहतील.
शनिवार संध्याकाळच्या पत्राविषयी तू काय म्हणणार आहेस हे मला अजून माहित नाही आणि बराच काळ कळणारही नाही. ते काही असलं तरी आत्ता मी रविवारच्या ड्यूटीवर ऑफिसात बसलोय. (ही आणखी एक अजब संस्था आहे. रविवारची ड्यूटी म्हणून इथे नुसतं बसून रहायचं असतं, जेणेकरुन इतर माणसं रविवार म्हणून कमी काम करतील- मीही तेवढंच करतो).
बाहेर विचित्र हवा आहे. एका क्षणात पाऊस पडेल असं वाटतं आणि पुढच्या क्षणी ढगांआडून सूर्यप्रकाश डोकावतो आणि माझ्या लेखनात व्यत्यय आणतो. सध्या माझं आयु्ष्यही अगदी असंच आहे. खिन्न आणि जड. माझ्यात आयुष्याबद्दल आसक्ती आहे असं तू लिहिलं होतंस, पण आज ते फारसं खरं नाही. आज दिवसा किंवा रात्री माझ्यासाठी काय महत्वाचं आहे बरं? तरीही (हा चांगला शब्द आहे, वेळोवेळी आठवला पाहिजे), माझ्यात ही जीवनेच्छा आहे खरी, पण ती फारशी पृष्ठभागावर येत नाही. शिवाय माझं स्वतःवर फारसं प्रेम नाही. मी संचालकांच्या दरवाजासमोर बसलोय. संचालक आत नाहीये. पण तो दरवाजा उघडून बाहेर आला आणि ‘’ मलाही तू आवडत नाहीस, म्हणूनच मी तुला कामावरुन काढून टाकतोय” असं म्हणाला तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही. “धन्यवाद” मी म्हणेन, “मला त्याची गरज होती. आता मी व्हिएन्नाला जाऊ शकेन” “तसं असेल तर,” तो म्हणेल, “आता तू मला पुन्हा आवडायला लागला आहेस आणि मी तुला परत कामावर घेतोय.” “अरेरे,” मी म्हणेन, “ म्हणजे आता पुन्हा मला जाणं शक्य नाही.” “नक्कीच जाऊ शकतोस,” तो म्हणेल,” कारण आता पुन्हा तू माझा नावडता झालायस आणि मी तुला काढून टाकतोय.” आणि हे असंच चालत राहिल. न संपणारी गोष्ट.
आज प्रागला परतल्यावर बहुतेक पहिल्यांदाच मला तुझं स्वप्न पडलं. पहाटे पडलेलं स्वप्न छोटं आणि जड. जागरणाच्या रात्रीनंतर आलेल्या झोपेसारखं. मला त्यातले फारस तपशील आठवत नाहीत. तू प्रागमध्ये होतीस. आपण फर्डिनान्डस्ट्राशंवरुन चालत होतो. व्हिलिमेकवरुन गोदीच्या दिशेनं. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं तुझ्या ओळखीचे काही लोक आपल्या समोरुन गेले. आपण त्यांच्या दिशेनं वळलो. तू त्यांच्याशी बोललीस. तू बहुतेक क्रासाविषयीही बोलली असावीस (तो प्रागमध्ये नाही हे मला माहित आहे, मी त्याचा पत्ता शोधून काढीन). तू नेहमीसारखंच बोललीस, पण तू काहीतरी लपवत होतीस, समजायला अशक्य असं काहीतरी, त्यात काहीतरी नकारासारखं होतं. मी त्याचा उल्लेख केला नाही, पण मी स्वतःला शाप दिला. अर्थात असं करताना मी स्वतःवर आधीच असलेल्या शापाचा पुनरुच्चार केला. नंतर आपण कॅफेमध्ये होतो, बहुतेक कॅफे यूनियन असावं. (ते आपल्या वाटेतच होतं, शिवाय ते त्या संध्याकाळी राइनरचं शेवटचं कॅफे होतं). आपल्या टेबलजवळ एक पुरुष आणि एक मुलगी बसले होते, पण आता मला ते अजिबात आठवत नाहीत. तिथे बराचसा दस्तयेवस्कीसारखा दिसणारा- पण तरुण- असा एक माणूस होता. त्याची दाढी आणि केस दाट काळे होते. आणि चेहऱ्याची सगळी वैशिष्ट्यं अतिशय ठळक होती. उदा. भुवया, डोळ्यांवरचे उंचवटे इ. शिवाय तू तिथे होतीस आणि मी सुद्धा. तुझा मूळ स्वभाव बदलला नव्हता, पण तो नकार होताच. तुझ्या चेहऱ्यावर पावडर लावलेली होती-मी त्या दुःखी वैशिष्ट्यावरुन नजर हटवू शकत नव्हतो. शिवाय ती खूपच जास्त आणि कशीतरी गबाळ्या पद्धतीनं लावली होती. तेव्हा हवा बहुतेक गरम होती आणि पावडरचे ओघळ तुझ्या चेहऱ्यावर उतरले होते; मला ते अजून दिसतायत. तू पावडर का लावली आहेस, हे विचारायला मी पुढे वाकत होतो. मी हा प्रश्न विचारायला लागलो की तू मला मध्येच थांबवून म्हणायचीस, (मी म्हटलं ना, नकार लक्षात येत नव्हता) “काय हवंय तुला?”. पण मी तो प्रश्न विचारु शकलो नाही; माझी हिंमतच झाली नाही; आणि हे पावडर वगैरे लावणं ही माझी एकप्रकारे परीक्षा होती असं मला वाटलं. अतिशय महत्वाची परीक्षा, मी त्यामागचं कारण विचारावं यासाठी. पण माझी हिंमत झाली नाही खरी. अशाप्रकारे त्या उदास स्वप्नानं मला झाकोळून टाकलं. त्या दस्तयेवस्कीसारख्या दिसणाऱ्या माणसानंही मला ताप दिला. त्याचं माझ्याशी वागणं तुझ्यासारखं होतं, तरीही त्यात थोडा फरक होता. मी त्याला काही विचारलं की तो अतिशय मैत्रीपूर्ण,आस्थेवाईक, सहज तऱ्हेनं पुढे वाकायचा, पण माझ्याकडे बोलायला विषय नसला-आणि तसं वारंवार व्हायचं- की तो मागे सरकून बसायचा, पुस्तकात डोकं घालायचा आणि सगळ्या जगाला, विशेषतः मला, विसरुन स्वतःच्या दाढी आणि केसांआड दडायचा. मला हे सगळं का सहन झालं नाही कुणास ठाऊक; मी त्याला वारंवार प्रश्न विचारुन माझ्याकडे वळवायचो आणि माझ्याच चुकीमुळे त्याचं वारंवार माझ्याकडे दुर्लक्ष व्हायचं- त्याला माझा इलाज नव्हता.
माझ्याकडे एक छोटंसं सांत्वन आहे, आज तू मला नाही म्हणू शकत नाहीस. माझ्यासमोर ट्रिब्युनाचा अंक पडलाय. मला तो आदेश झुगारुन विकत घ्यावा लागला नाही, तो मी माझ्या मेव्हण्याकडून घेतला, नव्हे, मेव्हण्यानं तो मला दिला. कृपया मला हा आनंद घेऊ दे. असंही, त्यात काय आहे याच्याशी मला देणंघेणं नाही. पण मला आवाज ऐकू येतो, माझा आवाज! मला हा आनंद घेऊ दे. असाही मी जगाच्या कोलाहलानं वेढलेला आहे. शिवाय तुझा पूर्ण लेखही सुंदर आहेच! हे कसं घडतं ते मला कळत नाही. मी तो फक्त माझ्या डोळ्यांनीच वाचला, मग माझ्या रक्ताला त्याच्या वाहिन्यांमधून तो वाहतोय हे एवढ्या लवकर कसं समजलं? आणि यात गंमत आहे. साहजिकच मी दुसऱ्या प्रकारचा माणूस आहे. माझ्या पायांवरचं वजन मी माझी मालमत्ता आहे आणि माझ्या अत्यंत खासगी गोष्टींच्या प्रकाशनाला मी कधीही परवानगी देणार नाही. मी राजहंस आहे, असं कुणीतरी म्हटलं होतं. ती काही स्तुती नव्हती. पण हे मजेशीर आहे. मी हात पसरुन तुझ्यापासून लोकांना लांब ठेवणारा राक्षस आहे असं मला वाटायला लागलंय. या राक्षसाचं अवघड आहे. त्याला लोकांना तुझ्यापासून लांब ठेवायचंय खरं, पण त्याचवेळी तुझं बोलणं ऐकायचंय आणि तुला पहायचंही आहे. हे लोक बहुधा डुक्करतोंडे आणि अस्सल मठ्ठ आहेत. स्त्रिया त्याहून जास्त. त्या बहुतेक ओरडतायत, “ फॅशन कुठे आहे? फॅशन कधी दिसणार? आतापर्यंत आम्ही फक्त मिलेनालाच पाहिलंय.” त्या फक्त एवढंच ओरडतायत आणि मला तेच ऐकू येतंय. प्रत्यक्षात मी बाकीचं सगळं जग गोळा करुन मुंछहाउसेन जशा बंदुकीच्या गाड्या जिब्राल्टरमध्ये फेकतो, तसं खोल समुद्रात फेकून दिलंय. काय म्हणालीस? बाकीचं सगळं? खोटं बोलण्याचं काय? ऑफिसात खोट बोलू नये? ठीक. तर हा मी इथे बसलोय. आधीसारखाच उदास. उद्या तुझ पत्र येणार नाहीये आणि स्वप्न ही मी तुझ्याकडून ऐकलेली शेवटची खबरबात असणार आहे.
आज तसा उशीरच झालाय. कालचा दिवस बऱ्यापैकी उदास गेला. उद्या कदाचित तुझं एकही पत्र येणार नाही. माझ्याकडे तुझं शनिवारचं पत्र आहे. रविवारचं परवाशिवाय मला मिळणार नाही. त्यामुळे उद्याचा दिवस पत्राच्या प्रभावापासून मुक्त असेल. तुझ्या पत्रांनी मी ज्या प्रकारे दिपून जातो, ते अजब आहे, मिलेना. तुला काहीतरी झालं असावं असं मला आठवडाभर किंवा त्याहून जास्त काळ वाटतंय. ते अचानक किंवा हळूहळू झालं असेल, मूलभूत किंवा तात्पुरतं असेल, स्पष्ट किंवा अर्धसुप्त असेल; ते कसंही असलं तरी ते आहे याची मला जाणीव आहे. मला ते पत्रातल्या तपशिलांतून तेवढं कळलं नाही-तुझ्या पत्रांत तसे तपशील असले तरीही- पण तुझी पत्रं आठवणींनी भरलेली असतात हे बोलकं आहे. त्याही अतिशय खास आठवणी. तू जरी सगळ्या प्रश्नांची नेहमीप्रमाणेच उत्तरं देत असलीस, तरी प्रत्यक्षात काहीतरी बिनसलंय. तू विनाकारण खिन्न असतेस. तुला मला दावोसला पाठवायचं असतं. तुला अचानक मला भेटावंसं वाटतं.(ते सुद्धा इथे न येण्याचा माझा सल्ला लगेच स्वीकारल्यानंतर, आपल्या भेटीसाठी व्हिएन्ना योग्य ठिकाण नाही असं जाहीर केल्यानंतर आणि मी निघण्याआधी आपणं भेटू नये असं सांगितल्यावर तुझ्या गेल्या दोन-तीन पत्रांमध्ये भेटण्यासाठी ही घाई अजब आहे! यामुळे मला खरंतर आनंद व्हायला हवा, पण तो होत नाही, कारण तुझ्या पत्रांमध्ये एक छुपी भीती आहे- ती माझ्याबद्दल आहे की माझ्यामुळे, कुणास ठाऊक- त्याशिवाय तुला ही जी भेटण्याची निकड आणि तातडी वाटतेय त्यातही एक भीती आहे. काही का असेना, आपल्या भेटीची शक्यता निर्माण झाली याचा मला अतिशय आनंद आहे आणि ही शक्यता ठोस आहे. तुला जर एखादी रात्र व्हिएन्नाबाहेर काढता येणार नसेल, तरीही आपण काही तास एकत्र घालवू शकतो. तू रविवारी सकाळी ७ च्या जरा आधी ग्मुन्ड इथून एक्सप्रेस पकड- मी गेल्या वेळी त्याच गाडीनं आलो होतो- मग तू सकाळी १० वाजता तिथे पोहोचशील. मग मी तुला भेटेन आणि मला संध्याकाळी ४.३० शिवाय परतायला गाडी नसल्यामुळे आपल्याला चांगले सहा तास एकत्र मिळतील. मग तू संध्याकाळच्या व्हिएन्ना एक्स्प्रेसनं परत जा. ती रात्री ११.१५ वाजता पोहचेल. ही एक छान छोटीशी रविवारची सहल होईल.
म्हणूनच मी एवढा अस्वस्थ आहे. खरंतर असस्थ नाहीये, कारण तुझा प्रभावच तसा शक्तीशाली आहे. तू तुझ्या पत्रांमध्ये काहीतरी लपवत असल्यामुळे किंवा तुला ते लपवावं लागत असल्यामुळे किंवा तुझ्याकडून ते नकळत लपवलं जात असल्यामुळे, मी जास्त अस्वस्थ असायच्या ऐवजी शांत आहे: बघ माझा तुझ्यावरचा विश्वास केवढा मोठा आहे, तू कशीही असलीस तरी. मला वाटतं, तू काही लपवत असशील तर तुला तसं करण्याचा हक्क आहे. पण मी या सगळ्यात शांत राहू शकतो याचं आणखी एक विलक्षण कारण आहे. तुझ्यात असं काहीतरी खास आहे की जे मी इतर कोणातही पाहिलं नाहीये आणि इतर कुणामध्ये मी त्याची कल्पनाही करु शकत नाही. ते तुझ्या अस्तित्वाच्या खोलवर आतून येत असावं. जर कुणावर त्याचा प्रभाव पडत नसेल तर तो त्याचा दोष आहे. ते म्हणजे तुझी इतरांना त्रास देण्याची असमर्थता. ती कणवेपोटी येत नाही, तर तू कुणाला त्रास देऊच शकत नाहीस. हे खरंच अविश्वसनीय आहे, अद्भुत आहे. मी त्याच्याविषयी दुपारपासून विचार करतोय, पण आता ते लिहून काढायची माझी हिंमत नाही. हे सगळं तुला जवळ घेण्याचं एक मोठ्ठं निमित्त असू शकेल.
आता झोपायची वेळ झाली. तू आत्ता, सोमवारी रात्री ११ वाजता काय बरं करत असशील?
मंगळवार
तुला मानवी स्वभावाचं किती कमी ज्ञान आहे, मिलेना. मी नेहमीच ते सांगत आलोय. ठीक आहे, एल्स आजारी आहे. त्यामुळे मला व्हिएन्नाला जावं लागू शकतं. क्लारा मावशी अत्यवस्थ (स्थितीत?) आहे. ते सगळं सोड, मी आमच्या संचालकांशी क्लारा मावशीबद्दल निर्विकार चेहऱ्यानं बोलू शकेन असं तुला वाटतं? (अर्थात, - आणि यात मानवी स्वभावाचं अधिक ज्ञान आहे- प्रत्येक ज्यूला एक क्लारा मावशी असतेच हे खरं असलं, तरी माझी मावशी कित्येक वर्षांपूर्वी या जगातून गेलेली आहे.) त्यामुळे हे केवळ अशक्य आहे. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही की आता तिला आमची गरज नाही. तिला हवं तर मरु दे. तिची काळजी घ्यायला ऑस्कर आहे. पण हा ऑस्कर आहे तरी कोण? क्लारा मावशी ही क्लारा मावशी आहे, पण ऑस्कर कोण आहे? कोणी का असेना, तो तिच्याबरोबर आहे खरा. तो स्वतः आजारी पडला नाही म्हणजे मिळवली. लंपट लेकाचा.
------
शेवटी एकदाच पत्र आलं! आणि काय पत्र होतं ते. मी सुरुवातीला जे म्हणालो ते संध्याकाळच्या पत्रांना लागू होत नाही. पण ती पत्रं माझा अस्वस्थपणा असा नाहीसा करुन टाकत नाहीत (मी शांत आहे हे सांगितलं होतंच). आपण भेटतोय हे किती छान आहे. मी उद्या किंवा परवा तुला तार पाठवेन. (ओट्ला आजच पासपोर्ट काढण्यासाठी रवाना झालीय). या शनिवारी मी ग्मुन्डला जाणार आहे का असं ती विचारत होती. (व्हिएन्नाला जायला आता उशीर झालाय, कारण रविवारच्या एक्सप्रेससाठी तुला आतापर्यंत तिकिट काढावं लागलं असतं). मग तू सुद्धा येऊ शकतेस का हे मला तार पाठवून कळव. त्यामुळे माझी तार लवकर मिळण्यासाठी संध्याकाळी पोस्टात जात रहा. ते कसं असेल बघ. मी तार करेन: “अशक्य’’.- म्हणजे मी या आठवड्यात येऊ शकणार नाही. तसं असेल तर मी तुझी तार येण्याची वाट बघणार नाही आणि आपण बाकी सगळं पत्रांतून बोलू. (मग आपण येत्या ४ आठवड्यांमध्ये भेटणार की नाही हे तू परदेशी जातेस का, यावर अवलंबून असेल. तू कदाचित माझ्यापासून आणखी दूर जाशील, तसं झालं तर, मला वाटतं, आपण एकमेकांना महिनाभर भेटू शकणार नाही). किंवा मी ‘’ शनिवारी ग्मुन्डला येऊ शकतो’’ अशी तार करेन. मग तू एकतर ‘’अशक्य’’ किंवा ‘’ शनिवारी ग्मुन्डला ये’’ किंवा ‘’ रविवारी ग्मुन्डला ये’’ असं उत्तर पाठव. शेवटचे दोन पर्याय म्हणजे आपण भेटणार हे नक्की. मग आणखी तार पाठवण्याची गरज नाही. (नाही: तुला माझी तार मिळाली की नाही याची मी खातरजमा करेनच), मग आपण दोघंही ग्मुन्डसाठी निघू आणि येत्या शनिवार किंवा रविवारी एकमेकांना भेटू. हे सगळं किती सोपं वाटतंय.
---------
जवळ जवळ दोन तास गेले. ओट्टो प्रिक इथे आला होता. मला कंटाळा आलाय. आपण कधी भेटणार? मी तुझं नाव दीड तासात तीन पेक्षा जास्त वेळा का ऐकत नाही? मी कितीही निमित्त सांगितली तरी मी व्हिएन्नामध्ये होतो हे तुला कबूल करावं लागेल. भले मी कोणाशीही बोललो नसेन- आपलं भेटणं हे “बोलणं’’ नव्हतंच, नाही का? तू आहेस कुठे? छोटा बंगला असलेल्या गावाच्या वाटेवर? मी सुद्धा तिथेच निघालोय. प्रवास लांबचा आहे. पण आता त्याचं दुःख करत बसू नकोस, प्लीज. काहीही झालं तरी आता आपण निघालो आहोत, निघण्याशिवाय करण्यासारखं काही उरलं नाहीये.
प्रिय बाबा
तुम्ही मला अलिकडे विचारलंत की मी तुम्हाला घाबरतो असं मी का म्हणतो. नेहमीप्रमाणेच, मला तुमच्या प्रश्नाला काही उत्तर देता आलं नाही. याचं एक कारण असं की मला तुमची भीती वाटते आणि दुसरं असं की या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला खूप जास्त तपशिलात शिरावं लागेल आणि तेवढे तपशील बोलताना माझ्या लक्षात राहात नाहीत. आणि आता मी लेखी स्वरुपात जरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरी ते अपूर्णच असेल. कारण लिहितानासुद्धा तुमच्याशी संबंधित भीती आणि तिचे परिणाम आड येतील. शिवाय, या विषयाची व्याप्ती एवढी मोठी आहे की तो माझी स्मृती आणि तर्कशक्ती यांत मावणारा नाही.
तुमच्यासाठी हा विषय नेहमीच सोपा होता, किमान तुम्ही माझ्याशी आणि ढोबळपणे इतरांशीही बोलताना तरी तसं वाटायचं. तुमच्यासाठी हे थोड्याफार फरकानं असं होतं: तुम्ही आयुष्यभर कष्ट केलेत. तुमच्या मुलांसाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केलात. माझ्यासाठी सगळ्यांत जास्त. त्यामुळेच मी उच्च दर्जाचं आणि चांगलं आयुष्य जगू शकलो, मला हवं ते शिकण्याचं स्वातंत्र्य होतं आणि दैनंदिन चिंता असण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजेच, कोणत्याही प्रकारच्या चिंता असण्याचं कारण नव्हतं. तुम्ही यासाठी आमच्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा केली नाहीत, कारण “मुलांची कृतज्ञता” कशी असते हे तुम्हाला माहित होतं. पण आम्ही याबद्दल उपकृत असावं, किंवा किमान सहानुभूती दाखवावी अशी तुमची अपेक्षा होती. त्याऐवजी मी नेहमी तुमच्यापासून लपत आलो, माझ्या खोलीत, माझ्या पुस्तकांमध्ये, माझ्या व्रात्य मित्रांमध्ये किंवा अवास्तव कल्पनांच्या आड. मी तुमच्याशी कधीच स्पष्ट बोललो नाही; तुम्ही सिनॅगॉगमध्ये असताना मी कधीच तुमच्याकडे आलो नाही, तुम्हाला भेटायला फ्रान्त्झेन्सबादला आलो नाही, किंवा कधी कौटुंबिक जिव्हाळाही व्यक्त केला नाही. मी तुमचा व्यवसाय किंवा इतर आवडत्या गोष्टीमध्ये कधी रस घेतला नाही. फॅक्टरी तुमच्यावर सोडून मी निघून गेलो. ओट्लाच्या आडमुठेपणाला मी प्रोत्साहन दिलं आणि तुमच्यासाठी साधं बोटही उचललं नाही (तुम्हाला कधी थिएटरचं तिकिटही काढून दिलं नाही), पण माझ्या मित्रांसाठी मात्र मी सगळं करत असतो. जर तुम्हाला माझ्याविषयी थोडक्यात निवाडा करायचा असला, तर तुम्हा माझ्यावर थेट अयोग्य किंवा क्रूर वागण्याचा आरोप करणार नाही (कदाचित माझ्या अलिकडच्या लग्नाच्या योजनेचा अपवाद) तरी माझ्यावर थंडपणा, दुरावा आणि कृतघ्नपणाचा आरोप नक्कीच कराल. शिवाय तुम्ही ते आरोप अशाप्रकारे कराल की ती सर्वस्वी माझीच चूक आहे. जणू मी बटण दाबल्यावर सगळं नीट होईल. यात तुमची काहीच चूक नसेल. अर्थात, माझं भलं करण्याचा गुन्हा सोडून.
ही तुमची नेहमीची पद्धत. आपल्यात जो दुरावा आहे, त्यात तुमची काहीच चूक नाही हे खरं मानलं तरच तुमची ही पद्धत योग्य म्हणता येईल. पण तसं पाहिलं तर यात माझीही काहीच चूक नाही. जर मी हे तुम्हाला पटवून देऊ शकलो, तर कदाचित आपल्यात एक प्रकारची शांतता प्रस्थापित होऊ शकेल. अर्थात, पूर्ण नव्या आयुष्याला सुरुवात करणं काही शक्य नाही, कारण त्यासाठी आता आपल्या दोघांचीही वयं उलटून गेली आहेत. त्यानं तुमची सततची दूषणं थांबणार नाहीत, पण किमान त्यात घट तरी होण्याची शक्यता आहे. हे थोडं अजब वाटेल, पण मला काय म्हणायचं आहे याची तुम्हाला थोडी कल्पना आहे. उदाहरणार्थ, काही दिवसांपूर्वी तुम्ही मला म्हणालात, “तू माझा नेहमीच लाडका होतास, फक्त मी इतर वडिलांप्रमाणे तुझ्याशी वागलो नाही, कारण मला त्यांच्यासारखं वरवर प्रेम दाखवणं जमत नाही.’’ बाबा, त्याचं असं आहे, तुमच्या माझ्या बाबतीतल्या चांगुलपणाविषयी मला कधीच शंका नव्हती. पण तुमचं हे विधान मला चुकीचं वाटतं. तुम्हाला दाखवेपणा करता येत नाही हे खरं आहे, पण फक्त तेवढ्यामुळे इतर वडील तसं करतात असं म्हणणं पूर्वग्रहदूषित आहे. त्यामुळे त्याविषयी बोलणंच शक्य नाही. दुसरीकडे- आणि माझ्या दृष्टीनं ते जास्त वास्तवाला धरुन आहे- तुमचं असं म्हणणं हेच आपल्या नात्यामध्ये काहीतरी बिनसलंय याचं निदर्शक आहे आणि त्यात तुमचाही वाटा आहे, पण ते तुम्ही मान्य करत नाही. हे जर तुम्हाला मान्य असेल तर आपण काही बोलू शकतो.
अर्थात, आज मी जसा आहे तो केवळ तुमच्या प्रभावामुळे असं काही मी म्हणणार नाही. ती अतिशयोक्ती ठरेल. (मला ती कराविशी वाटतेय, हे खरं असलं तरी). वस्तुस्थिती अशी आहे की, मी तुमच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त असा वाढलो असतो तरी तुम्हाला हवा तसा झालो नसतोच. मी अशक्त, भित्रा, संकोची, अस्वस्थ माणूसच झालो असतो रॉबर्ट काफ्काही नाही आणि कार्ल हरमानही नाही पण मी आता आहे त्याहून बराच वेगळा. मग आपलं एकमेकांशी छान पटलं असतं. तुम्हा माझे मित्र, बॉस, काका, आजोबा, अगदी (जरी काहीशा संकोचानंच) सासरे जरी असता, तरी मला आनंद झाला असता. फक्त वडील म्हणून तुम्ही माझ्यासाठी खूपच कडक आहात. विशेषतः माझे भाऊ लहानपणीच वारले आणि माझ्या बहिणींचा जन्म बराच नंतर झाल्यामुळे तुमच्या या कडकपणाची सगळी झळ मलाच सहन करावी लागली आणि माझ्यात ती सहन करण्याची ताकज नव्हती.
आता आपल्या दोघांची तुलना करुन बघा: मी हे अतिसंक्षिप्त स्वरुपात सांगतोय. माझ्यात लॉवीचं रक्त आहे आणि त्याला काफ्काच्या रक्ताचा पाया आहे. पण काफ्कामधली जिजिविषा, व्यवसाय करण्याची प्रेरणा आणि विजिगिषु वृ्त्त माझ्यात नाही. उलट लोवी घराण्याची वृत्ती माझ्यात सुप्तपणे, वेगळेपणानं, दुसऱ्या दिशेला जास्त क्रियाशील आहे. पण ती पूर्णपणे क्रियाशील नाही. दुसरीकडे तुम्ही एक अस्सल काफ्का आहात. तुमच्यात शक्ती, आरोग्य, भूक, मोठा आवाज, वक्तृत्व, आत्मसंतुष्टी, बाह्य जगावर वर्चस्व, सहनशीलता, हजरजबाबीपणा, मानवी स्वभावाचं ज्ञान, भव्य स्वरुपात कृती करण्याची वृत्ती आणि अर्थात या गुणांबरोबर येणारे दोषसुद्धा आहेत. त्या दोषांकडे तुमचा स्वभाव आणि कधीकधी तुमचा तापटपणा तुम्हाला नेत असतो. फिलिप, लुडविग आणि हाईनरिख् या काकांच्या तुलनेत तुमचं बाह्यरुप पूर्णपणे काफ्कासारखं नाही. हे खरंतर थोडं अजब आहे आणि मला त्याचं कारण नीटसं कळलेलं नाही. कारण हे सगळे जास्त उत्साही, ताजेतवाने, अनौपचारिक वागणारे, जास्त सहजता असलेले आणि तुमच्यापेक्षा कमी कडक आहेत.(या बाबतीत मी तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत आणि तो वारसा अतिशय काळजीपूर्वक सांभाळला आहे, पण त्याला तोलून धरणारी तुमच्यात असलेली इतर स्वभाववैशिष्ट्यं माझ्यात नाहीत, हे मला कबूल केलं पाहिजे.) तरीही तुम्हीसुद्धा याबाबतीत अनेक टप्प्यांतून गेला आहात. मुलांकडून, विशेषतः माझ्याकडून निराशा पदरी येण्याआधी आणि घरात खिन्न होण्याआधी तुम्ही बहुतेक जास्त आनंदी होता (जेव्हा इतर लोक घरी यायचे तेव्हा तुम्ही वेगळे असायचात); बहुतेक त्यानंतर तुम्ही जास्त आनंदी झाला आहात, कारण व्हालीचा अपवाद वगळता तुमची मुलं आणि नातवंडं तुम्हाला जो आनंद देऊ शकली नाहीत, तो आता तुमची नातवंडं आणि तुमचे जावई यांच्याकडून मिळतोय. ते काही असलं तरी आपण एकमेकांपेक्षा अगदी वेगळे आहोत. हा वेगळेपणा आपल्या दोघांसाठी घातक आहे. इतका, की जर वाढीच्या वयाचा मी आणि पूर्ण वाढ झालेले तुम्ही एकमेकांसमोर कसे दिसू याचा कुणी अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला असता, तर तुम्ही अगदी सहज मला पायाखाली चिरडू शकता, इतकं की माझी नावनिशाणाही उरणार नाही, असं भाकित त्यानं वर्तवलं असतं. तसं झालं नाही हे खरं. कोणत्याही जिवंत गोष्टीविषयी आडाखे बांधता येत नाहीत. पण जे घडलं ते त्याहीपेक्षा वाईट होतं. हे सांगत असताना मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करुन सांगतो की या सगळ्यात तुमचा दोष आहे असं मी कधीही, अगदी एका क्षणासाठीसुद्धा, मानलं नाही. तुमचा माझ्यावर जो परिणाम झाला तो रोखणं तुमच्याही हातात नव्हतं. पण मी तुमच्याविषयी असलेल्या द्वेषामुळे त्या परिणामाला शरण गेलो असं मानणं तुम्ही थांबवलं पाहिजे.
मी लहानपणी खूप भित्रा होतो. आणि कदाचित त्यामुळेच, सगळ्याच लहान मुलांप्रमाणे हट्टीसुद्धा. कदाचित आईच्या लाडांचाही तो परिणाम असेल, पण मला सांभाळणं खूप कठीण होतं असं मला वाटत नाही. एखादा प्रेमाचा शब्द, शांतपणे हात हातात घेणं किंवा प्रेमार्द्र दृष्टीक्षेप यांच्या आधारे मी सांगितलेलं काहीही करायचो असं मला वाटतं. तसे तुम्ही मुळात दयाळू आणि प्रेमळ आहात.( आता मी जे सांगणार आहे ते याविरुद्ध नाहीये, फक्त एका लहान मुलाची निरीक्षणं आहेत), पण असा पृष्ठभागाखालचा प्रेमळपणा शोधण्याची सहनशक्ती आणि निर्भयपणा सगळ्या लहान मुलांमध्ये नसतो. तुम्ही स्वतःच्या स्वभावाप्रमाणेच मुलांशी वागता.त्यात कडकपणा, मोठा आवाज आणि तापटपणा असतो. माझ्या बाबतीत तर तुमच्या ते पथ्यावरच पडलं. कारण मला एक सशक्त आणि निर्भय मुलगा म्हणून वाढवायची तुमची इच्छा होती.
मला वळण लावण्याच्या तुमच्या अगदी सुरुवातीच्या पद्धती मला अर्थातच आता आठवत नाहीत. पण नंतरच्या काळातल्या अनुभवांवरुन आणि तुमच्या फेलिक्सशी वागण्यावरुन मी त्यांची कल्पना करु शकतो. तुम्ही त्यावेळी तरुण असल्यामुळे जास्त ताकदवान, उत्साही, बेबंद, स्वतंत्र आणि आजच्यापेक्षा जास्त बिनधास्त होता. त्यावेळी तुम्ही तुमच्या व्यवसायात एवढे गुंतला होता, की तुम्हाला दिवसातून एकदाही माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळायचा नाही. त्यामुळेच माझ्यावर तुमचा जास्त खोलवर परिणाम झाला, कारण त्याचं सवयीत कधीच रुपांतर झालं नाही. या लहानपणीच्या दिवसांतला एक प्रसंग मला अगदी लख्ख आठवतो. कदाचित तुम्हालाही तो आठवत असेल. एका रात्री मी पाण्यासाठी किरकिर करत होतो. मला तहान लागली होती म्हणून नाही, पण मला सगळ्यांना त्रास द्यायचा होता म्हणून आणि थोडीशी गंमत म्हणून. बराच वेळ दटावल्यावरही काही परिणाम न झाल्यामुळे तुम्ही मला अंथरुणातून बाहेर काढलंत, बाल्कनीत नेलंत आणि काही वेळ तिथेच मला एकट्याला झोपायच्या कपड्यांमध्ये उभं करुन दार बंद केलंत. हे चुकलं असं मी म्हणत नाहीये. त्या रात्री मला शांत करण्याचा कदाचित दुसरा मार्ग नसेलही. पण मुलांना वळण लावण्याची तुमची नेहमीची पद्धत आणि तिचा माझ्यावर झालेला परिणाम मी सांगतोय. त्यानंतर मी त्या काळात बऱ्यापैकी आज्ञाधारक झालो. पण त्या प्रसंगानं मी आतून दुखावला गेलो. माझ्यासाठी विनाकारण पाण्यासाठी हट्ट करणं ही एक साधी, दैनंदिन गोष्ट होती. तिची, बाल्कनीत एकटं नेऊन उभं करण्याच्या विलक्षण भीतीशी मी कधीच सांगड घालू शकलो नाही. त्यांनंतर अनेक वर्षं मला भीती वाटत राहिली, की तुम्ही, माझे वडील, अंतिम सत्ताधीश, कधीही रात्रीबेरात्री येऊन मला अंथरुणातून बाहेर काढाल आणि बाल्कनीत उभं करुन ठेवाल आणि त्याचा अर्थ मी तुमच्यासाठी अगदी कःपदार्थ आहे.
ही जरी अगदी छोटीशी सुरुवात असली तरी मला कायम व्यापून असणारी ही क्षुद्रत्वाची जाणीव (वेगळ्या अर्थानं ती चांगली आणि उपयोगीसुद्धा आहे) मुख्यतः तुमच्या प्रभावातूनच आलेली आहे. मला गरज होती ती थोड्या प्रोत्साहनाची, थोड्या मित्रत्वाची, माझा मार्ग जरासा मोकळा ठेवण्याची. त्या ऐवजी तुम्ही तो मार्ग माझ्यासाठी बंद करुन टाकलात. अर्थात, त्यामागे तुमचा मला दुसऱ्या मार्गानं जायला लावण्याचा चांगला उद्देश होता. पण मी त्यासाठी सक्षम नव्हतो.मी जेव्हा सॅल्यूट करुन दिमाखात कवायत करायचो, तेव्हा तुम्ही मला प्रोत्साहन द्यायचात. पण मला काही भविष्यात सैन्यात भरती व्हायचं नव्हतं. मी जेव्हा भरपूर जेवायचो किंवा जेवणाबरोबर बिअर घ्यायचो किंवा मला न समजणारी काही गाणी पुन्हा पुन्हा म्हणायचो किंवा तुमचे आवडते शब्द वापरुन तुमचं अनुकरण करत काहीही बडबडायचो, तेव्हाही तुम्ही मला प्रोत्साहन द्यायचात. पण या सगळ्याचा माझ्या भविष्याशी काहीही संबंध नव्हता. आजही तुम्ही ज्यात गुंतला आहात अशी कोणतीही गोष्ट करायला तुम्ही मला प्रोत्साहन देता, हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा वेळी तुमचं स्वतःचं महत्व पणाला लागलेलं असतं आणि माझ्यामुळे त्याला धक्का लागण्याची शक्यता असते(उदा. माझं नियोजित लग्न) किंवा माझ्या मनातल्या तुमच्या प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता असते (उदा. पेपा मला ओरडतो तेव्हा). अशावेळी तुम्ही मला प्रोत्साहन देता. माझ्या योग्यतेची आठवण करुन देता, मी आयुष्यात काय साध्य करु शकतो ते सांगता आणि पेपाला संपूर्ण दोषी ठरवता. पण माझ्या या वयात अशा प्रोत्साहनाचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, ही वस्तुस्थिती जरी बाजूला ठेवली तरी ज्याच्याशी माझा संबंध नाही अशा गोष्टींमध्ये असं प्रोत्साहन देऊन मला त्याचा काय उपयोग होणार आहे?
त्या काळात मला सर्वार्थानं प्रोत्साहनाची गरज होती. तेव्हा तुमच्या निव्वळ उपस्थितीमुळे मी दबून जायचो. आपण एकाच आंघोळीच्या खोलीत कपडे काढायचो ते मला अजून आठवतं. मी हडकुळा, अशक्त, किडकिडीत; आणि तुम्ही सशक्त, उंच, भरदार. तिथेही मला अगदी क्षुद्र वाटायचं. हे वाटणं फक्त तुमच्या नजरेपुरतं नव्हतं, तर अख्ख्या जगाला मी क्षुद्र वाटत असेन अशी माझी धारणा होती, कारण माझ्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टींचा मापदंड होता. जेव्हा आपण न्हाणीघरातून बाहेर लोकांसमोर यायचो, तेव्हा तुम्ही माझा हात धरलेला असायचा. मी जणू हाडांचा छोटा सांगाडा होतो. अस्थिर, स्विमिंग पुलाच्या काठावर अनवाणी उभा, पाण्याला घाबरलेला, तुमच्या पोहण्याच्या पद्धतीचं अनुकरण करायला असमर्थ. तुम्ही कसं पोहता हे तुम्ही मला नेहमी दाखवायचा. त्यात तुमचा उद्देश चांगला असला, तरी माझ्यासाठी ती अत्यंत अपमानास्पद गोष्ट होती. मग मी घाबरुन घायकुतीला यायचो आणि माझे सगळ्या प्रकारचे वाईट अनुभव छानपैकी एकत्र यायचे. जेव्हा तुम्ही आधी कपडे काढायचात आणि मी न्हाणीघरात एकटा मागे थांबायचो, तेव्हा मला छान वाटयचं. त्या वेळी लोकांसमोर उभं राहण्यातली लाज टाळता यायची. शेवटी, मी काय करतोय हे बघायला तुम्ही आत यायचात आणि मला तिथून बाहेर काढायचात. माझा त्रास तुमच्या लक्षात यायचा नाही, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. शिवाय, मला माझ्या वडिलांच्या शरीराचा अभिमान होता. आपल्यातला हा फरक अद्याप कायम आहे, बरं का.
या सगळ्यात तुमचं बौद्धिक वर्चस्व. तुम्ही फक्त स्वतःच्या बळावर खूप प्रगती केली होती. त्याचा परिणाम म्हणून तुमचा स्वतःच्या मतावर अमर्याद विश्वास होता. मला लहानपणी त्याचा फारसा त्रास झाला नाही, पण वाढत्या वयात झाला. तुमच्या आरामखुर्चीत बसून तुम्ही जगावर राज्य केलंत. तुमचं मत नेहमी बरोबर असायचं, बाकी सगळे वेडपट, बेअक्कल, मूर्ख, नॉर्मल नसलेले. तुमचा आत्मविश्वास एवढा प्रचंड होता, की तुम्हाला तुमच्या विधानांमध्ये सुसंगती असण्याचीही गरज वाटत नसे आणि तरीही तुमचं कधीच चुकत नसे. कधीतरी असं व्हायचं, की एखाद्या विषयावर तुमचं काहीच विशिष्ट मत नसायचं. त्यामुळे त्या विषयावर बाकी सगळ्यांची मतं अगदी निरपवाद चुकीची असायची. तुम्ही चेक लोकांना कमी लेखायचात, मग जर्मन लोकांना, मग ज्यूंना. ते सुद्धा काही बाबतीत नव्हे, तर सगळ्याच बाबतीत. या कमी लेखण्यात मग तुम्ही एकटे सोडून बाकी सगळ्यांचा समावेश व्हायचा. ज्यांचे अधिकार विवेकावर आधारित नसून त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वानुसार ठरतात, असे हुकूमशहा आणि तुमच्यामध्ये एक गूढ साम्य होतं. किमान मला तरी तसं वाटायचं.
गंमत म्हणजे, माझा विषय असेल तेव्हा खरंतर तुमचं आश्चर्यकारकरित्या बरोबर असायचं. ते आपल्या संभाषणात तसं असतं तर फारस नवल नव्हतं, कारण आपल्यात संभाषण असं फारसं व्हायचंच नाही, पण प्रत्यक्षातही ते खरं होतं. तरीही, हे तसं फारसं अनाकलनीय नाही. एकतर, माझे सगळे विचार तुमच्या दाट प्रभावाखाली होते, अगदी ज्या बाबतीत आपले मतभेद असतील-आणि विशेषतः त्याच बाबतीत- हे जास्त खरं आहे. माझे हे सगळे विचार जरी वरवर स्वतंत्र वाटले, तरी त्यांच्यावर सुरुवातीपासूनच तुमच्या मला क्षुल्लक लेखणाऱ्या मतांचा प्रभाव होता. हे सहन करणं जवळजवळ अशक्य होतं. ते करताना एखादं निश्चित असं मत तयार करणं त्याहून अवघड. मी इथे कोणत्याही उदात्त विचारांबद्दल बोलत नाहीये. तर लहानपणीच्या प्रत्येक लहानसहान गोष्टींबद्दल बोलतोय. मला जरा कुठे एखादी गोष्ट आवडली, मनात त्या गोष्टीचे विचार आले, मी घरी येऊन त्याविषयी बोललो तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय, तर एखादा उपहासात्मक उच्छ्वास, मान हलवणं, टेबलावर बोटानं टकटक करणं: “एवढ्यासाठीच तू इतका उत्तेजित झालायस?” किंवा “काय पण थोर चिंता आहे!” किंवा “ लोकसुद्धा कशा गोष्टींचा विचार करत बसतात!” किंवा “यानं तुझं काय भलं होणार आहे?” किंवा “क्षुल्लक गोष्टीसाठी किती ते नाटक!” अर्थात, माझ्या प्रत्येक बालिश गोष्टींबद्दल तुम्हाला उत्साह वाटणं शक्य नव्हतं. कारण तुम्ही तेव्हा अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होता. पण मुद्दा तो नाही. तुमच्या कायम विरोध करण्याच्या स्वभावामुळे तुम्ही मला नेहमीच अशाप्रकारे निराश करणं अपरिहार्य होतं. शिवाय, हा विरोध साचत राहिला आणि त्याची तीव्रता सतत वाढत गेली; एक वेळ अशी आली की तुमचं मत माझ्याशी जुळणारं असलं तरी तुम्ही मला विरोध करायचात. एका लहान मुलाच्या वाट्याला येणारं हे नैराश्य दैनंदिन आयुष्यातलं सामान्य नैराश्य नव्हतं. तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे असल्यामुळे हे आघात थेट गाभ्यावरच झाले. माझं धैर्य, निश्चय, आत्मविश्वास, या ना त्या गोष्टीतला आनंद हे सगळं तुम्ही त्या विरुद्ध असलात किंवा तुमचा विरोध नुसता गृहीत जरी धरला तर टिकायचं नाही; आणि तुमचा विरोध मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत गृहीत धरावा लागयचा.
हे विचार आणि माणसं या दोघांनाही लागू आहे. मला एखाद्या व्यक्तीमध्ये थोडा जरी रस असला- असंही माझ्या स्वभावामुळे हे फार घडायचं नाही- तर तुम्ही माझ्या भावनांचा किंवा मताचा जराही विचार न करता त्या व्यक्तीला नावं ठेवायला, तिची बदनामी करायला, तिच्यावर विनाकारण टीका करायला सुरुवात करायचात. काही निरागस, लहान मुलांसारख्या माणसांना, उदाहरणार्थ यिडिश अभिनेता लोवी, त्याची किंमत मोजावी लागली. त्याला ओळखतही नसताना तुम्ही त्याला घुशीची उपमा दिलीत. तीही इतक्या वाईट प्रकारे की ते माझ्या अजून लक्षात आहे. माझ्या आवडत्या इतर लोकांविषयी बोलताना तुम्ही नेहमी कुत्रा आणि त्याच्या अंगावरच्या पिसवांची उपमा द्यायचात. आत्ता मला तो अभिनेता आठवला कारण तुम्ही त्याच्याविषयी जे बोललात त्याची मी अशी नोंद घेतली : “ माझे वडील माझ्या मित्राविषयी अशाप्रकारे बोलत असतात.खरंतर ते त्याला ओळखतही नाहीत. पण फक्त तो माझा मित्र आहे म्हणून ते असं बोलतात. आता ते जेव्हा माझ्यात लहान मुलांमध्ये असणारा जिव्हाळा आणि कृतज्ञता नाही असा आरोप करतील, तेव्हा ही गोष्ट मी त्यांच्याविरुद्ध वापरेन” तुमच्या शब्दांचा आणि शेरेबाजीचा मला किती त्रास होतो आणि त्यांची मला किती लाज वाटते, याच्याशी तुम्हाला काहीही देणंघेणं कसं नसायचं, हे मला कधीच कळलं नाही. जणू तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीवच नव्हती. अर्थात, मी जे बोलायचो त्यांनी तुम्हालाही त्रास होत असणार याची मला खात्री आहे. पण मला त्याची कायम जाणीव होती आणि त्याचं वाईटही वाटायचं. पण मी स्वतःला आवर घालू शकलो नाही, माझे शब्द नियंत्रणात ठेवू शकलो नाही. मी ते बोलत असतानाही मला दुःख व्हायचं. पण तुम्ही तुमच्या शब्दांचे प्रहार करताना अजिबात विचार करायचा नाहीत. तुम्हाला कोणाहीबद्दल बोलताना किंवा बोलून झाल्यावर कधी वाईट वाटलं नाही. लोक तुमच्यासमोर पूर्ण असहाय्य असायचे.
पण तुमची आम्हाला वाढवण्याची पद्धतच तशी होती. तुम्हाला मुलांना कसं वाढवावं याची उपजत देणगी आहे; या पद्धतीचा तुमच्यासारख्या इतर माणसांना नक्कीच उपयोग झाला असता. अशा माणसाला तुम्ही जे सांगताय ते योग्य वाटलं असतं. त्याला इतर गोष्टींचा त्रास झाला नसता. त्यानं तुम्ही जे सांगताय ते निमूटपणे केलं असतं. पण माझ्यासाठी तुम्ही मला उद्देशून जे बोलायचात ती जणू ईश्वरी आज्ञा होती. मी ते कधीच विसरलो नाही. माझ्यासाठी जगाबद्दल धारणा निर्माण करण्याचं ते महत्वाचं साधन होतं. त्याच बरोबर माझं तुमच्याविषयीचं मतही त्यातून आकार घेत होतं आणि तिथे मात्र तुम्ही सपशेल अपयशी ठरलात. लहानपणी मी बहुतेक जेवायच्या वेळीच तुमच्याबरोबर असायचो, त्यामुळे तुमची शिकवण प्रामुख्यानं जेवायच्या वेळी कसं वागावं याबद्दल असायची. समोर जे येईल ते मुकाट्यानं खावं, अन्नाला नावं ठेऊ नयेत.- पण गंमत म्हणजे, बऱ्याचदा तुम्हालाच अन्न खाण्याच्या लायकीचं वाटत नसे, तुम्ही त्याला “पाणचट’’ म्हणायचात. ‘’ त्या प्राण्यानं (स्वयंपाकी) जेवणाची वाट लावलीय.’’ असंही म्हणायचात. कारण तुमची भूक मोठी होती. तुम्हाला जेवण गरम लागायचं. ते भराभर मोठे घास घेऊन खायची तुम्हाला सवय होती. त्यामुळे लहान मुलांना घाईघाईत जेवावं लागायचं. जेवताना गंभीर शांतता असायची. त्यात अधूनमधून तुमच्या सूचना ऐकू यायच्या: “आधी खा, नंतर बोला,” किंवा “ लवकर, लवकर, लवकर,” “बघ किती हळू जेवतोयस तू. माझं केव्हाच झालंय”. खरंतर जेवताना हाडं दातानं फोडू नयेत, पण तुम्ही ती फोडायचात. व्हिनेगर आवाज करत पिऊ नये, पण तुम्ही प्यायचात. मुख्य म्हणजे पाव सरळ कापावा, पण तुम्ही तो ग्रेव्हीनं माखलेल्या सुरीनं कापायचात. जेवताना अन्न खाली सांडू नये याची काळजी घेतली पाहिजे, पण जेवण झाल्यावर तुमच्याच खुर्चीखाली सर्वात जास्त खरकटं पडलेलं असायचं. जेवायच्या टेबलावर इतर कुणालाही जेवण सोडून बाकी काही करण्याची परवानगी नव्हती, पण तुम्ही तुमची नखं तिथेच कापायचात, पेन्सिलला टोक काढायचात, टूथपिकनं कान कोरायचात. बाबा, कृपया मला काय म्हणायचंय ते नीट समजून घ्या : स्वतंत्रपणे पाहिलं तर हे सगळे क्षुल्लक तपशील आहेत. पण ते माझ्यासाठी त्रासदायक ठरतात याला कारण तुम्ही आहात. एवढ्या शिस्तप्रिय माणसानं माझ्यावर लादलेले नियम स्वतःच पाळले नाहीत, असं मला वाटायचं. म्हणून माझ्यासाठी जगाचे तीन भाग होते: एका भागात, मी, गुलाम, केवळ माझ्यासाठी तयार केलेल्या नियमांच्या सावटाखाली रहायचो. मला ते नियम, का ते नक्की सांगता यायचं नाही, कधीच पूर्ण पाळता आले नाहीत. दुसऱा भाग माझ्यापासून अनंत अंतरावर होता. तिथे तुमचं वास्तव्य होतं. तुमचं लक्ष राज्य करण्यात होतं, आदेश देण्यात होतं आणि त्यांचं नीट पालन होत नाही म्हणून वैतागण्यात होतं. आणि शेवटी जगाचा तिसरा भाग. तिथे बाकी सगळे आनंदात रहायचे. त्यांच्यावर आदेशांचं पालन करायची सक्ती नसायची. मला कायम मानहानी सहन करावी लागायची. मी तुमचं ऐकलं तरी मानहानी, कारण तुमचे आदेश फक्त माझ्यासाठी असायचे. मी तुमचं ऐकलं नाही तरी मानहानी ठरलेलीच, कारण तुमचं न ऐकण्याची हिंमत करणं म्हणजे घोर अवज्ञा. मी न ऐकण्याचं कारण माझ्यात तुमच्याएवढी ताकद नव्हती, तुमच्याएवढी भूक नव्हती, तुमच्यासारखी कौशल्यं नव्हती, मात्र हे सगळं माझ्यात असावं अशी तुमची सहज अपेक्षा होती. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी मानहानी होती. हे माझे लहानपणीचे विचार नाहीत, माझ्या भावना आहेत.
माझ्या परिस्थितीची फेलिक्सशी तुलना केली तर माझं म्हणणं कदाचित स्पष्ट होऊ शकेल. तुम्ही त्याला माझ्यासारखंच वागवता. त्याला वाढवतानाही तुम्ही विशेष भीषण पद्धत वापरली. म्हणजे जेवताना त्यानं तुमच्या दृष्टीनं चुकीचं असं काही केलं तर तुम्ही त्याला माझ्यासारखं, “डुक्कर आहेस तू,” असं म्हणून थांबत नाही, तर ‘’ अगदी हरमानसारखा आहेस” किंवा “ अगदी तुझ्या वडिलांसारखा आहेस” अशी पुस्ती जोडता. आता याचा कदाचित -मला ‘कदाचित’ पेक्षा जास्त काही म्हणता येणार नाही-फेलिक्सवर काही वाईट परिणाम होणार नाही, कारण त्याच्यासाठी तुम्ही फक्त आजोबा आहात, तेही महत्वाचे आजोबा. पण माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व होतात. तसं त्याच्यासाठी नाही. आणि शिवाय, फेलिक्सचं व्यक्तिमत्व, अगदी या वयातही, काही प्रमाणात मर्दानी आहे. त्याला धीरगंभीर आवाजात ओरडल्यामुळे तो अस्वस्थ होऊ शकतो, पण त्याचा त्याच्यावर कायमचा परिणाम होणार नाही. पण तो माझ्या तुलनेत तुमच्याबरोबर क्वचितच असतो.शिवाय त्याच्यावर तुमच्याशिवाय इतरही प्रभाव आहेत. तुम्ही त्याच्यासाठी एक आवडतं कुतूहल आहात. त्यातून तो त्याला हवं ते घेऊ शकतो. माझ्यासाठी तुम्ही फक्त कुतूहलापुरते मर्यादित नव्हता. मला निवड करण शक्य नव्हतं. सगळंच घ्यावं लागलं.
मी तुमच्याशी कोणत्याही गोष्टीवरुन वाद घालत नाहीये, कारण तुम्हाला मान्य नसलेल्या किंवा तुम्ही न सुचवलेल्या विषयावर शांतपणे बोलणं तुम्हाला जमत नाही, तुमच्या वर्चस्ववादी स्वभावात ते बसत नाही. अलिकडे आपल्या अशक्त हृदयामुळे असं होतं, असं तुम्ही म्हणालात. पण तुम्ही कधी यापेक्षा वेगळे वागल्याचं मला आठवत नाही. उलट, अशक्त हृदयामुळे तुम्ही तुमचं म्हणणं इतरांवर अधिक जोरकसपणे लादू शकता. कारण, त्यामुळे तुम्हाला इतरांकडून होणारा किमान विरोधही लगेच मोडून काढता येतो. मी हे तक्रार म्हणून सांगत नाही, फक्त वस्तुस्थिती समोर ठेवतोय.जसं ओट्टलाच्या बाबतीत तुम्ही नेहमी म्हणता, “बोलताच येत नाही. ती सरळ मला विरोध करते,” पण खरंतर ती असा विरोध करत नाही. तुम्ही माणूस आणि विषय यात गल्लत करताय. तिचा विरोध विषयाला असतो आणि तुम्ही माणसाचं न ऐकता लगेच त्याच्याविषयी मत बनवून मोकळे होता. नंतर जे समोर येतं ते तुम्हाला पटत तर नाहीच, पण तुम्ही आणखी वैतागता. मग तुम्ही म्हणता, “ तुम्हाला हवं ते करा. मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. आता तुम्ही मोठे झालात. मला तुम्हाला काहीही सल्ला द्यायचा नाही,’’ आणि हे सगळं तुम्ही तुमच्या खास भीतीदायक, कर्कश्श आवाजात आणि तिरस्कारानं म्हणता. लहानपणी मला त्याची जशी भीती वाटायची तशी आता वाटत नाही, कारण लहानपणीची अपराधीपणाची जाणीव आता तुमच्या आणि माझ्या असहाय्यतेच्या आकलनामध्ये परिवर्तित झालीय. आपण शांतपणे एकत्र येण्यातल्या अशक्यतेचा आणखी एक परिणाम झाला, तो खरंतर जास्त नैसर्गिक होता: मी बोलण्याची क्षमता गमावून बसलो. असाही मी काही फार बोलका झालो नसतो, पण मी मानवी स्वभावात उपजत असलेला बोलण्यातला प्रवाहीपणा नक्कीच आत्मसात केला असता. पण खूप लहानपणीच तुम्ही माझ्यावर बोलायला बंदी घातलीत. तुमची धमकी, ‘’खबरदार, एक शब्द उच्चारशील तर!” आणि त्याबरोबर उगारलेला हात तेव्हापासून माझ्या सोबत आहेत. तुमच्यापासून मी काय घेतलं असेल तर अडखळत, तोतरं बोलणं. तेसुद्धा तुमच्यासाठी अती होतं. खरंतर तुम्ही स्वतः, तुमच्या आवडत्या विषयांमधले उत्कृष्ट वक्ते आहात. मग शेवटी मी गप्पच झालो. सुरुवातीला विरोध म्हणून, आणि नंतर तुमच्या उपस्थितीत मी विचारही करु शकत नव्हतो आणि बोलूही शकत नव्हतो म्हणून. आणि मला तुम्हीच वाढवल्यामुळे याचे माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम झाले. मी तुमच्या इच्छेनुसार वागलो नाही असं समजणं ही तुमची एक लक्षणीय चूक होती. तुम्हाला वाटतं आणि तुम्ही आरोप करता त्याप्रमाणे ‘’नेहमी तुमच्याविरुद्ध’’ हे काही माझं ब्रीदवाक्य नव्हतं. खरंतर उलट आहे: मी जर तुमचं कमी ऐकलं असतं तर तुम्हाला ते जास्त आवडलं असतं. असंही, शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही केलेले सगळे प्रयत्न फळाला आलेच. मी कशातूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. आज मी जो आहे तो तुमचे संस्कार आणि माझ्या आज्ञाधारकतेमुळेच. (अर्थात, काही मूलभूत गोष्टी आणि तुमच्या आयुष्याचा प्रभाव वगळता) हा परिणाम तुम्हाला आवडत नसेल आणि नकळत तुम्ही हा तुमच्याच संस्कारांचा परिणाम आहे हे कबूल करत नसाल तर त्याचं कारण हे, की तुमचे संस्कार आणि माझं आजचं व्यक्तिमत्व यात काहीच ताळमेळ नाहीये. तुम्ही म्हणाल:” खबरदार एक शब्द काढशील तर!” असं म्हटल्यामुळे माझ्यात तुम्हाला न पटणारं जे तत्व आहे ते शांत होईल असं तुम्हाला वाटत असेल, पण या सगळ्याचा माझ्यावर झालेला परिणाम खूप खोलवरचा आहे. मी खूप आज्ञाधारक होतो. मी मठ्ठ झालो. घृणेमुळे तुमच्यापासून दूर गेलो, लपून बसलो. तुमची शक्ती माझ्यापर्यंत-किमान थेट तरी- पोहोचू शकणार नाही एवढ्या लांब असतानाच मी बाहेर यायची हिंमत करु शकलो. पण तुम्हाला हे सगळं सहन झालं नाही आणि ते तुमच्या ‘’विरुद्ध’’ आहे असं तुम्हाला वाटलं. खरंतर तो तुमच्या शक्तीचा आणि माझ्या दुबळेपणाचा अटळ परिणाम होता.
मला वाढवण्याच्या तुमच्या अतिशय परिणामकारक वाचिक मार्गांचा माझ्यावर नेहमी परिणाम व्हायचा. ते म्हणजे: ओरडणं, धमकी, उपरोध, कुत्सित हास्य आणि-खरंतर हे अजब आहे- स्वतःची कीव करणं.
तुम्ही मला थेट ओरडल्याचं किंवा वाईट बोलल्याचं मला आठवत नाही. त्याची गरजही नव्हती. कारण तुमच्याकडे इतर अनेक पद्धती होत्या. शिवाय, तुमच्या कामासंबंधीच्या आणि घरातल्या संभाषणातून अपशब्द माझ्या कानावर पडायचे आणि अवतीभवती फिरत असायचे की मी लहान मुलगा म्हणून जवळजवळ थक्क व्हायचो आणि ते मला स्वतःला लागू न करण्याचं काही कारण नसायचं. कारण ज्या लोकांना तुम्ही नावं ठेवायचात ते काही माझ्यापेक्षा फार वेगळे नव्हते आणि तुम्ही त्यांच्यावर माझ्यापेक्षा जास्त नाखूष नव्हतात. इथे पुन्हा तुमची गूढ निरागसता आणि अभेद्यता दिसते. शिव्या देताना किंवा शपथा घेताना तुमच्य मनात किंचितही किंतू नसायचा. तरीही इतर लोकांनी शिव्या देणं किंवा शपथा घेणं तुम्हाला निंदनीय वाटायचं आणि सहन व्हायचं नाही.
तुमच्या अपशब्दांना धमक्यांचा आधार असायचा आणि ते मलाही लागू होतं. ‘’ तुला माशासारखा फाडून टाकीन” हे ऐकणं माझ्यासाठी किती भयंकर असेल. असं प्रत्यक्षात घडणार नाही हे माहित असलं तरीही. (खरंतर, लहानपणी मला ते माहित नव्हतं हे मी कबूल करतो), पण माझ्या मनात असलेली तुमच्या शक्तीची जी प्रतिमा होती त्याच्याशी हे सुसंगत होतं आणि मनात आणलं तर तुम्ही असं करु शकता याचीही मला जाणीव होती. जेव्हा तुम्ही एखाद्याला पकडण्यासाठी टेबलाभोवती धावायचात ते दृश्यही भयंकर होतं. अर्थात, तुम्हाला खरंच कोणाला पकडायचं नसायचं, पण तुम्ही तसं दाखवायचात. शेवटी आईला त्या व्यक्तीच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करावा लागायचा. शेवटी लहानपणी मला असं वाटायचं की मी तुमच्या कृपेनं जिवंत आहे आणि माझं यापुढचं आयु्ष्य ही तुम्ही मला दिलेली भेट आहे. ती स्वीकारायची मात्र माझी लायकी नाही. तुमच्या आज्ञा मोडण्याचे काय परिणाम व्हायचे हेही मला इथे सांगितलं पाहिजे. जेव्हा मी तुम्हाला न आवडणारी एखादी गोष्ट करायचो, तेव्हा तुम्ही मला अपयशाची धमकी द्यायचात. मला तुमच्या मतांबद्दल एवढा प्रचंड आदर होता की अपयश अटळ असायचं, फक्त ते थोडं उशीरा वाट्याला यायचं इतकंच. माझा स्वतःच्या कृतीमधला आत्मविश्वास नष्ट झाला. मी नेहमी अनिश्चित आणि संशयग्रस्त असायचो. मी जसा मोठा झालो, तशी माझा नालायकपणा सिद्ध करायला तुम्हाला आणखी सामग्री मिळत गेली. हळूहळू काही बाबतीत तुमचं खरंच बरोबर ठरायला लागलं. पुन्हा मी काळजीपूर्वक हे सांगू इच्छितो, की मी असा झालो ते फक्त तुमच्यामुळे नाही; तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींची तीव्रता वाढवलीत. पण तुम्ही ती खूप जास्त वाढवलीत. याचं कारण असं की माझ्या बाबतीत तुम्ही नेहमीच खूप ताकदवान होतात आणि तुम्ही माझ्यावर तुमच्या शक्तीचा पुरेपूर वापर केलात.
उपरोधाचा वापर करुन मुलांना वाढवण्यावर तुमचा विशेष भर होता. हे तुमच्या माझ्यावर असलेल्या वर्चस्वाशी सुसंगतच होतं. तुमच्या कौतुकाचं स्वरुप साधारण असं असायचं: “ तू हे अशा प्रकारे करु शकत नाहीस का? मला वाटतं ते तुझ्यासाठी फार अवघड असेल. अर्थात, त्यासाठी तुला वेळ नसलेच.” आणि असंच पुढे चालत रहायचं. अशा प्रत्येक प्रश्नाला कुत्सित हास्याची आणि चेहऱ्याची साथ असायची. त्यामुळे मी काही चुकीचं केलंय हे कळण्याआधीच मला शिक्षा व्हायची. ‘लेकी बोले, सुने लागे’ म्हणून तुम्ही केलेल्या टीकेचाही मला फार त्रास व्हायचा. म्हणजे आपण रागावण्याच्याही लायकीचे नाही, असं मला वाटायचं. तुम्ही वरवर आईशी बोलायचात, पण तुम्हाला खरंतर तिथेच बसलेल्या मला बोलायचं असायचं. उदाहरणार्थ, “ अर्थात, आपल्या शहाण्या मुलाकडून एवढी अपेक्षा करणं जरा जास्तच होईल नाही का?” आणि इतर अशी बरीच उदाहरणं आहेत. (याचा उलटा परिणाम असा झाला की आईच्या उपस्थितीत तुम्हाला काहीही विचारायची माझी हिंमतच झाली नाही. नंतर सवयीमुळे मी तुम्हाला काही विचारण्याचा प्रयत्नही केला नाही. माझ्यासाठी तेव्हा तुमच्या उपस्थितीत आईला काही विचारणं खूपच कमी धोक्याचं होतं. उदा. बाबा कसे आहेत? त्यामुळे मला थेट धक्का बसत नसे.)
अर्थात, काही वेळा असंही व्हायचं की तुमच्या अगदी वाईट उपरोधाशी मी पूर्णपणे सहमत असायचो, म्हणजे जेव्हा त्याचा संबंध दुसऱ्या कोणाशी तरी असेल तेव्हा. उदा. एली[1]. तिच्याशी माझं बरीच वर्षं फारसं पटत नसे. जेव्हा तिच्याबाबत अशा गोष्टी बोलल्या जायच्या तेव्हा माझ्यासाठी तो द्वेष आणि तिरस्कारयुक्त आनंदाचा उत्सव असायचा आणि तिच्याविषयी अशा गोष्टी बहुतेक प्रत्येक वेळी जेवताना बोलल्या जायच्याच. “तिनं टेबलापासून सहा फूट लांब बसलं पाहिजे, जाडी नुसती”. जेव्हा तुम्ही वैतागून तुमच्या खुर्चीवर बसायचात तेव्हा तुमच्यात आनंद किंवा निरोगी विनोद यांचा लवलेशही नसायचा. तेव्हा तुम्ही एखाद्या कडवट शत्रूसारखे वाटायचात. त्या वेळी तुम्ही एली कशी बसते याची अतिशयोक्त नक्कल करुन दाखवायचात. तुम्हाला तिचं बसणं तिरस्करणीय वाटायचं. अशा गोष्टी पुन्हा पुन्हा नेहमी घडायच्या आणि तुम्ही त्यातून काय मिळवलंत, तर काहीही नाही !
याचं कारण कदाचित असं असावं की व्यक्त झालेला राग आणि द्वेष यांचा विषयाशी फारसा संबंध नसायचा. टेबलापासून लांब बसण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीमुळे तुम्हाला एवढा राग आलाय असं मला वाटत नसे. खरंतर तो राग आधीपासून तुमच्या मनात असायचाच आणि या विषयामुळे त्याला बाहेर निघायला निमित्त मिळायचं इतकंच. त्या रागाला काहीही झालं तरी निमित्त मिळणारच आहे हे आम्हाला माहित असायचं. त्यामुळे तो येऊ नये म्हणून आम्ही कधीच फारसे प्रयत्न केले नाहीत. या सततच्या दडपणामुळे आमच्या भावना बोथट झाल्या. फक्त एवढंच, की आपल्याला मार मिळणार नाहीये याची खात्री असायची. त्यातून मी सतत खिन्न राहणारा, लक्ष न देणारा, आज्ञा न पाळणारा मुलगा झालो. माझा नेहमी स्वतःच्या आत पळ काढण्याकडे कल असायचा. तर असा तुम्हाला त्रास व्हायचा आणि आम्हालाही व्हायचा. जेव्हा दातओठ खात आणि गुळण्या केल्यासारखं गडगडाटी हसून तुम्ही कडवटपणे ‘’ काय छान गर्दी जमलीय!” असं म्हणायचात, तेव्हा तुमच्या स्वतःच्या दृष्टीकोनातून तुमचं बरोबर असायचं. तुमचं ते हास्य मात्र भीषण होतं. असं अगदी अलिकडे कॉन्स्टॅन्टिनोपलहून पत्र आल्यावर तुम्ही केलंत.
तुमच्या मुलांसंबंधी या वृत्तीशी विसंगत गोष्ट म्हणजे तुम्ही चारचौघांमध्ये आमची तक्रार करायचात आणि असं वारंवार घडायचं. अर्थात, मी हे कबूल करतो की लहानपणी (कदाचित थोड्या मोठ्या वयात असेल) मला याच्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. यातून तुम्ही लोकांची सहानुभूती मिळवण्याची अपेक्षा कशी करु शकता हे मला कधी समजू शकलं नाही. तुम्ही प्रत्येक बाबतीत अगदी राक्षस होता. त्यामुळे आम्हाला तुमच्याविषयी कणव वाटणं किंवा तुम्हाला मदत कराविशी वाटण्याची पर्वा तुम्ही कशाला कराल? तुम्ही आमचाच नेहमी तिरस्कार करत असल्यामुळे आमच्या मदतीचाही तुम्हाला तिरस्कारच होता. त्यामुळे तुम्ही आमच्या या ज्या सार्वजनिक तक्रारी करत होता, त्यांचा मी शब्दशः अर्थ न घेता त्या मागे काय दडलंय हे शोधण्याचा प्रयत्न केला. मला नंतर कळलं की तुमच्या मुलांमुळे तुम्हाला खरोखरच खूप त्रास झाला; पण त्या वेळी तुमच्या या सार्वजनिक तक्रारीवंषयी मला कणव वाटण्याऐवजी तो मला वळण लावण्याचा आणि अपमानित करण्याचा ठासून केलेला प्रयत्न वाटला. तो स्वतंत्रपणे जरी खूप तीव्र नसला, तरी त्याचा परिणाम असा झाला की, ज्या गोष्टी गांभीर्यानं घ्यायची गरज आहे, त्यासुद्धा गांभीर्यानं न घेण्याची मला सवय लागली.
सुदैवानं या सगळ्याला अपवाद होते. त्या वेळी तुम्ही शांतपणे सगळं सहन करायचात आणि तुमचा जिव्हाळा आणि प्रेमळपणा सगळे अडथळे पार करुन मला स्पर्शून जायचा. असे प्रसंग क्वचित यायचे, पण ते सुंदर होते. उदाहरणार्थ, सुरुवातीच्या काळात उन्हाळ्याच्या उकाड्यात तुम्हाला जेवल्यावर दमून ऑफिसमध्ये टेबलावर कोपरं ठेवून डुलकी काढताना मी पहायचो, किंवा तुम्ही आमच्याबरोबर उन्हाळ्याच्या सुटीतर रविवारी गावाला यायचात. तेव्हा तुम्ही कामानं थकून जायचात; किंवा आई खूप आजारी असताना तुम्ही पुस्तकांच्या शेल्फला धरुन थरथरत हुंदके देत उभे होतात; किंवा माझ्या गेल्या आजारपणात तुम्ही गुपचूप चवड्यांवर चालत ओट्टलाच्या खोलीत आलात, दरवाजात थांबलात, मला बघण्यासाठी मान पुढे काढलीत आणि निव्वळ काळजीपोटी माझ्याकडे बघून हात हलवलात. अशा वेळी मी निवांत आडवा होतो. मला आनंदानं रडावंसं वाटतं. आत्ताही हे लिहिताना मला रडू येतंय.
तुमचं एक खास ठेवणीतलं सुंदर, शांत, समाधानी संमतीदर्शक स्मित आहे. ते खूप दुर्मीळ आहे. पण ते ज्या व्यक्तीसाठी वापरलं जातं ती अगदी आतून आनंदी होते. लहानपणी ते कधी माझ्या वाट्याला आल्याचं आठवत नाही. खरंतर त्या काळात तुमच्या दृष्टीनं मी निरागस होतो. तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मग तुम्ही ते माझ्यासाठी का बरं वापरलं नसेल? त्यामुळे तुम्ही ते कधीतरी वापरलं असणार नक्की. पण तरीही लांबचा विचार केला तर अशा सुखद आठवणीसुद्धा माझ्यात अपराधीपणाची जाणीवच निर्माण करतात, त्यामुळे जग मला अधिकच अनाकलनीय वाटायला लागतं.
त्या पेक्षा व्यावहारिक आणि ठोस गोष्टींबद्दलच बोललेलं बरं. तुमच्या संबंधी स्वतःला जास्त ठामपणे व्यक्त करण्यासाठी आणि काहीशी सूडबुद्धीनंसुद्धा, मी तुमच्या वागण्यातल्या विसंगती शोधायला लागलो. त्या गोळा करुन त्यांचा बाऊ करायला लागलो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्यापेक्षा जराशा उच्चपदावर असलेल्या व्यक्तींसमोर कसे भारावून जाता आणि त्या एखाद्या राजघराण्यातल्या व्यक्ती असल्याप्रमाणे त्यांच्याविषयी कसे बोलत राहता (दुसरीकडे तुमच्या अशा गोष्टींचा मला त्रासही व्हायचा. आपल्या वडिलांना त्यांच्या मूल्यांच्या पुष्टीसाठी अशा क्षुद्र गोष्टींची गरज वाटावी आणि त्यांनी त्याचं असं स्तोम माजवावं याचा).
किंवा तुमची असभ्य प्रकारे स्वतःला व्यक्त करण्याची सवय. तेव्हा तुमचा आवाज अगदी टिपेला जायचा आणि आपण काहीतरी छान बोललो म्हणून तुम्ही हसायचात. प्रत्यक्षात मात्र ती अगदी क्षुल्लक असभ्य अशी गोष्ट असायची (त्याचवेळी माझ्यासाठी ते तुमच्या शक्तीचं अपमानास्पद असं दृश्यरुप असायचं).
अर्थात, अशी निरीक्षणं अनेक आहेत. मी त्या निरीक्षणांवर खूष असायचो; त्यातून मला कुजबुजायची आणि विनोद करायची संधी मिळायची. तुमच्या ते कधीतरी लक्षात यायचं आणि तुम्ही रागवायचात. तुम्हाला ते द्वेषाचं आणि अनादराचं लक्षण वाटायचं. पण खरं सांगतो, माझ्यासाठी तो फक्त स्वसंरक्षणाचा-काहीसा निरुपयोगी असला तरी- मार्ग होता. ते विनोद राजे-महाराजे किंवा देवांबद्दल केले जातात त्या प्रकारचे होते. ते तुमच्याविषयी असलेल्या खोलवरच्या आदराचा भाग होते.
गंमत अशी, की तुम्हीसुद्धा माझ्यासंदर्भात तुमच्या स्थितीशी इमान राखत अशाच प्रकारचे स्व-संरक्षणाचे मार्ग वापरायचात. मी किती चांगला आहे आणि मला किती चांगली वागणूक मिळते हे रंगवून सांगण्याची तुम्हाला सवय होती. ते खरंही असेल, पण त्या परिस्थितीत मला त्याचा काहीच उपयोग नव्हता.
आई माझ्यावर अमर्याद प्रेम करायची हे खरं. पण माझ्यासाठी त्याचा अप्रत्यक्ष संबंध तुमच्याशी होता, त्यामुळे ते मला आवडायचं नाही.
आई नकळत शिकारीतल्या बाणाची भूमिका निभावायची. मला वाढवण्याच्या तुमच्या पद्धतीनं काही अनपेक्षित बाबतीत माझ्यात विरोध, नावड आणि अगदी तिरस्कार निर्माण करुन मला स्वतःच्या पायवर उभं केलं, तरी आईच्या प्रेमानं आणि विवेकी बोलण्यानं, माझ्यासाठी तुमची विनवणी करण्यानं त्याची धार कमी व्हायची (माझ्या लहानपणीच्या सगळ्या चक्रव्यूहांमध्ये आणि अनागोंदीमध्ये ती विवेक आणि समजूतदारपणाचं प्रतीक होती), आणि मी पुन्हा तुमच्या कक्षेत ओढला जायचो. ती कक्षा मी एरवी तुमच्या आणि माझ्या भल्यासाठी मोडून बाहेर पडलो असतो. किंवा कदाचित असं झालं असावं की आपल्यात कधी खरा समेट झालाच नाही, आईनं फक्त मला तुमच्यापासून वाचवलं, गुपचुप मला काहीतरी दिलं किंवा काहीतरी करण्याची परवानगी दिली आणि मग मी पुन्हा एखाद्या प्राण्यासारखा किंवा एखाद्या अपराधी गुन्हेगारासारखा तुमच्यासमोर लपून रहायला लागलो. मला अगदी माझ्या हक्काच्या गोष्टीसुद्धा लपूनछपून घ्याव्या लागायच्या.अर्थात, ज्या गोष्टींवर माझ्या हक्क नव्हता अशा गोष्टीसुद्धा मग मी अशाच प्रकारे मिळवायला लागलो. त्यातून पुन्हा अपराधीपणाची भावना वाढत गेली.
हेही खरं, की तुम्ही कधी मला प्रत्यक्षात मारलं नाही. पण तुमचं ओरडणं, तुमच्या चेहऱ्याचं लाल होणं, पट्टा सोडून खुर्चीवर तयारीत लटकवून ठेवणं, हे सगळं माझ्यासाठी खऱ्या मारापेक्षा भयानक होतं. एखाद्याला फाशी द्यायची तयारी केल्यासारखं. जर त्याला खरोखरच फाशी दिलं तर तो मरतो आणि सगळं संपतं. पण त्याला फाशीच्या सगळ्या सोपस्कारांतून जावं लागलं आणि आपण सुटणार हे त्याला चेहऱ्यासमोर फास लटकल्यावर समजलं, तर तो आयुष्यभर त्रास सहन करत राहतो. तसंच, अनेकदा तुमच्या स्पष्ट व्यक्त केलेल्या मतानुसार मला फटके द्यायला हवे होते, पण तुमच्या कृपेनं शेवटच्या क्षणी माझी त्यातून सुटका व्हायची, तेव्हा त्यातून मला फक्त आयुष्यभर कायम राहीला अपराध-गंड मिळाला. प्रत्येक बाबतीत मी दोषी होतो, तुमच्या ऋणात होतो.
तुमच्या परिश्रमामुळे शांतता आणि समाधानात जगल्याबद्दल, प्रेम आणि सगळी सुखं मिळाल्याबद्दल, कसलीही उणीव नसल्याबद्दल तुम्ही मला नेहमीच दोष दिलात (एकतर एकटा असताना किंवा सगळ्यांसमोर, कारण तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या अपमानाचं काही वाटायचं नाही आणि तुमच्या मुलांशी संबंधित कोणतीही गोष्ट नेहमी सार्वजनिक असायची).
माझ्या मेंदूवर ज्यांनी खोल ठसे उमटवले असे तुमचे उद्गार मला आठवतात, उदाहरणार्थ: “मी फक्त सात वर्षांचा असताना एका गावातून दुसऱ्या गावात हातगाडी ढकलत न्यायचो.” “ आम्हाला जेवायला बटाटे मिळाले तरी आनंद व्हायचा.” “आम्ही सगळ एकाच खोलीत झोपायचो.” “माझ्याकडे पुरेस गरम कपडे नसल्यामुळे अनेक वर्षं माझ्या पायांच्या भेगा बुजल्या नव्हत्या.” “पिसेकमधल्या दुकानात काम करायला पाठवलं तेव्हा मी अगदी लहान होतो.” “ मला घरातून काही मिळालं नाही. मी सैन्यात होतो तेव्हासुद्धा. तरीही मी घरी पैसे पाठवत होतो.” “ पण तरीही, तरीही, वडील हे माझ्यासाठी कायम वडीलच होते. अर्थात, त्याचा अर्थ काय ते आज कुणाला काय कळणार म्हणा! या मुलांना काय माहितीय? कुणीच अशी हालअपेष्टा सहन केलेल्या नाहीत! आज एका तरी मुलाला या गोष्टींचा अर्थ कळेल का?” इतर परिस्थितीत अशा गोष्टी अतिशय प्रेरणादायक ठरु शकल्या असत्या. आपल्या वडिलांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या त्या सहन करण्यासाठी एखाद्याला त्यातून बळ मिळालं असतं. पण तुम्हाला ते नकोच होतं. तुमच्या सगळ्या सगळ्या प्रयत्नांच्या परिणामी परिस्थिती वेगळीच झाली आणि तुमच्यासारखं स्वतःला स्वतंत्र बनवण्यासाठी आम्हाला कोणतीही संधी उरली नाही. कारण अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी हिंसा आणि तिला विरोध करण्याची गरज होती, त्यासाठी घरापासून लांब जायला हवं होतं. (ते करण्यासाठी माझ्यात पुरेसा निश्चय आणि बळ असतं तर आणि आईनं इतर मार्गानं त्याला विरोध केला नसता तर). पण तुम्हाला ते अजिबात नको होतं. त्याला तुम्हा कृतघ्नपणा, उधळपट्टी, अवज्ञा, फसवणूक, वेडेपणा म्हणायचात. त्यामुळे एकीकडे तुम्ही तुमच्या उदाहरणांमधून, आख्यानांमधून आणि सहन कराव्या लागलेल्या अपमानांमधून मला असं बंड करायला प्रवृत्त करायचात, तर दुसरीकडे अत्यंत तीव्रतेनं ते करायला परावृत्त करायाचात. नाहीतर, ओट्टलाच्या झुराऊला जाण्यानं तुम्हाला आनंद झाला असता. त्या वेळी परिस्थिती काहीही असो. तिला तुम्ही जिथून आलात त्या गावात परत जायचं होतं. तिला काम करुन तुम्ही सहन केलेल्या हालअपेष्टांना तोंड द्यायचं होतं. तिला तुमच्या कष्टांवर चैन करायची नव्हती. तुम्ही जसे तुमच्या वडिलांपासून स्वतंत्र झालात, तसंच तिला व्हायचं होतं. तिची ही उद्दीष्ट एवढी वाईट होती का? तुमच्या उदाहरणापासून आणि संकल्पनेपासून ती एवढी दूर होती का? असो. ओट्टलाच्या उद्दिष्टांचं पुढे प्रत्यक्षात काहीच झालं नाही. ती अंमलात आणण्याचा तिचा मार्ग काहीसा हास्यास्पद ठरला. तिनं खूप कुरबुरी केल्या आणि तिच्या आईवडिलांचा पुरेसा विचार केला नाही. पण ती केवळ तिचीच चूक होती का? त्यात परिस्थितीचा काहीच वाटा नव्हता का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्ही तिच्यापासून एवढे दुरावल्याचा त्यात काहीच वाटा नव्हता का? व्यवसायात ती तुमच्यापासून जेवढी दुरावली त्यापेक्षा जास्त (तुम्ही नंतर स्वतःची समजून काढण्याचा प्रयत्न केलात त्याप्रमाणे) नंतर झुराऊला जाऊन दुरावली का? आणि तिच्या झुराऊला जाण्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं असतं, तिला योग्य सल्ला दिला असता, लक्ष ठेवलं असतं किंवा किमान तिचं वागणं चालवून घेतलं असतं, तर त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं नसतं का? तसं करण्याची शक्ती तुमच्यात होती (इच्छाही होती असं गृहीत धरु).
अशाप्रकारचे अनुभव आले की तुम्ही कडवटपणानं ‘तुमची परिस्थिती खूपच चांगली आहे’ असं म्हणायचात. पण हा विनोद खरंतर विनोद नव्हताच. तुम्हाला ज्या गोष्टींसाठी झगडावं लागलं, त्या आम्हाला तुमच्याकडून आयत्या मिळाल्या हे खरं, पण बाह्य आयुष्यासाठी आम्हाला मोठेपणी झगडावंच लागलं. तो झगडा तुम्हालाही करावा लागला होता आणि आमचीही,अर्थातच, त्यातून सुटका नव्हती. आम्हला मोठेपणी तो लढा द्यावा लागला, पण तेव्हा आमची ताकद लहान मुलाएवढीच होती. अर्थात, त्यामुळे आमची परिस्थिती तुमच्यापेक्षा जास्त अवघड होती असं मला म्हणायचं नाहीये. उलट, ती तुमच्यापेक्षा चांगलीही नव्हती आणि वाईटही नव्हती. (मी हे आपल्या स्वभावातला फरक बाजूला ठेवून म्हणतोय), पण आम्ही कधी तुमच्यासारखं आमच्या वाईट परिस्थितीचं भांडवल करुन इतरांचा अपमान केला नाही. तुमच्या थोर आणि यशस्वी कतृत्वाची फळं चाखण्याचा आनंद उपभोगणं मला शक्य होतं हे मी नाकारत नाही. मी त्यातून काही चांगलं घडवू शकलो असतो आणि तुमच्या आवडीनुसार ते काम पुढे चालवू शकलो असतो; पण इथे पुन्हा आपल्यातला दुरावा आड आला. तुमच्याकडून जे मिळालं त्याचा मी उपभोग घेतला हे खरं पण तो अपमानास्पद, थकलेल्या, अशक्त स्थितीत आणि अपराधीपणाच्या जाणीवेसह. म्हणूनच तुम्ही मला जे काही दिलंत त्यासाठी मी तुमचा कृतज्ञ आहे, पण एखाद्या भिकाऱ्यासारखा आणि ती कृतज्ञता मला कधीच योग्य रितीनं वागून व्यक्त करता आली नाही.
तुमच्या या संगोपन-पद्धतीचा आणखी एक परिणाम म्हणजे, तुमच्याशी ज्या गोष्टीचा दूरान्वयानंही संबंध असेल तिच्यापासून मी लांब पळायचो. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा व्यवसाय. खरंतर लहानपणी, तो व्यवसाय एका दुकानापुरता असताना मला तो खूप आवडायला हवा होता. ते संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर दुकान किती चैतन्यमय असायचं. तिथे बघण्यासारखं आणि ऐकण्यासारखं कितीतरी असायचं. मला तिथे अधूनमधून लहानमोठ्या कामांत मदत करता यायची, स्वतःची वेगळी ओळख सिद्ध करता यायची, आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे तुमच्या विलक्षण व्यावसायिक कौशल्यासाठी तुमच्याविषयी आदर वाटायचा. तुमची वस्तू विकण्याची पद्धत, लोकांना हाताळणं, विनोद करणं, कधीही न थकणं हे सगळं विलक्षण होतं. शंका आल्यावर तात्काळ योग्य निर्णय घेणं तुम्हाला जमायचं. अगदी तुम्हाला पार्सल गुंडाळताना किंवा पेटी उघडताना बघणंही अद्भुत असायचं. या सगळ्यातून मला बरंच शिकायला मिळालं. पण तुम्ही मला सगळ्या आघाड्यांवर घाबरवायला सुरुवात केल्यापासून व्यवसाय आणि तुम्ही माझ्यासाठी एकच झालात. मग व्यवसायामुळेसुद्धा मला अस्वस्थ वाटायला लागलं. सुरुवातीला ज्या गोष्टी माझ्यासाठी नित्यक्रमाचा भाग होत्या त्यांची मला भीती आणि लाज वाटायला लागली. विशेषतः तुम्ही हाताखालच्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागवायचात त्यामुळे. कदाचित, हे सगळ्या व्यवसायांमध्ये सारखंच असेल (आसेक्युराझिओनि जेनेराली[2]मध्ये मी असताना तरी असंच वातावरण होतं. तिथे मी राजीनामा देण्याचं जे कारण संचालकांना सांगितलं ते, ‘ओरडा खायला असमर्थ’ असं होतं. ते पूर्णपणे खरं नसलं तरी खोटंही नव्हतं. खरंतर तो ओरडा मला उद्देशून असायचं असं नाही, पण घरातल्या वातावरणामुळे मी त्या बाबतीत खूपच संवेदनशील झालो होतो), पण लहानपणी इतर व्यवसायांशी मला काही देणंघेणं नव्हतं. पण आपल्या दुकानात मी लहानपणी ज्या प्रकारे ओरडणं, शिव्या देणं आणि रागावणं ऐकलं, तसं इतर कुठे असेल असं मला वाटत नाही. आणि फक्त ओरडणंच नाही, तर इतर प्रकारे दहशत बसवणंसुद्धा. उदाहरणार्थ, जे सामान तुम्हाला इतर सामानात मिसळलेलं आवडत नसे, ते तुम्ही काउंटरवरुन ज्या प्रकारे ढकलून द्यायचात आणि क्लार्क ते उचलायचा, त्याला खरंतर तुमचा अविचारी राग हेच किंचित कारण होतं, किंवा क्षयरोग झालेल्या क्लार्कबद्दल तुमची निर्भत्सना, “लवकर मेला तर बरं, घाणेरडा कुत्रा.” तुम्ही कर्मचाऱ्यांना पगार घेणारे शत्रू म्हणायचात आणि ते खरं असेलही, पण ते तसे बनण्याआधी तुम्ही त्यांचे ‘’पगार देणारे शत्रू’’ होता. तेव्हा मला आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात आली, की तुम्ही अन्याय करु शकता. माझ्या बाबतीत मला हे कदाचित लवकर कळलं नसतं. कारण माझ्यात अपराधीपणाची भावना खूप तीव्र होती. त्यामुळे तुमचं बरोबरच आहे हे मान्य करायला मी नेहमी तयार असायचो. पण माझा लहानपणीचा दृष्टीकोन -अर्थात त्यात नंतर बदल झाले, पण फार नाहीत- असा होता की, हे परके लोक आपल्यासाठी काम करतायत आणि केवळ त्या कारणासाठी त्यांना तुमच्या धाकात रहावं लागतंय. अर्थात, ही अतिशयोक्ती होती. कारण तुमचा माझ्यावर जेवढा भीषण प्रभाव आहे तेवढाच त्यांच्यावर आहे असं मी गृहीत धरलं होतं.खरंच तसं असतं तर ते जगूच शकले नसते. ती मोठी माणसं असल्यामुळे त्यांची सहनशक्ती माझ्यापेक्षा जास्त होती, त्यामुळे तुम्ही दिलेला त्रास सहज झटकून टाकून ते त्याची सव्याज परतफेड करायचे. पण या सगळ्यामुळे व्यवसाय माझ्यासाठी असह्य झाला. कारण त्यामुळे मला आपल्या नात्याची वारंवार आठवण व्हायची. एक मालक म्हणून व्यवसायतला तुमचा सहभाग आणि व्यावसायिक म्हणून तुमचं इतरांवर वर्चस्व गाजवण्याचं वेड बाजूला ठेवलं तरी तुमच्याकडून व्यवसाय शिकणाऱ्या सगळ्यांपेक्षा तुम्ही एवढे श्रेष्ठ होता, की त्यांनी काहीही केलं तरी तुमचं कधीही समाधान व्हायचं नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या बाबतीतही कायमचे असमाधानी असणार असं मी गृहीत धरलं होतं. त्यामुळ मी आपसूच कर्मचाऱ्यांच्या बाजूचा झालो. त्याचं आणखी एक कारण असं की, परक्या माणसांशी कुणी एवढं वाईट कसं वागू शकतं हे मला कळायचं नाही, त्यामुळे त्या वाईट वाटण्यातून मी कर्मचाऱ्यांची बाजू घ्यायचो. कारण तुमच्या वागणुकीमुळे त्यांचा तुमच्यावर, आपल्या कुटुंबावर राग असणार असं मला वाटायचं, त्यामुळे त्यांच्याशी चांगलं वागून मी अप्रत्यक्षपणे माझी बाजू सुरक्षित करुन घ्यायचो. त्यासाठी कर्मचाऱ्यांशी केवळ चांगलं वागणं माझ्यासाठी पुरेसं नव्हतं, म्हणून मी त्यांच्याशी नम्रपणे वागायचो. त्यामुळे त्यांना केवळ आधी ‘गुड मॉर्निंग’ ‘गुड इव्हिनिंग’ म्हणणं माझ्यासाठी पुरेसं नव्हतं. शक्य तेव्हा मी त्यांना मला अशा शुभेच्छा देण्यापासून परावृत्त करायचो. माझ्यासारख्या क्षुल्लक प्राण्यानं त्यांचे पाय जरी चाटले असते, तरी ती मालक म्हणून तुम्ही त्यांच्यावर जो जुलूम करायचात त्याची पुरेशी भरपाई झाली नसती. माझ्या सहकाऱ्यांशी माझं हे जे नातं निर्माण झालं ते व्यवसायाच्या परीघापलिकडे जाऊन भविष्यातही कायम राहिलं. (ओट्टलाचं तुम्हाला न आवडणारं गरीबांशी मिळून मिसळून वागणं, मोलकरणींबरोबर बसणं हे काहीसं याच प्रकारचं आहे. ते माझ्याएवढं धोकादायक आणि खोलवर परिणाम करणारं नसलं तरी). शेवटी तर मी व्यवसायाचा धसकाच घेतला. मला त्याच्याबद्दल काही वाटेनासं झालं. शिवाय ते सगळं माझा आवाका आणि क्षमतांच्या बाहेरचं होतं. त्यात तुमच्याही क्षमतांची कसोटी लागायची असं तुम्हीही म्हणायचात. मग तुम्ही माझ्या व्यवसायाच्या नावडीतूनसुद्धा स्वतःसाठी काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करायला लागलात. (आज मला ते हृद्य आणि काहीसं लाजिरवाणं वाटतंय.) कारण माझी ती नावड तुमच्यासाठी निराशाजनक होती. माझ्या नावडीविषयी बोलताना तुम्ही मला व्यवसायाची जाण कशी नाही किंवा माझ्या डोक्यात व्यवसायाबद्दल कशा भव्य कल्पना आहेत अशी स्पष्टीकरणं द्यायचात. तुम्ही स्वतःच निर्माण केलेल्या या स्पष्टीकरणांमुळे आईला अर्थातच आनंद व्हायचा. मी सुद्धा माझ्या दुःखी मनस्थितीत भाबडेपणानं ते मान्य करायचो. पण माझ्या डोक्यात जर व्यवसायाविषयी (आता, फक्त आताच. मात्र मला व्यवसायाचा मनापासून तिटकारा वाटतो) खरंच काही “भव्य कल्पना” असत्या, तर त्या वेगळ्या प्रकारे व्यक्त झाल्या असत्या. मी असा भित्रेपणानं शाळा आणि कायद्याचा अभ्यास कसाबसा पूर्ण करुन क्लार्कच्या टेबलापाशी येऊन ठेपलो नसतो.
मला तुमच्यापासून पळ काढायण्यासाठी कुटुंबापासून आणि आईपासूनही दूर जावं लागलं असतं. मला तिच्याकडून संरक्षण मिळायचं हे खरं, पण ते फक्त तुमच्या संदर्भात. तिचं तुमच्यावर खूप प्रेम होतं आणि ती तुम्हाला एवढी समर्पित आणि एकनिष्ठ होती, की माझ्यासाठी एक स्वतंत्र बलस्थान म्हणून उभं राहणं तिला शक्य नव्हतं. माझं लहानपणीचं हे निरीक्षण अचूक ठरलं, कारण पुढच्या काही वर्षांत आई जास्तच तुमच्या बाजूला झुकली. मात्र तिनं स्वतःच्या बाबतीत स्वातंत्र्य नजाकतीनं आणि सुंदररित्या अगदी छोट्या कक्षेत मर्यादित ठेवलं. तेही तुम्हाला न दुखावता. जाणाऱ्या काळाबरोबर तिनं जास्तीत जास्त आंधळेपणानं, मात्र भावनिक रितीनं, बौद्धिक नव्हे, तुमची मतं आणि मुलांच्या बाबतीत तुमची दूषणं आत्मसात केली. विशेषतः ओट्टलाच्या बाबतीत. ते खूपच गंभीर होतं. अर्थात, आईचं कुटुंबातलं स्थान किती त्रासदायक आणि थकवणारं होतं हे विसरुन चालणार नाही. ती घरासाठी आणि व्यवसायासाठी अक्षरशः राबली आणि कुटुंबातल्या सगळ्या संकटांचा तिला दुप्पट त्रास झाला. पण या सगळ्याची सर्वोच्च परिणती म्हणजे तिची तुमच्या आणि आम्हा मुलांमध्ये झालेली कोंडी. तुम्ही तिच्याशी नेहमीच प्रेमानं आणि समजूतदारपणानं वागलात, पण वेळप्रसंगी आम्ही तिच्याशी जेवढे कठोरपणे वागायचो, तेवढेच तुम्हीही वागायचात. आम्ही निर्दयपणे तिच्यावर प्रहार केले तसेच तुम्हीही केलेत. आपल्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाला फुटलेला तो फाटा होता. त्यात कुणाला त्रास व्हावा अशी कुणाचीच इच्छा नव्हती. पण त्यात आपला राग आपण आईवर काढला. तुम्ही आमच्या संदर्भात तिला जो त्रास दिलात, ती काही मुलांना वाढवण्याची चांगली पद्धत नव्हती. अर्थात, त्यात तुमचा किंचितही दोष नव्हताच. त्यातून एरवी आमच्या आईबद्दलच्या अन्यायकारक वागण्याचं समर्थन होत होतं. तुमच्याकडून तिला आमच्यासाठी त्रास सहन करावा लागला आणि आमच्याकडून तुमच्यासाठी. अर्थात, यात कधीतरी तुम्ही तिला ‘आम्हाला बिघडवण्यासाठी’ रागवायचात. तेव्हा तुमचं बरोबर असायचं. जरी हे ‘’ बिघडवणं’’ म्हणजे तुम्ही निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या विरोधात शांत, नकळत केलेलं निदर्शन असलं तरीही. अर्थात, आईला आपल्या सगळ्यांवरच्या प्रेमातून ताकद मिळाली नसती, तर तिला हे सगळं सहन करणं अशक्य होतं. त्या प्रेमातच तिचा आनंद सामावलेला होता.
माझ्या बहिणी फक्त अंशतः माझ्या बाजूनं होत्या. तुमच्या नात्यात सगळ्यात आनंदी होती ती व्हॅली. ती आईला जवळची असल्यामुळे आईसारखीच तुमच्या इच्छांना शरण गेली. त्यासाठी तिला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत आणि फारसा त्रासही झाला नाही. तिला पाहून तुम्हाला आईची आठवण येत असल्यामुळे तुम्ही तिचा जास्त जिव्हाळ्यानं स्वीकार केलात. तिच्यात काफ्काचा अंश फारसा नसला तरीही. पण कदाचित तुम्हाला तेच हवं होतं; काफ्काचं काहीच नसणं, तुम्ही तशी मागणीही करु शकला नाहीत; किंवा आमच्याबद्दल तुम्हाला वाटायचं तसं काहीतरी महत्वाचं निसटून चाललंय आणि ते प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवायला हवं असंही तिच्याबद्दल वाटलं नाही. किंवा कदाचित असंही असेल, की स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या काफ्का घराण्याच्या अंशाविषयी तुम्हाला फारशी आत्मीयता नव्हतीच. आम्ही इतर भावंडांनी जर व्यत्यय आणला नसता, तर व्हॅलीशी तुमचं नातं अधिक मित्रत्वाचं झालं असतं.
आम्हा भावडांमध्ये तुमच्या कक्षेतून सुटून जाण्यात यश मिळालं ते फक्त एलीला. ती लहान असताना असं काही करु शकेल यावर माझा विश्वास बसला नसता. कारण ती लहानपणी गबाळी, थकलेली, भित्री, तापट, अपराध-गंडानं पछाडलेली एक कंजूष मुलगी होती. लहानपणी ती मला इतकी स्वतःसारखी वाटयची की मला तिच्याकडे बघवतही नसे, मग तिच्याशी बोलणं तर दूरच. आम्हा सगळ्यांवर झालेल्या संस्कारांचा तिच्यावरही तेवढाच प्रभाव होता. तिचं कंजूष असणं मला त्रासदायक व्हायचं, कारण मी तिच्यापेक्षा अधिक कंजूष होतो. कारण कंजूषपणा हे खोलवर दुःखी असण्याचं खात्रीलायक लक्षण आहे. मी सगळ्याच गोष्टींबद्दल एवढा अनिश्चित होतो की अगदी माझ्या हातातली किंवा तोंडातली किंव त्या मार्गावर असलेली गोष्ट सोडली तर मला इतर काहीही माझं आहे याची खात्री नसायची आणि एलीला नेमक्या अशाच गोष्टी माझ्याकडून हिरावून घ्यायला आवडायचं. पण जेव्हा तिनं लहान वयात घर सोडलं -हे फार महत्वाचं आहे- तेव्हा हे सगळं बदललं. मग तिनं लग्न केलं. तिला मुलं झाली. ती आनंदी, स्वच्छंदी, धाडसी, उदार, निःस्वार्थी आणि
आशावादी बनली. तुम्हाला हे बदल अजिबातच कसे लक्षात आले नाहीत, हे नवलच आहे. कदाचित, तुमच्या एलीवर असलेल्या रागामुळे तुम्ही एवढे आंधळे झाला होता, की तुमचं तिथे लक्षच गेलं नसेल. आतून तुमचा आजही तिच्यावर राग आहे. पण आता त्यानं फारसा फरक पडत नाही, कारण एली आपल्याबरोबर राहात नाही, शिवाय तुमचं फेलिक्सवरचं प्रेम आणि कार्लविषयी तुम्हाला वाटणारा जिव्हाळा यामुळे आता हा विषय फारसा महत्वाचा राहिलेला नाही. फक्त गेर्टीला कधीतरी त्याचा त्रास सहन करावा लागतो.
माझी ओट्टलाविषयी लिहायची हिंमत होत नाही; कारण असं केल्यामुळे या पत्राचा परिणाम निष्प्रभ होईल याची मला जाणीव आहे. सर्वसामान्य परिस्थितीत, म्हणजे जेव्हा तिला कसली गरज किंवा धोका नसतो, तेव्हा तुम्हाला तिच्याविषयी केवळ तिरस्कार वाटत आला आहे. ती तुम्हाला त्रास व्हावा आणि वैताग यावा असं मुद्दाम वागते, असं तुम्हीच एकदा मला म्हणाला होता. तिच्यामुळे तुम्हाला त्रास झाला की तिला बरं वाटतं आणि समाधान मिळतं, असं तुमचं म्हणणं होतं. थोडक्यात, तुमच्या दृष्टीनं ती जणू राक्षस होती. एवढा गैरसमज होण्यासाठी तुमच्यात किती दुरावा निर्माण झाला असला पाहिजे, तुमच्या आणि माझ्यात असलेल्या दुराव्यापेक्षाही जास्त. आता ती तुमच्यापासून एवढी दूर गेलीय की तुम्ही तिला क्वचितच भेटता, तिच्या प्रतिमेच्या जागी तुम्ही एक पिशाच्च निर्माण केलंय. कबूल की तुम्हाला तिच्यामुळे त्रास झाला. अर्थात, या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तळ मला दिसत नाही. पण यात काहीतरी लोवीच्या प्रकरणासारखं आहे, काफ्काच्या सर्वोत्तम आयुधांनी युक्त. आपल्यामध्ये खरा संघर्ष असा कधी नव्हताच. मी केव्हाच हार मानली होती. मग उरलं ते फक्त पळून जाणं, कडवटपणा, खिन्नता आणि आंतरिक संघर्ष. पण तुम्ही दोघं नेहमीच संघर्षाच्या पवित्र्यात असायचात. नेहमी युद्धाला तयार, उत्साही. ते दृश्य जेवढं दिमाखदार होतं तेवढंच असहाय्यसुद्धा. सुरुवातीला तुम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ होता हे मला माहित आहे. कारण आम्हा चौघांपैकी ओट्टला आजही तुमच्या आणि आईच्या नात्याची आणि त्यातून एकत्र आलेल्या उर्जेची खरी प्रतिनिधी आहे. वडील आणि मुलीच्या नात्यात अंतर्भूत असलेलं सुसंवादातलं सुख तुम्हा दोघांना का मिळू शकलं नाही हे मला सांगता यायचं नाही. पण एवढं नक्की की तुमच्यातला बेबनाव आपल्यातल्या विसंवादाच्याच मार्गानं गेला. तुमच्या बाजूनं तुमच्या स्वभावातली हुकूमशाही होती आणि तिच्या बाजूनं लोवीचा विरोध, हळवेपणा, न्यायाची जाणीव, अस्वस्थता आणि या सगळ्याला काफ्का घराण्याच्या उर्जेची जोड. तिच्यावर माझाही प्रभाव पडला असणार हे नक्की. पण माझ्या कृतीतून नव्हे, तर माझ्या फक्त असण्यातून. शिवाय, ती सगळ्यात धाकटी असल्यामुळे तिचा जन्म झाला तेव्हा कुटुंबातल्या सत्तेची विभागणी आधीच ठरुन गेली होती. त्यामुळे तिला जे दिसलं त्यावरुनच तिनं आपलं मत बनवलं. मला असंही वाटतं, की काही काळ तुमची बाजू घ्यावी की तुमच्या विरोधकांची याविषयी तिच्याही अंतर्मनात द्वंद निर्माण झालं असणार. एक मात्र नक्की, की त्यावेळी तुम्ही कुठेतरी कमी पडलात आणि तिला झिडकारलंत. पण शक्य असतं तर तुमची दोघांची एक छान सुसंवाद असलेली जोडी तयार झाली असती. तसं झालं असतं तर माझी एक सहकारी कमी झाली असती. पण तुम्हा दोघांच्या एकत्र येण्यामुळे ती उणीव भरुन निघाली असती. शिवाय, एका तरी मुलामध्ये संपूर्ण समाधान मिळाल्यामुळे तुमच्यात जो बदल झाला असता तो मला अनुकूल ठरला असता. अर्थात, आता हे सगळं निव्वळ स्वप्नच आहे. ओट्टलाचा तुमच्याशी काहीच संपर्क नाही आणि तिला माझ्यासारखाच तिचा मार्ग एकटीनंच शोधावा लागतोय. तिच्या आत्मविश्वास, आत्मनिष्ठा, आरोग्य आणि निष्ठुरपणा या गुणांमुळे ती माझ्याहून श्रेष्ठ ठरते आणि तुमच्या दृष्टीनं माझ्यापेक्षा जास्त दुष्ट आणि घातकी ठरते. मी हे समजू शकतो. तुमच्या दृष्टीनं ती यापेक्षा वेगळी असू शकत नाही. ती स्वतःसुद्धा तुमच्या दृष्टीनं स्वतःकडे पाहू शकते, तुमच्या त्रासाची तिला जाणीव आहे आणि ती कधी अगदी खिन्नसुद्धा होते. तिच्याकडे अधीरपणा नाही.( ते क्षेत्र माझ्यासाठी राखीव आहे) असं असलं तरी तुम्ही आम्हाला बऱ्याचदा हळू आवाजात बोलताना, हसताना एकत्र पाहिलं असेल. बऱ्याचदा आमच्या बोलण्यात तुमचा उल्लेख आलेलाही तुमच्या कानावर आला असेल. त्यातून आम्ही उद्धटपणे तुमच्याविरुद्ध काही कारस्थान करतोय असं तुम्हाला वाटलं असेल.काय पण अजब कारस्थानी माणसं आहोत आम्ही. तुम्ही आमच्या संभाषणाचा मुख्य विषय असता हे मी कबूल करतो. मला आठवतंय तेव्हापासून आमचे विचारही तुमच्याच भोवती केंद्रित झालेले असतात. पण आम्ही एकत्र येतो ते तुमच्याविरुद्ध कारस्थान करण्यासाठी नाही. आम्ही एकत्र येऊन चर्चा करतो. अगदी सर्व क्षमतेनिशी, विनोदानं आणि गांभीर्यानं, जिव्हाळ्यानं, बंडखोरपणे, रागानं, घृणेनं, शरण येऊन, अपराधीपणाच्या जाणीवेतून, आमच्या बुद्धीची आणि भावनांची सगळी ताकद एकवटून आम्ही आमच्या आणि तुमच्या मध्ये सुरु असलेल्या या भीषण खटल्याविषयी बोलतो. त्याच्या सर्व बाजू तपशीलवार तपासून पाहतो, प्रत्येक वेळी, जवळून आणि लांबून आम्ही त्या खटल्याविषयीच बोलतो. या खटल्यात तुम्ही कायम न्यायाधिशाच्या भूमिकेत असता, मात्र प्रत्यक्षात (इथे मी नैसर्गिकपणे ज्या चुका करु शकतो त्यासाठी जागा सोडतो) तुम्ही आमच्यासारखेच फिर्यादी असता, अगदी आमच्याएवढेच दुर्बल आणि वाट चुकलेले.
या सगळ्या परिस्थितीत मुलांना वाढवण्याच्या तुमच्या पद्धतीचं बोलकं उदाहरण म्हणजे इर्मा. एकीकडे ती परकी होती. तिनं मोठेपणीच तुमच्या व्यवसायात प्रवेश केला. तिचा तुमच्याशी संबंध आला तो प्रामुख्यानं मालक म्हणून. त्यामुळे तुमचा तिच्यावर फक्त अंशतः प्रभाव पडला. त्यावेळी तिची विरोध करण्याची क्षमता विकसित झालेली होती. तरीही, दुसरीकडे तिचं तुमच्याशी रक्ताचं नातही होतं.काका म्हणून तिला तुमच्याविषयी आदर होता. त्यामुळे तुमचा तिच्यावर असलेला प्रभाव फक्त मालकापेक्षा खूप जास्त होता. ती शरीरीनं अशक्त असली तरी प्रामाणिक होती. बुद्धीमान, कष्टाळू, नम्र, विश्वासू, निःस्वार्थी आणि एकनिष्ठ होती. तिचं काका म्हणून तुमच्यावर प्रेम होतं आणि मालक म्हणून तुमच्याविषयी आदर होता. तिनं आधीच्या इतर नोकऱ्यांमध्ये स्वतःला सिद्ध केलं होतं. असं सगळं असलं तरीही तुम्ही तिला एक चांगली कर्मचारी मानलं नाही. तुमचं तिच्याशी असलेलं नातं जवळजवळ तुमच्या मुलांसारखंच होतं. अर्थात, त्याला आमचाही हातभार लागला होताच. इतरांना वाकवण्याची तुमची शक्ती तिच्याबाबतीतसुद्धा इतकी अफाट होती की त्यामुळे तिच्यात विसराळूपणा निर्माण झाला. स्वभावात निष्काळजीपणा आला. थट्टा करणारा विनोद आला आणि कदाचित बंडखोरपणाची छटाही आली असावी. (बहुतेक ही वैशिष्ट्यं फक्त तुमच्याच बाबतीत निर्माण झाली असावी आणि त्याचा तिला जास्त त्रास झाला नसावा). पण तिच्यात हे सगळं आलं खरं. या सगळ्यात तिची तब्येत बरी नव्हती आणि ती इतर बाबतीतही फारशी आनंदी नव्हती किंवा तिच्यावर घरातल्या समस्यांचं ओझं होतं, या बाबी मी विचारात घेत नाहीये. तुमच्या तिच्याशी असलेल्या नात्याविषयीचं उद्बोधक सत्य मला तुमच्याच एका उद्गारातून लक्षात आलं. तो उद्गार नंतर आमच्यासाठी नमुना बनला. तो उद्गार एकाच वेळी जवळजवळ पाखंडी होता आणि लोकांशी वागण्याच्या तुमच्या पद्धतीतल्या भाबडेपणाचा उत्कृष्ट पुरावाही होता. ‘’ आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीनं माझ्यासाठी खूप पसारा मागे ठेवला.”
मी तुमचा प्रभाव आणि त्याविरुद्ध केलेला झगडा याची आणखीही उदाहरणं देऊ शकतो. पण मग मला अनिश्चित क्षेत्रात शिरावं लागेल आणि गोष्टी रचाव्या लागतील. शिवाय, तुम्ही तुमच्या व्यवसायापासून आणि कुटुंबापासून जेवढे लांब जाता, तेवढे नेहमी जास्त चांगले वागता. त्या वेळी तुमच्याशी जुळवून घेणं सोपं जातं, तुमचे शिष्टाचार सुधारतात, तुम्ही जास्त समजूतदार होता, तुमच्यात जास्त सहानुभूती येते.(अगदी तुमच्या बाह्य व्यक्तिमत्वातही). म्हणजे एखादा हुकूमशहा जेव्हा स्वतःच्या देशाबाहेर असतो, तेव्हा त्याला दडपशाही करण्याची गरज नसते आणि तो अगदी खालच्या पातळीवरच्या माणसांशीही चांगला वागतो, तसं. उदाहरणार्थ, फ्रान्त्झेन्सबादमध्ये काढलेल्या फोटोंमध्ये इतर सगळ्या उदास लोकांमध्ये तुम्ही नेहमी अगदी उंच आणि आनंदी दिसता. प्रवासात एखादा राजा दिसावा तसे. ही गोष्ट अशी आहे, की लहानपणी आम्हाला ती अनुभवायला मिळाली असती तर त्याचा आम्हा मुलांनाही फायदा झाला असता. पण ते शक्य नव्हतं. तसं झालं असतं तर मी जसा तुमच्या प्रभावाच्या सर्वात आतल्या, कठोर, घट्ट वर्तुळात सतत राहिलो, त्यातून माझी सुटका झाली असती.
तुम्ही म्हणता तशी फक्त माझी कौटुंबिक जाणीवच नष्ट झाली असं नाही. माझ्यात कुटुंबाविषयी भावना होत्या, पण बहुतांशी नकारात्मक, तुमच्यापासून दूर जाण्याच्या (ते अर्थात, कधीच पूर्णपणे शक्य नव्हतं). पण तुमच्या प्रभावामुळे कुटंबाबाहरेच्या व्यक्तींशी असेलेल्या माझ्या नात्यांवर जास्त परिणाम झाला. मी इतर लोकांसाठी जे काही करतो ते जिव्हाळा आणि निष्ठेपोटी, पण तुमच्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी मी थंडपणा आणि विश्वासघातकीपणामुळे काहीच करत नाही, असं जे तुम्हाला वाटतं ते पूर्ण चुकीचं आहे. मी हे दहाव्यांदा सांगतो: परिस्थिती वेगळी असती तरीही मी कदाचित बुजरा आणि खिन्न झालो असतो. पण तिथून मी आज जिथवर आलोय तिथपर्यंतचा रस्ता लांब आणि अंधारलेला होता.(आतापर्यंत मी या पत्रात फारशी गुप्तता बाळगली नाही, पण या पुढे काही गोष्टींची कबुली-तुम्हाला आणि मला स्वतःला- देणं माझ्यासाठी खूप अवघड असल्यामुळे मला त्यांच्याविषयी मौन बाळगावं लागेल. हे मी यासाठी सांगतोय की तुम्हाला संपूर्ण चित्र काही ठिकाणी अस्पष्ट दिसलं तरी ते पुरेश्या तपशिलांअभावी आहे असं वाटू नये; उलट काही तपशील एवढे ठळक आहेत की त्यामुळे ते चित्र बघणं असह्य ठरु शकेल. यातून मधला मार्ग काढणं सोपं नाही.) इथे तुम्हाला जुन्या दिवसांची आठवण करुन देणं पुरेसं आहे. जिथे तुमचा संबंध आला तिथे मी माझा आत्मविश्वास गमावला आणि त्याची जागा अथांग अपराधीपणाच्या भावनेनं घेतली. (या अथांगपणाविषयी मी कुणालातरी अगदी नेमकेपणानं लिहिलं होतं: “ही शरमेची भावना आपल्यापेक्षा जास्त जगेल अशी त्याला भीती वाटायची.”) इतरांबरोबर असताना एकदम बदलणं मला शक्य नव्हतं. उलट, त्यांच्या सहवासात असताना अपराधीपणाची जाणीव जास्तच तीव्र व्हायची. कारण तुम्ही तुमच्या व्यवसायात त्यांना जी वाईट वागणूक दिली, त्याची भरपाई करण्याचा माझा प्रयत्न असायचा. कारण त्या वागणुकीत माझाही वाटा असायचा. शिवाय, माझ्या ज्या व्यक्तीशी संबंध येईल तिच्याविषयी तुम्ही नेहमीच उघड किंवा छुपा आक्षेप घ्यायचात. त्याचीसुद्धा भरपाई मला करावी लागायची. आश्चर्य म्हणजे, तुम्ही माझ्या मनात घरातल्या आणि धंद्यातल्या बहुतेक लोकांविषयी जो अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलात (तुम्ही टीका करुन ज्याच्या चिंधड्या उडवल्या नाहीत असा मला महत्वाचा वाटणारा असा एक तरी माणूस तुम्हाला आठवतोय का?)
त्याचं तुम्हाला काहीच ओझं वाटत नसे ( तुम्ही ते उचलायला सक्षम होतात; शिवाय कदाचित ते तुमच्या हुकूमशाहीचं फक्त एक लहानसं चिन्ह असेल). या अविश्वासाचं (तो मला कधीच पटला नाही, कारण माझ्या अवतीभवती मला ज्यांची बरोबर करता येणार नाही एवढी चांगली माणसं दिसत होती) रुपांतर माझ्या स्वतःविषयीच्या अविश्वासात आणि सगळ्या गोष्टींविषयीच्या स्थायी भीतीमध्ये झालं. त्यावेळी मला तुमच्यापासून स्वतःची सुटका करुन घेता येणार नाही अशी माझी खात्री झाली होती. वर उल्लेख केलेल्या बाबतीत तुमची चूक होण्याचं कारण माझ्या इतर लोकांच्या संबंधाविषयी तुम्ही काहीच शिकला नाहीत. तुम्हाला अविश्वास आणि मत्सरामुळे (तुम्हाला मी आवडतो हे मी नाकारत नाहीच, नाही का?)असं वाटंल की माझ्या कौटुंबिक आनंदाच्या अभावाची भरपाई मी इतरत्र करतोय, कारण घरापासून दूर असतानाही मी तशाप्रकारे जगू शकतो हे तुम्हाला अशक्य वाटलं. गंमत म्हणजे लहानपणी माझ्या स्वतःच्या निर्णयाविषयीच्या प्रत्येक अविश्वासात मला विचित्र आनंद मिळायचा. मी नेहम स्वतःला सांगायचो, “ तू अतिशयोक्ती करतोयस. प्रत्येक तरुणासारखा तूही क्षुल्ल्क गोष्टीला मोठा अपवाद समजण्याची चूक करतोयस.” पण नंतर माझी जगण्याविषयीची समज वाढल्यावर हा आनंद मी पूर्णपणे गमावून बसलो.
ज्यू धर्मातसुद्धा मला तुमच्यापासून सुटकेचा आनंद मिळू शकला नाही. खरंतर त्यात तत्वतः सुटकेचा मार्ग सापडायला हरकत नव्हती, किंवा आपल्या दोघांनाही ज्यू धर्मात एकमेकांचा शोध लागला असता किंवा आपल्या परस्पर समन्वयाची तिथून सुरुवात झाली असती. पण तुमच्यापासून मला कोणत्या प्रकारचा ज्यू धर्म मिळाला? इतक्या वर्षांत माझे त्याकडे बघण्याचे तीन वेगवेगळे दृष्टिकोन तयार झालेत.
सिनॅगॉगमध्ये फारसं न गेल्याबद्दल, फारसे उपवास न केल्याबद्दल लहानपणी मी स्वतःला तुमच्या संदर्भात दोष द्यायचो. मला असं वाटायचं की असं केल्यामुळे मी स्वतःचं नव्हे, तर तुमचं नुकसान करतोय. मग मला अपराधीपणाची जाणीव घेरुन टाकायची. ती अर्थात नेहमी असायचीच.
तरुणपणी मला एक गोष्ट कधी समजली नाही. तुम्ही स्वतः जेमतेम ज्यू धर्माचं पालन करत असताना मी तसं करण्यासाठी प्रयत्न करत नाही (तुमच्या म्हणण्याप्रमाणे किमान श्रद्धेपोटी तरी) म्हणून तुम्ही मला दोष कसा देता? कारण तुमची धर्मनिष्ठा शून्य होती, तो एक विनोद होता किंवा अगदी विनोदही नव्हता. वर्षातून जेमतेम चार दिवस तुम्ही सिनॅगॉगमध्ये जायचात. तिथेही तुम्ही इतरांच्या तुलनेत अलिप्त असायचात. केवळ औपचारिकता म्हणून प्रार्थना संपेपर्यंत थांबायचात. तुम्ही प्रार्थनेत नेमका कोणता भाग सुरु आहे ते पुस्तकात कसं दाखवू शकता याचं मला आश्चर्य वाटायचं. एकदा सिनॅगॉगमध्ये आलो (तेच महत्वाचं) की मी कुठेही भटकायला मोकळा होतो. मग मी जांभया देत तासनतास डुलक्या काढायचो. (मला एवढा कंटाळा एरवी कधी आल्याचं आठवत नाही, फक्त नृत्य प्रशिक्षणाच्या वर्गांचा अपवाद वगळता). मी तिथेच मन रमवण्याचा प्रयत्न करायचो. पवित्र पेटी उघडली की मला नेहमी नेमबाजीच्या गॅलरीची आठवण व्हायची. तिथे नेमबाजीचं कपाट असंच उघडलं जायचं. फरक इतकाच की तिथे नेहमी काहीतरी रोचक घडायचं आणि इथे नेहमी त्याच डोकं नसलेल्या बाहुल्या दिसायच्या. शिवाय तिथे मला खूप भीती वाटायची. त्याचं कारण फक्त तिथे आलेले लोकच होते असं नाही, पण मलाही तोरा[3] वाचण्यासाठी बोलावणं येऊ शकतं असं तुम्ही एकदा सहज म्हणाला होतात. त्याची मला अनेक वर्ष भीती वाटत राहिली. हे सोडलं, तर एरवी मला माझ्या कंटाळ्यातून कोणी बाहेर काढत नसे. फक्त बार मित्झवा[4] सोडलं तर. पण त्यासाठी फक्त थोड्या पाठांतराची गरज होती. थोडक्यात, ते एखादी परीक्षा पास होण्यासारखं होतं. तुमच्यापुरतं बोलायचं झालं तर तुम्ही तोराच्या पठणामध्ये एखाद्या सामाजिक समारंभासारखे सहभागी व्हायचात. किंवा तुम्ही जेव्हा मृतांच्या शांतीप्रार्थना म्हणायला सिनॅगॉगमध्ये थांबायचात आणि मला घरी पाठवलं जायचं, तेव्हा- अर्थात, घरी पाठवलं गेल्यामुळे आणि मला त्यात फारसा रस नसल्यामुळे- तिथे काहीतरी गैरकृत्य केलं जातंय असं मला वाटायचं. तर सिनॅगॉगमध्ये अशी परिस्थिती. घरी आणखी वाईट अवस्था होती. तिथले धर्मविधी फक्त पहिल्या सेडर[5]पुरते मर्यादित असायचे. त्याचं रुपांतर नंतर फार्समध्ये व्हायचं कारण तिथे मुलांचं खिदळणं सुरु असायचं. (ते तुम्हाला कसं चालायचं? सोपं आहे. कारण त्याला तुम्हीच कारणीभूत होतात). तर माझ्यावर झालेले धार्मिक संस्कार हे असे होते. त्यात भर म्हणून एखाद्या सणाच्या दिवशी सिनॅगॉगमध्ये आलेल्या ‘’लक्षाधिशांच्या मुलांकडे’’ बोट दाखवलं जायचं. या सगळ्या संस्कारांपासून सुटका करुन घेण्याशिवाय मी आणखी काय करु शकलो असतो, हे मला कळत नाही. म्हणूनच त्यांच्यापासून सुटका करुन घेणं ही मला सगळ्यात जास्त धार्मिक कृती वाटते.
तरीही, नंतर मी या गोष्टीचा वेगळ्या प्रकारे विचार केला आणि इथेही तुम्हाला माझं वागणं दुष्ट हेतूनं प्रेरित, तुमची फसवणूक करणारं का वाटलं ते माझ्या लक्षात आलं. तुम्ही घेट्टोमधून खरोखरच ज्यू धर्माचे काही संस्कार एखाद्या गावकऱ्यासारखे बरोबर घेऊन आला होतात. त्यांचं प्रमाण जास्त नव्हतं आणि शहर आणि तुमच्या सैन्यातल्या नोकरीमुळे त्यात आणखी घट झाली. पण तरीही तुमचे संस्कार आणि तुमच्या तरुणपणीच्या आठवणी ज्यू आयुष्यासाठी पुरेशा होत्या. शिवाय तुम्हाला धार्मिक मदतीची कधी गरज भासली नाही. तुम्ही कणखर होतात. त्यामुळे धार्मिक मूल्यांचा तुमच्यावर परिणाम होण्यासारखा नव्हता, ती सामाजिक मूल्यांमध्ये मिसळलेली असली तर गोष्ट वेगळी. थोडक्यात, ज्यू समाजातल्या एका विशिष्ट वर्गाच्या कायम निर्विवाद बरोबर असण्यावरचा तुमचा विश्वास हीच तुमच्या आयुष्याला आधारभूत असलेली श्रद्धा होती. त्यांची मत तुमच्या स्वभावाला अनुकूल असल्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे तुमचा स्वतःवरचाच विश्वास होता. त्यातही ज्यू धर्माचा भाग होताच, पण मुलाकडे वारसा सोपवण्याएवढा मोठा नव्हता. तो सोपवताना सगळा वाहून गेला. तुमच्या तरुणपणीच्या आठवणी आणि दरारा आमच्याकडे सोपवण्यासारखा नव्हता. मी खिन्नपणामुळे अतिसूक्ष्म निरीक्षण करायला शिकलेला मुलगा होतो. माझ्यासाठी तुम्ही ज्यू धर्माच्या नावाखाली करत असलेली काही क्षीण कृत्यं आणि तुमची त्याविषयी असलेली बेफिकिरी याला काही गंभीर अर्थ आहे असं वाटणं अशक्य होतं. तुमच्यासाठी त्या गोष्टींना जुन्या काळातल्या आठवणींपुरता तरी अर्थ होता. म्हणूनच तुम्हाला त्या माझ्याकडे सोपवायच्या होत्या. पण त्यांना तुमच्या लेखीसुद्धा विशेष अर्थ नसल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी माझ्याकडे सोपवण्यासाठी पाठपुरावा किंवा धाकदपटशा यांचाच वापर करावा लागला. एकीकडे या प्रयत्नांना यश येणं शक्यच नव्हतं आणि दुसरीकडे तुम्हाला माझ्या जिद्दी स्वभावामुळे माझा राग यायचा. कारण यातली तुमची चूक तुम्हाला दिसत नव्हती.
या सगळ्यात जगावेगळं असं काही नाही. धार्मिक वातावरण असलेल्या गावंतून शहराकडे आलेला ज्यूंच्या या बदलत्या पिढीचा एक मोठा भाग असाच आहे. हे आपोआप घडलंय. फक्त यामुळे आपल्या आधीच ताणलेल्या नात्यातला ताण यामुळे वाढला इतकंच. तरीही तुम्हाला या बाबतीत माझ्यासारखाच तुमच्या निरपराध असण्यावर विश्वास ठेवायला हवा. हे निरपराध असणं तुम्ही तुमच्या स्वभावातून आणि त्या वेळच्या परिस्थितीच्या आधारे स्पष्ट करायला हवं. ‘आपल्याला खूप काम होतं. खूप चिंता होत्या, त्यामुळे अशा गोष्टींची चिंता करायला वेळच नव्हता’ असं सांगून उपयोग नाही. असं केल्यामुळे तुम्ही तुमचं निःसंदिग्ध निपराधित्व इतरांना अन्यायकारक रित्या दोषी ठरवून गमावता. तुमची अशी विधान केव्हाही सहज खोडून काढता येतात आणि या बाबतीत सुद्धा येतील. हा तुम्ही तुमच्या मुलांना काही शिकवण्याचा प्रश्न नाही, तर स्वतःच्या आयुष्यातून धडा घालून देण्याचा मुद्दा आहे. तुमचं ज्यू धर्माचरण सशक्त असतं, तर ते उदाहरणच आमच्यासाठी पुरेसं ठरलं असतं. हे सांगण्याचीही गरज नाही आणि हे दूषणही नाही.मी फक्त तुमची दूषणं खोडून काढतोय इतकंच. तुम्ही अलिकडे फ्रँकलिनच्या तरुणपणीच्या आठवणी वाचत होतात. ते पुस्तक मी मुद्दामच तुम्हाला वाचयला दिलं. पण ते तुम्ही उपहासानं म्हणालात तसं त्यातल्या शाकाहारावरच्या मजकुरासाठी नाही, पण त्यात दिलेल्या लेखक आणि त्याचे वडील यांच्या नात्यासाठी तसंच लेखक आणि त्याचा मुलगा यांच्या नात्यासाठीसुद्धा. कारण त्या मुलासाठीच लिहिलेल्या या आठवणींतून ही दोन्ही नाती उस्फूर्तपणे उलगडतात. मला या विषयी जास्त तपशिलात जायचं नाही.
तुमच्या अलिकडच्या वागण्यातून माझी तुमच्या ज्यू धर्माविषयीच्या या दृष्टीकोनाविषयी खात्री पटली. तेव्हा मी ज्यू धर्मात जास्त रस घेतोय असं तुम्हाला वाटलं होतं. तुम्हाला मी करत असलेल्या आणि विशेषतः मला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी तिरस्कार असल्यामुळे तसा तो याही बाबतीत असणं साहजिक होतं. पण किमान या बाबतीत तरी तुम्ही अपवाद कराल अशी माझी अपेक्षा होती. कारण शेवटी इथे तुमच्या ज्यू धर्माचा प्रश्न होता. त्याचबरोबर आपल्यात नव्या नात्याची सुरुवात व्हायची शक्यता होती. तुम्ही या गोष्टीत रस घेतला असता तर मला त्याचा संशय आला असता हे मी नाकारत नाही.
आज मागे वळून बघताना तुमच्या अलिकडच्या काही वर्षांतल्या वागण्यावरुन मला तुमच्या ज्यू धर्माविषयीच्या या दृष्टीकोनाची काहीशी खात्री पटते. त्या वेळी मी ज्यू धर्माशी संबंधित गोष्टींमध्ये जास्त रस घेतोय असं तुम्हाला वाटायचं. तुम्हाला मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आणि माझ्या रुचीविषयी तीव्र नावड असल्यामुळे ती याही बाबतीत असणं साहजिक होतं. पण तरीही या बाबतीत तुम्ही अपवाद कराल असं मला वाटलं होतं. कारण शेवटी इथे तुमच्या प्रिय ज्यू धर्माचा प्रश्न होता. शिवाय त्यात आपल्या नात्याची नवी सुरुवात होण्याची शक्यता होती. अर्थात, तुम्ही या गोष्टींमध्ये रस दाखवला असता, तर मला त्याविषयी शंका आली असती हे मी नाकारत नाही. या बाबतीत मी तुमच्यापेक्षा वरचढ आहे असं मी स्वप्नतही म्हणू शकणार नाही. पण तशी वेळच आली नाही. मी रस घेतल्यामुळे तुमच्या मनात ज्यू धर्माविषयी नावड उत्पन्न झाली आणि ज्यू लेखन अवाचनीय ठरलं; त्याचा तुम्हाला उबग यायला लागला.- याचा एक अर्थ असा होतो, की तुम्ही माझ्या लहानपणी जो ज्यू धर्म आचरणात आणत होतात, तोच तुमच्या दृष्टीनं योग्य होता. त्या पलिकडे ज्यू धर्म अस्तित्वात नव्हता. तरीही तुम्ही त्याविषयी आग्रही असणं कल्पनेपलिकडचं होतं. पण तुम्हाला आलेला “उबग” (अर्थात, तो ज्यू धर्माविषयी नसून माझ्याविषयी होता, ही गोष्ट बाजूला ठेवली तर) फक्त एवढंच सुचवतो की, अजाणता तुम्ही तुमच्या ज्यू धर्माचा आणि माझ्या ज्यू संस्कारांचा दुबळेपणा मान्य केला आणि तुम्हाला त्याची कोणत्याही प्रकारे आठवण करुन दिलेली चालत नसे. तशी आठवण करुन दिली, तर प्रतिक्रियेदाखल तुमचा निखळ तिरस्कार व्यक्त व्हायचा. गंमत म्हणजे, माझ्या ज्यू धर्माविषयी तुमची नकारात्मकता खूपच अतिशयोक्त होती. एकतर, त्यात तुमचा तिरस्कार मिसळलेला होता आणि दुसरं म्हणजे त्या नकारात्मकतेच्या विकासात तुमच्या सभोवतालच्या माणसांशी असलेलं मूलभूत नातं निर्णायक महत्वाचं होतं, माझ्या बाबतीत तर ते प्राणघातक होतं.
माझं लेखन आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला अज्ञात अश्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाटणारा तिरस्कार मला दुखवणारा ठरला. माझ्या लेखनामुळेच खरंतर मी तुमच्यापासून काही अंतर राखण्यात यशस्वी झालो होतो. गांडूळ कसं शेपटावर पाय पडला, की ते तोडून बाजूला सरकतं, तसं काहीसं. लेखनामुळे मी काही अंशी सुरक्षित होतो. काहीसा मोकळा श्वास घेण्याची शक्यता निर्माण झाली होती. माझ्या लेखनाविषयी तुम्हाला तात्काळ आणि नैसर्गिकरित्या वाटलेला तिटकारा मला काहीसा स्वागतार्हच वाटला. माझी पुस्तकं प्रकाशित झाल्यावर आलेल्या तुमच्या अपेक्षित प्रतिक्रियेनं माझा स्वाभिमान आणि महत्वाकांक्षेला धक्का बसला. बऱ्याचदा पुस्तक प्रकाशित होऊन त्याच्या प्रती घरी यायच्या तेव्हा तुम्ही पत्ते खेळत असायचात. “ते माझ्या बिछान्याशेजारच्या टेबलावर ठेव” असं तुमचं वाक्य असायचं. खरं सांगायचं तर मला ते ऐकून बरं वाटायंच. बंडखोर दुष्ट हेतूनं नव्हे, आपल्या नात्याविषयीच्या माझ्या दृष्टीकोनाची नव्यानं खात्री पटली म्हणूनही नव्हे, पण त्या बरं वाटण्यात एक उस्फूर्तपणा असायचा, कारण माझ्यासाठी त्याचा अर्थ, “आता आपण स्वतंत्र आहोत” असा असायचा. अर्थात, तो माझा भ्रम होता. मी स्वतंत्र नव्हतो, किंवा थोडं अधिक आशावादानं बोलायचं तर तेव्हा स्वतंत्र नव्हतो. माझं सगळं लेखन तुमच्याशीच संबंधित होतं. तुमच्या कुशीत शिरुन मी ज्या व्यथा व्यक्त करु शकलो नाही, त्या मी माझ्या लेखनातून व्यक्त करायचो. माझं लेखन हे तुमच्यापासून जाणीवपूर्वक दूर जाणं होतं. त्याला तुम्ही कारणीभूत ठरलात, तरीही त्याला मी दिशा दिली. पण शेवटी या सगळ्याचा परिणाम किती नगण्य झाला! हे माझ्या आयुष्यात घडलंय म्हणून मी त्याच्याविषयी बोलतो, नाहीतर त्याची दखलसुद्धा घेतली गेली नसती. या सगळ्या गोष्टीं माझ्या लहानपणी एखाद्या भाकितासारख्या माझ्या आयुष्यावर अधिकार गाजवत होत्या, नंतर त्या आशादायक वाटायला लागल्या आणि त्यानंतर त्यांनी निराशेचं रुप धारण केलं. त्यांनी तुमच्या रुपात माझ्या काही लहान निर्णयांमध्ये महत्वाची भूमिका बजावली.
उदाहरणार्थ, करीअरची निवड. हे कबूल केलं पाहिजे की या बाबतीत तुम्ही तुमच्या कनवाळू आणि उदार स्वभावानं मला पूर्ण स्वातंत्र्य दिलंत. तरीही याही बाबतीत तुम्ही ज्यू मध्यमवर्गीयांच्या मुलांशी वागण्याच्या सर्वमान्य पद्धतीनुसार वागलात. किमान तुमची वागणूक त्या मूल्यांशी जुळणारी होती. तरी शेवटी माझ्याविषयीच्या तुमच्या गैरसमजानं इथेही हस्तक्षेप केलाच. खरंतर, वैयक्तिक अभिमान, माझ्या प्रत्यक्ष आयु्ष्यविषयीची अनभिज्ञता आणि माझ्या दुबळेपणातून काढलेले निष्कर्ष यामुळे तुम्ही मला नेहमी विशेष कष्टाळू समजत आलात. तुमच्या दृष्टीनं लहानपणी मी नेहमी अभ्यास करत असायचो आणि नंतर नेहमी लिहित असायचो. याचा खरंतर वास्तवाशी दूरान्वयानंही संबंध नाही. मी थोडासाच अभ्यास केला आणि काहीच शिकलो नाही असं म्हणणं वास्तवाला जास्त धरुन होईल. एवढी वर्षं शिक्षण घेऊन माझ्या डोक्यात त्यातलं काहीतरी शिल्लक राहिलं ही काही फारशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट नाही, कारण माझी स्मरणशक्ती तशी बरी आहे आणि आकलनक्षमताही फारशी वाईट नाही. पण एकूण ज्ञान आणि ज्ञानाचा भक्कम पाया अगदीच कमकुवत आहे. विशेषतः माझं बाह्यतः सुरळीत आणि शांत आयुष्य आणि शिक्षणावर झालेला खर्च आणि त्यात गेलेला वेळ पाहता माझ्या ओळखीच्या इतर लोकांच्या तुलनेत मला हे जास्तच जाणवतं. हे दयनीय असलं तरी मी त्याची कारणं समजू शकतो. माझं आध्यात्मिक अस्तित्व ठासून व्यक्त करण्याविषयी मला असलेली भीती एवढी खोलवरची आहे की मी इतर सगळ्या गोष्टींविषयी अलिप्त असतो. आपल्या देशात शाळेतली ज्यू मुलं नेहमीच इतरांपेक्षा वेगळी असतात. त्यांच्यामध्ये अगदी अनपेक्षित गोष्टी आढळून येतात. पण माझा थंड अलिप्तपणा मी क्वचितच लपवण्याचा प्रयत्न केला. तो अलिप्तपणा मात्र अदम्य, बालिश, असहाय्य आणि अगदी हास्यापद आणि पाशवीपणे आत्मसंतुष्ट ठरावा असा होता. एका स्वयंपूर्ण पण भावनाशून्य कल्पक अशा लहान मुलाचा अलिप्तपणा. तो मला इतर कोणत्याही मुलामध्ये आढळला नाही. भीती आणि अपराधीपणाच्या भावनेला स्वतःवर मात करण्यापासून रोखण्यासाठी तो माझा एकमेव बचाव होता. त्या काळी स्वतःविषयीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या काळजीनं माझं मन व्यापलेलं असायचं. उदाहरणार्थ, स्वतःच्या आरोग्याची काळजी. ती अगदी अचानक सुरु झाली. अपचनाविषयीच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या तक्रारीं, केस गळणं, पाठीला आलेला बाक आणि अशा अनेक तक्रारींमधून ही काळजी सुरु झाली. मग तिची तीव्रता विविध टप्प्यांतून वाढत गेली. शेवटी तिची परिणती खऱ्या आजारात झाली. पण मला कशाचीच खात्री नसल्यामुळे, मला प्रत्येक क्षणाला स्वतःच्या अस्तित्वाची नव्यानं खात्री पटवून घ्यावी लागत असल्यामुळे, अगदी निःसंशय असं माझ्या ताब्यात काहीच नसल्यामुळे, निःसंदिग्धपणे फक्त मीच ठरवलेलं असं काही नसल्यामुळे (सौम्य शब्दांत सांगायचं तर मी एक वारश्यापासून बेदखल झालेला मुलगा होता) मी माझ्या अगदी जवळच्या गोष्टींविषयीसुद्धा अनिश्चित झालो. ती म्हणजे माझं शरीर. मी नुसताच वाढत गेलो. उंच आणि दुबळा. माझ्या दुबळ्या उंचीचं काय करायचं हे मला कळत नव्हतं. ते वजन माझ्यासाठी खूप जास्त होतं. त्या भाराखाली माझी पाठ वाकली. मी हालचाल करायलाही घाबरायचो. मग व्यायाम करणं दूरच. त्यामुळे मी अशक्तच राहिलो. त्यामुळे प्रत्येक चांगली गोष्ट हा मला चमत्कार वाटायचा. उदाहरणार्थ, माझी चांगली पचनक्षमता. ती मी गमावली आणि आपल्याला काहीतरी झालंय या शंकेखोरपणासाठी जणू दारच उघडलं. शेवटी लग्न करण्याच्या अतिमानवी प्रयत्नांची (त्या विषयी मी नंतर बोलेन) परिणती फुप्फुसाच्या आजारात झाली. त्यात कदाचित श्यॉनबॉर्नपॅलाईसमधल्या फ्लॅटचा मोठा वाटा असावा. तो फ्लॅट खरंतर मला फक्त लेखनासाठीच हवा होता. त्यामुळे इथे तो त्याच शीर्षकाखाली येईल. त्यामुळे हे सगळं तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे अतिरिक्त कामातून उद्भवलं नाही. मी काहीही काम न करता सोफ्यावर पडून तुम्ही आयुष्यभरात घालवला नसेल एवढा वेळ(त्यात तुमच्या आजारपणाचा काळही आला) घालवला आहे. तुम्ही अतिशय व्यग्र असताना मी तुमच्यापासून पळून माझ्या खोलीत येऊन सोफ्यावर पडून रहायचो. कामात आणि घरी मी अगदी नगण्य यश मिळवलं. ऑफिसमध्ये आळशीपणा वेगळा उठून दिसत नाही आणि भित्रेपणामुळे माझा आळशीपणा मर्यादित होता. तुम्हाला याची जाणीव असती तर तुम्ही संतापला असता. कदाचित मी मुळात आळशी नसेन, पण मला करण्यासारखं काही नव्हतंच. मी जिथे रहात होतो तिथे मला कायम नाकरण्यात आलं, दोषी ठरवण्यात आलं, ठप्प झालेल्या आयुष्याशी झगडावं लागलं. तिथून दुसऱ्या ठिकाणी निसटणं खूप दमवणारं होतं. पण त्याला काम म्हणता येणार नाही. ती अशक्यप्राय आणि काही छोटे अपवाद वगळता माझ्या क्षमतेपलिकडची गोष्ट होती.
या परिस्थितीत मला करीअरच्या निवडीचं स्वातंत्र्य देण्यात आलं. पण मला त्या स्वातंत्र्याचा उपयोग करुन घेता आला का? खरं करीअर घडवण्यासाठी माझा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास होता का? माझं स्वतःविषयीचं मूल्यांकन इतर कशाहीपेक्षा तुमच्यावर जास्त अवलंबून होतं. बाह्य यश काही काळासाठी मला बळ द्यायचं खरं, पण तेवढंच. पण तुमचं दडपण जास्त वेगानं मला खाली खेचत असे. आपण व्याकरणात पहिली इयत्ता कधीच उत्तीर्ण होऊ शकणार नाही असं मला वाटायचं, पण मला त्यात यश मिळालं, अगदी पारितोषिकसुद्धा. मग आपण जिम्नॅशियमची प्रवेश परीक्षा काही उत्तीर्ण होऊ शकत नाही असं मला वाटलं, पण मी तीही उत्तीर्ण झालो, मग मला वाटलं, आता आपण जिम्नॅशियमचं पहिलं वर्ष काही पार करु शकणार नाही, पण मी तिथेही यशस्वी झालो आणि मी पुढेही तसाच यशस्वी होत गेलो. अर्थात, त्यामुळे माझा आत्मविश्वास काही वाढला नाही. उलट मला असंच वाटत गेलं की-आणि याचा पुरावा तुमच्या चेहऱ्यावर असलेल्या तिरस्कारयुक्त भावामध्ये दिसायचा- मी जेवढं यश मिळवेन तेवढा अंतिम परिणाम अपरिहार्यतेनं वाईटच निघेल. मी मनातल्या मनात शिक्षकांच्या भीतीदायक मेळाव्याचं चित्र उभं करायचो. (जिम्नॅशियम हे फक्त एक महत्वाचं उदाहरण झालं, पण माझ्या अवतीभवती सगळं तसंच होतं). मी पहिल्या वर्षात उत्तीर्ण झाल्यावर ते सगळे कसे भेटतील, मग दुसऱ्या वर्षात उत्तीर्ण झाल्यावर कसे भेटतील, मग तिसऱ्या वर्षी आणि असंच पुढे. ते एकत्र येऊन माझ्या वैशिष्ट्यपूर्ण,अशक्यप्राय अशा उदाहरणाचा अभ्यास करतील, की हा सगळ्यात नालायक आणि सगळ्यात बेफिकीर मुलगा इथपर्यंत कसा येऊन पोहचला? मग तेव्हा सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे लागल्यामुळे ते मला बाहेर काढतील. त्या वेळी तिथे असलेले सगळे लायक विद्यार्थी या दुःस्वप्नापासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करतील. अशा कल्पनांमध्ये रमणं मुलासाठी सोपं नसतं. अशा परिस्थितीत मी माझ्या अभ्यासाचा विचार कसा करु शकत होतो? माझ्यात अभ्यासाविषयी खराखुरा रस कोण निर्माण करु शकलं असतं? त्या कोवळ्या वयात केवळ अभ्यासच नव्हे, तर माझ्या अवतीभवती असणाऱ्या सर्वच गोष्टींमध्ये मला रस होता. एखादा अपयशी बँक कारकून कसा नव्या गोष्टी समजून घेण्याच्या कल्पनेनं थरारून जातो आणि बँकेच्या लहानसहान व्यवहारांमध्येही रस घेत असतो. पण त्याला त्या व्यवहारांना एक कारकून म्हणूनच हाताळावं लागतं. महत्वाची गोष्ट आणि इतर लहान गोष्टींमध्ये मी तेव्हा अशी तुलना करायचो. तर अशाप्रकारे मला शिक्षणात यश मिळत गेलं. मग शेवटच्या वर्षाची परीक्षा येऊन ठेपली. मी त्यात उत्तीर्ण होण्यामध्ये थोडाफार कॉपी करण्याचा वाटा होता. त्यानंतर सगळं ठप्प झालं. कारण आता मी स्वतंत्र होतो. जिम्नॅशियमच्या शिस्तीला न जुमानता मी जर फक्त स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर मी किती जास्त स्वतंत्र झालो असतो. त्यामुळे मला करीअर निवडण्यासाठी स्वातंत्र्य वगैरे नव्हतं. कारण मला माहित होतं: मुख्य गोष्टीच्या तुलनेत बाकी सगळ्या गोष्टींपासून मी अगदी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विषयांएवढाच अलिप्त असणार होतो. त्यामुळे ज्या क्षेत्रात मला स्वतःचा अभिमान फारसा न दुखावता अलिप्तपणा कायम राखता येईल असं क्षेत्र मला निवडावं लागणार होतं. त्यामुळे कायद्याचं शिक्षण हा पर्याय साहजिकच होता. माझ्या अभिमानाविरुद्ध केलेल्या काही गोष्टी, उदा. पंधरा दिवसांत केलेला रसायनशास्त्राचा अभ्यास, सहा महिने केलेला जर्मनचा अभ्यास आदि गोष्टींनी माझं आधीचं मत जास्तच पक्क बनलं. त्यामुळे मी कायद्याचा अभ्यास केला.याचा अर्थ असा की परीक्षेच्या काही महिने आधी मी बौद्धिक अर्थानं सकारात्मक होतो. अर्थात, त्याचा मला खूप मानसिक त्रास झाला. कारण जो कडबा आधी हजारो लोकांनी चघळला आहे असा कडबा मी खात होतो. पण एका अर्थानं तीच माझी आवड होती, आधी मला जिम्नॅशियम आवडायचं किंवा नंतर कारकुनाची नोकरी आवडायची त्याच अर्थानं. कारण हे सर्व माझ्या परिस्थितीशी जुळणारं होतं. ते काही असलं तरी माझ्यात विलक्षण द्रष्टेपणा होता हे नक्की. लहानपणीसुद्धा अभ्यास आणि करीअरविषयी मला स्पष्ट पूर्वकल्पना होती. त्या बाजूनं मी सुटकेची अपेक्षा करत नव्हतो. तो प्रयत्न मी केव्हाच सोडून दिला होता.
मात्र, लग्नाचं महत्व आणि शक्यता या बाबतीत मी हा द्रष्टेपणा अजिबात दाखवला नाही. त्यामुळे ती माझ्या आयुष्यातली आजवरची सगळ्यात जास्त अनपेक्षित भीतीदायक गोष्ट ठरली. लहानपणी माझी वाढ एवढी मंदगतीनं झाली की या सगळ्या बाह्य गोष्टी खूप लांब होत्या. अर्थात, वेळोवेळी त्यांचा विचार करण्याची गरज उत्पन्न व्हायची.पण या बाबतीत एक स्थायी, निर्णायक आणि कडवटपणा निर्माण करणारा त्रासदायक अनुभव वाटेत उभा आहे हे मला त्यावेळी कळणं शक्य नव्हतं. प्रत्यक्षात लग्नाची योजना ही माझ्या सुटकेची सगळ्यात भव्य आणि आशादायक संधी होती. त्यामुळे त्यातलं अपयशही तेवढंच भव्य ठरलं.
या बाबतीत मला प्रत्येक प्रयत्नात अपयश आल्यामुळे हे लग्न करण्याचे प्रयत्न तुम्हाला समजावून सांगण्यातही मला अपयशच येईल अशी मला भीती आहे. तरीही या संपूर्ण पत्राचं यशापयश त्यावर अवलंबून आहे, कारण या प्रयत्नांमध्ये एकीकडे माझ्यातली सगळी सकारात्मकता एकवटलेली आहे, तर दुसरीकडे तुमच्या आम्हाला वाढवण्याच्या पद्धतीचा परिणाम म्हणून निर्माण झालेली सगळी नकारात्मकता आणि तिच्याविषयीचा संतापही एकवटलेला आहे. म्हणजे, दुबळेपणा, आत्मविश्वासाचा अभाव, अपराध-गंड हे सगळं. या गोष्टी मी आणि लग्न यामध्ये तटबंदी उभी करतात. याचं स्पष्टीकरण देणं माझ्यासाठी अवघड आहे कारण त्या विषयी विचार करण्यात एवढे दिवस आणि रात्री घालवल्या आहेत की आता त्याचा विचार मनात आला तरी मी भांबावून जातो. हे सगळं तुम्हाला सांगणं एकाच गोष्टीमुळे काहीसं सोपं झालंय, ती म्हणजे, माझ्या मते, तुमचा या बाबतीत असलेला संपूर्ण गैरमज. कारण, एवढा मोठा गैरसमज थोडासा कमी करणं मला खूप अवघड वाटत नाही.
सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्ही माझं लग्नाच्या बाबतीतलं अपयश माझ्या आयुष्यातल्या इतर अपयशांशी जोडता. त्याला माझी तशी काही हरकत नाही, फक्त तुम्ही माझ्या समग्र अपयशाची मी आधी केलेली कारणमीमांसा स्वीकारली तर मी तुमचं हे स्पष्टीकरणही स्वीकारेन. कारण लग्नातलं अपयश हेसुद्धा माझ्या इतर अपयशांच्या मालिकेचा भाग आहे. मात्र तुम्हाला ते तेवढं महत्वाचं वाटत नाही. तुम्ही त्याचं महत्व एवढं कमी लेखता, की आपण जेव्हा त्याविषयी बोलायला सुरुवात करतो, तेव्हा कालंतरानं आपण दुसऱ्याच विषयांवर बोलायला लागतो. माझ्यासाठी लग्नाचे प्रयत्न जेवढे महत्वाचे आहेत, तेवढं महत्वाचं तुमच्या आयुष्यात काहीच नसेल, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. अर्थात, तुमच्या आयुष्यात तुम्ही एवढं महत्वाचं असं काहीच अनुभवलं नसेल असं मला म्हणायचं नाही. उलट तुमचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप जास्त समृद्ध, काळजीयुक्त आणि जास्त एकाग्र होतं, पण नेमकं त्यामुळेच अशा प्रकारचं काही तुमच्या आयुष्यात घडलं नाही. समजा एक माणूस पाच पायऱ्या चढतो आणि दुसरा एक पायरी चढतो, पण ती एक पायरी त्याच्यासाठी पाच पायऱ्यांएवढीच उंच असते. पहिला माणूस त्या पाच पायऱ्या तर चढेलच, पण इतर शेकडो, हजारो पायऱ्याही चढून जाईल. त्याचं आयुष्य महान आणि तणावपूर्ण असेल. पण त्या दुसऱ्या माणसासाठी जेवढी ती पहिली उंच पायरी महत्वाची असेल तेवढी पहिल्या माणसाच्या दृष्टीनं तो चढलेल्या पायऱ्यांपैकी कोणतीही पायरी महत्वाची नसेल. कारण ती एक पायरी चढण्यासाठी त्या पहिल्या माणसाला त्याची सगळी शक्ती पणाला लावावी लागेल, तरीही ती चढणं त्याला जमेलच असं नाही, त्यामुळे ती ओलांडणं त्याच्यासाठी अशक्य असेल.
लग्न करणं, कुटुंब निर्माण करणं, जन्मणाऱ्या सगळ्या मुलांना स्वीकारणं, या असुरक्षित जगात जगण्यासाठी त्यांना आधार देणं आणि जमेल तसं मार्गदर्शन करणं हे माझ्या दृष्टीनं सर्वोच्च मानवी कार्य आहे. अनेक जण ते करतात म्हणून त्याचं महत्व कमी होत नाही. एकतर सगळेच त्यात यशस्वी होत नाहीत, आणि दुसरं म्हणजे जे यशस्वी होतात ते या गोष्टी ‘’करत’’ नाहीत, त्या “घडतात”. हे जरी खूप थोर नसलं तरी ते खूप मोठं आणि आदरणीय (कारण “करणं” आणि “घडणं” या गोष्टी एकमेकींपासून स्पष्टपणे वेगळ्या करता येत नाहीत) काम आहे. शेवटी हा थोर काम करण्याचा प्रश्न नसून त्याच्या जवळपास पोहचण्याचा आहे. सूर्याच्या मध्यभागी झेप घेणं गरजेचं नाही, तर पृथ्वीवर जिथे सूर्यप्रकाश पोहचतो असा स्वच्छ कोपरा शोधून त्या भागात खुरडत जाणं आणि ऊब मिळवणं महत्वाचं आहे.
मी या सगळ्याची तयारी कशी केली? तर शक्य तितक्या वाईट प्रकारे. मी आत्तापर्यंत जे सांगितलं त्यावरुन हे स्पष्ट झालंच असेल. माणसाची तयारी आणि सर्वसामान्य मूलभूत परिस्थितीची निर्मिती या गोष्टींचा संबंध असेल, तिथे तुम्ही फारसा हस्तक्षेप करत नाही. करुही शकत नाही. इथे वर्ग, देश आणि काळ यांच्या सर्वसामान्य लैगिक चालीरितींचा प्रश्न आहे. तुम्ही इथेही हस्तक्षेप केलात- अर्थात, जास्त नाही, कारण अशा हस्तक्षेपासाठी खूप मोठा परस्पर विश्वास लागतो आणि आपल्या दोघांमध्ये तो पूर्वीपासूनच नाही. कारण आपल्या गरज अगदी भिन्न आहेत. जी गोष्ट मला भिडते, ती तुम्हाला क्वचितच स्पर्शून जाते आणि जी तुम्हाला आवडते ती मला महत्वाची वाटत नाही. तुम्हाला जे निरागस वाटेल ती माझ्यासाठी अपराधीपणाची भावना असू शकते आणि या उलटही तेवढंच खरं आहे. ज्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही अशी गोष्ट माझ्यासाठी घातक ठरु शकते.
मला आठवतं, एकदा मी आई आणि तुमच्याबरोबर संध्याकाळी फिरायला गेलो होतो. योसेफ्जप्लाट्झमध्ये, म्हणजे आज जिथे लँडरबँक आहे तिथे. तेव्हा मी मला रोचक वाटणाऱ्या काही गोष्टींबद्दल बोलायला लागलो. मूर्खासारख्या आत्मसंतुष्ट, अभिमानी, अलिप्त (त्याविषयी शंका आहे), थंड (हे मात्र खरं आहे) पद्धतीनं आणि चाचरत. म्हणजे मी नेहमी तुमच्याशी बोलतो तसाच. माझ्याकडे लक्ष न दिल्याबद्दल मी तुम्हाला दोष देत होतो. माझ्या शाळासोबत्यांनी मला कसा आधार दिला, मला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला (इथे मात्र मी धडधडीत खोटं बोलत होतो. आपण किती धाडसी आहोत हे दाखवायची माझी ती नेहमीची पद्धत होती. माझ्या भित्रेपणाचा परिणाम. शहरी मुलांकडून घडणाऱ्या छोट्या लैंगिक चुकांचा अपवाद वगळता मला या “मोठ्या संकटांची” कल्पना नव्हती. शेवटी मी असं म्हटलं की आता मला सगळं माहित आहे. मला सल्ल्याची गरज नाही. सगळं ठीक आहे. हे सगळं बोलल्यामुळे मला आनंद मिळत होता म्हणून मी ते बोलत होतो. शिवाय त्यात उत्सुकतेचाही भाग होताच आणि मला तुम्हा दोघांवर कोणत्या ना कोणत्या बाबतीत सूड उगवायचा होता. तुमच्या स्वभावानुसार तुम्ही ते सगळं अगदी सहज स्वीकारलंत, फक्त तुम्ही असं काहीतरी म्हणालात, की या गोष्टी धोका टाळून कशा कराव्यात याबद्दल मी तुला सल्ला देऊ शकतो. कदाचित मला तुमच्याकडून हेच काढून घ्यायचं होतं. हे सगळं चांगलंचुंगलं खाल्लेल्या निष्क्रीय आणि कायम आत्ममग्न मुलाच्या लैगिक गोष्टीमध्ये रसं घेण्याशी संबंधित होतं. पण यामुळे मला इतकी शरम वाटली की मी इच्छा असूनही या विषयावर तुमच्याशी पुढे बोलू शकलो नाही आणि उद्धटपणे मी ते संभाषण तिथेच संपवलं.
तुम्ही मला तेव्हा जे उत्तर दिलंत त्याचं मूल्यमापन करणं सोपं नाही. एकीकडे त्यात धक्कादायकरित्या प्रामाणिक असं काहीतरी आहे, काहीतरी आदिम असं आणि दुसरीकडे त्यातल्या शिकवणुकीचा विचार करता, ते अतिशय आधुनिक आणि मुक्त आहे. तेव्हा माझं वय काय होतं हे आता मला नेमकं आठवत नाही, पण ते सोळाच्या वर नक्कीच नसणार. या वयाच्या मुलासाठी तुमचं उत्तर खूपच लक्षणीय होतं. आपल्या दोघांमध्ये असलेल्या दुराव्याचा आणखी एक पुरावा म्हणजे तुम्ही मला प्रत्यक्ष आयुष्याविषयी थेट असं काही तेव्हा अगदी पहिल्यांदाच सांगितलंत. त्याचा खरा अर्थ तेव्हा माझ्या मनात खोलवर उतरला, तरी तो माझ्या जाणीवेच्या पृष्ठभागावर खूप नंतर आला. तो असा: तुम्ही मला जे करायला सांगितलंत ती तुमच्या मते, आणि तेव्हा माझ्याही मते, सगळ्यात घाणेरडी गोष्ट होती. मी घरी कोणतीही घाण आणणार नाही याची काळजी घ्यावी ही तुमची इच्छा माझ्या दृष्टीनं फारशी महत्वाची नाही. कारण तुम्हाला स्वतःचं आणि स्वतःच्या घराचं रक्षण करायचं होतं. महत्वाचं हे आहे, की तुम्ही स्वतः तुमच्या सल्ल्याप्रमाणे वागला नाहीत. तुमच्यासारखा एक विवाहित, शुद्ध माणूस, या सगळ्या गोष्टींपलिकडे असलेला, त्या वेळी मला हे जास्तच तीव्रतेनं जाणवलं, कारण लग्नातही निर्लज्जपणा असतो हे मला जाणवलं होतं. त्यामुळे मला लग्न या गोष्टीविषयी मिळालेली माहिती माझ्या आईवडिलांच्या बाबतीत वापरणं माझ्यासाठी अशक्य होतं. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी जास्तच शुद्ध झालात, जास्त वरच्या पातळीवर गेलात. तुम्ही लग्नाआधी स्वतःला असाच सल्ला दिला असेल, असा विचार करणं माझ्यासाठी अशक्य होतं. त्यामुळे तुमच्या चारित्र्यावर कोणताही डाग नव्हता आणि तुम्हीच काही गोष्टी स्पष्टपणे बोलून मला या घाणीत ढकललंत, जणू ती माझी नियतीच होती. त्यामुळे जर जगात फक्त तुम्ही आणि मी दोघंच असतो (त्यावेळी माझं जग तेवढ्यापुरतंच होतं), तर जगाचं हे पावित्र्य तुमच्यासह संपुष्टात आलं. तुमच्या सल्ल्यामुळे माझ्यात वाईटाचा शिरकाव झाला. तुम्ही मला असं धिक्कारावं हे अर्थात अनाकलनीय आहे. फक्त तुमची जुनी अपराधीपणाची जाणीव आणि खोलवरचा राग हेच याचं कारण असू शकतं. त्यामुळे मी पुन्हा माझ्या आत खोलवर ओढला गेलो.
इथे पुन्हा आपल्या दोघांचं निर्दोषत्व स्पष्ट होतं. ‘अ’ हा ‘ब’ ला आपल्या जीवनदृष्टीनुसार एक प्रामाणिक सल्ला देतो. तो सल्ला खूप चांगला नसला, तरी आजही शहरात नित्याचा ठरेल असा असतो. तो सल्ला अंमलात आणला तब्येतीला असणारा संभाव्य धोका टळू शकतो. हा सल्ला ‘ब’ साठी नैतिकदृष्ट्या फारसा उत्साहवर्धक नसतो. पण मुद्दा असा की, तो हा सल्ला फेटाळून एवढ्या वर्षांत झालेलं नुकसान भरुन का काढू शकत नाही? शिवाय, त्यानं तो सल्ला अंमलात आणणं काही बंधनकारक नसतं. बरं, त्या सल्ल्यामुळे ‘ब’ चं अख्खं भविष्य कोसळून पडावं असं काही नसतं. तरीही तसं काहीतरी घडतं खरं. त्याचं कारण फक्त एकच: ‘अ’ तुम्ही असता आणि ‘ब’ मी असतो.
हे दोन्ही बाजूचं निर्दोषत्व मी चांगलं समजू शकतो तशाच प्रकारचा संघर्ष आपल्या दोघांमध्ये वीस वर्षांनंतर झाला. पण त्या वेळी परिस्थिती अगदी वेगळी होती. ती भयंकर असली, तरी आधीपेक्षा खूप कमी नुकसानकारक होती. कारण छत्तीस वर्षाच्या माझ्यात नुकसान होण्यासारखं काय शिल्लक असणार? त्या अस्वस्थ दिवसांत मी माझ्या लग्नाविषयी सांगितलं ते संभाषण मला आठवतं. तेव्हा तुम्ही मला असं काहीतरी सांगितलंत: “तिनं बहुतेक प्रागमधल्या ज्यू मुली घालतात तसला भपकेबाज ब्लाऊज घातला असेल आणि तू लगेच तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन टाकलास. तोही अगदी लवकरात लवकर. मला तुझं काही कळतच नाही. तू एक प्रौढ माणूस आहेस, शहरात राहतोस, आणि समोर येईल त्या मुलीशी लग्न ठरवून मोकळा होतोस. तुला दुसरं काही जमत नाही का? तुला भीती वाटत असेल तर मी येतो तुझ्याबरोबर तिला भेटायला.” तुम्ही हे जास्त तपशीलवार आणि जास्त मित्रत्वानं सांगितलंत. पण मला तपशील आठवत नाहीत, कदाचित माझ्या आठवणीत बऱ्याच गोष्टी धूसर झाल्या असतील. माझं त्या वेळी आईकडे जास्त लक्ष होतं, ती तुमच्याशी सहमत होती, तरी तिनं टेबलावरुन काहीतरी उचललं आणि ते घेऊन आतल्या खोलीत निघून गेली.
तुम्ही शब्दांनी माझा एवढा अपमान क्वचितच केला असेल आणि तुमचा तिरस्कार एवढा स्पष्ट क्वचित दाखवला असेल. तुम्ही वीस वर्षांपूर्वी जेव्हा माझ्याशी या प्रकारे बोललात तेव्हा तुमच्या दृष्टीकोनातून ते एका पुढारलेल्या शहरी मुलाशी केलेलं संभाषण असू शकतं. असा शहरी मुलगा ज्याला जास्त वेळ न घालवता आयुष्याशी सामना करायला तयार करायला हवं. आज हा विचार फक्त तिरस्कारात भर घालणारा ठरेल, कारण तो आयुष्याचा सामना करायला तयार असलेला मुलगा नंतर अर्ध्यातच अडकला आणि आज तो कोणत्याही अर्थानं अनुभवसमृद्ध झालेला नाही. फक्त वीस वर्षांत जास्त कीव करण्याजोगा मात्र झालाय. मी केलेली मुलीची निवड तुमच्या लेखी निरर्थक होती. तुम्ही माझी निर्णयक्षमता नेहमीच (नकळत) दाबून ठेवलीत. खरंतर निर्णयशक्तीचं मोल काय असतं याची तुम्हाला जाणीव होती. माझ्या तुमच्यापासून पळून जाण्याच्या प्रयत्नांबद्दल तुम्हाला काहीच माहित नव्हतं. थोडक्यात, तुम्हाला कशाविषयीही काहीच माहित नव्हतं. माझ्या लग्न करण्याच्या निर्णयामागची विचारप्रक्रिया तुम्हाला ठाऊक नव्हती. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल अंदाज बांधावे लागले आणि तुमचं माझ्याविषयी असलेलं सर्वसाधारण मत पाहता, तुमचे अंदाज घृणास्पद, ढोबळ आणि हास्यास्पद ठरले यात नवल नाही. तुमची मला ते अंदाज सांगण्याची पद्धतही तशीच होती. यातून तुम्ही माझ्यात उत्पन्न केलेली शरम, तुमच्या मते, या लग्नामुळे तुम्हाला वाटू शकणाऱ्या संभाव्या लाजेच्या तुलनेत नगण्य होती.
आता, उत्तरादाखल माझ्या लग्न करण्याच्या प्रयत्नाविषयी तुम्ही बरंच बोलू शकता आणि तुम्ही बोललाही आहात. माझ्या निर्णयाविषयी तुम्हाला फारसा आदर वाटण्याची शक्यता नव्हती कारण मी फेलिसशी ठरलेलं लग्न दोनदा मोडलं आणि दोनदा पुन्हा ठरवलं. तुम्हाला आणि आईला साखरपुड्यासाठी बर्लिनला दोनदा यावं लागलं. हे सगळं खरं आहे- पण ते कसं घडलं?
लग्नाच्या या दोन्ही प्रयत्नांमागे असलेला विचार पुरेसा बळकट होता: संसार थाटावा, स्वतंत्र आयुष्य जगावं असं मला वाटत होतं. ही कल्पना तुम्हाला पटणारी नव्हती. हे लहान मुलांच्या खेळासारखं होतं. त्यात नाही का, एक मूल दुसऱ्याचा हात घट्ट धरुन त्याला लांब जायला सांगत असतं. फक्त आपल्या बाबतीत तो खेळ जास्त गुंतागुंतीचा झाला कारण तुम्हाला मी लांब जावं असं खरंच मनापासून वाटायचं. पण तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाच्या ताकदीवर मला नेहमी रोखून धरायचात.
लग्नासाठी दोन्ही मुलींची निवड योगायोगानं झाली असली, तरी ती अतिशय उत्कृष्ट निवड होती. मी केवळ मुलीच्या कपड्यांवरुन एका झटक्यात तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हा पुन्हा तुमचा गैरसमज होता, कारण मी भित्रा, घाई करणारा आणि संशयी आहे असं तुम्हाला वाटायचं. दोन्ही लग्नं तशी सारासार विचारानं ठरवलेली होती, कारण पहिल्या बाबतीत माझे विचार काही वर्षं आणि दुसऱ्या बाबतीत काही महिने त्याच विषयावर केंद्रित झाले होते.
त्या मुलींनी माझा अपेक्षाभंग केला नाही. मी त्यांचा केला. मला त्यांच्याशी लग्न करायचं होतं तेव्हा माझं त्यांच्याबद्दल जे मत होतं तेच आजही आहे.
माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी आलेल्या अनुभवाचा मला दुसऱ्या लग्नाच्या वेळी विसर पडला हेही खरं नाही किंवा मी खूप घाई केली, मी निष्काळजी होतो, यातही तथ्य नाही. दोन्ही लग्नाच्या वेळी परिस्थिती पूर्ण वेगळी होती. खरंतर पहिल्या लग्नामुळेच दुसऱ्या लग्नाविषयी आशा निर्माण झाली होती. कारण ते जास्त आशादायक वाटत होतं. इथे मला तपशिलांमध्ये जायचं नाही. मग मी लग्न का केलं नाही? त्यात अर्थात अडचणी होत्या, तशा त्या नेहमीच असतात, पण शेवटी आयुष्यात अशा अडचणींना तोंड द्यावंच लागतं. त्यातली सगळ्यात महत्वाची अडचण दुर्दैवानं माझी वैयक्तिक अडचण होती, ती ही की मी मानसिकदृष्ट्या लग्न करायला असमर्थ आहे. हे यावरुनच सिद्ध होतं की मी लग्न ठरवल्यावर मला झोप ये नाही, दिवसरात्र माझं डोकं दुखायला लागतं, जगणं निरर्थक वाटायला लागतं, मी नैराश्यात बुडून जातो. हे सगळं काळजीपोटी होत नाही. हे खरं आहे की माझा संथपणा आणि लहानसहान गोष्टींची चिंता करण्याची सवय याचा या सगळ्याशी संबंध आहेच, पण या गोष्टी निर्णायक नाहीत. या गोष्टी किड्यांप्रमाणे मढं कुरतडण्याचं काम करतात, पण निर्णायक गोष्ट वेगळीच आहे. ती म्हणजे अस्वस्थपणा, अशक्तपणा, आत्मनिषेध यांचं दडपण.
मी हे जास्त तपशीलवार सांगण्याचा प्रयत्न करतो. लग्न करण्याच्या प्रयत्नात माझ्या तुमच्याशी असलेल्या नात्याच्या दोन वरवर परस्परविरुद्ध वाटणाऱ्या गोष्टी जास्त तीव्रतेनं एकत्र येतात. लग्न ही आत्ममुक्ती आणि स्वातंत्र्याची सर्वात उत्कट अशी शपथ आहे. आपलं स्वतःचं कुटुंब असणं हे माणसाचं सर्वात मोठं यश आहे आणि ते तुम्ही मीळवलेलं आहे. लग्न केलं तर आपली बरोबर होईल. सगळ्या नव्या-जुन्या शरमेच्या गोष्टी आणि तुमची हुकूमशाही इतिहासजमा होईल. सगळं कसं एखाद्या परिकथेसारखं असेल. पण तिथेच खरी मेख आहे. हे सगळं खूप जास्त आहे. एवढं की ते प्रत्यक्षात साध्य करणं अशक्य आहे. समजा एखादा माणूस कैदेत आहे. त्याला कैदेतून निसटून जायचं असेल तर ते एक वेळ शक्य होईल, पण त्याला त्याच वेळी तुरुंगाचं रुपांतर विलासी राजमहालात करायचं असेल तर ते कसं शक्य आहे. म्हणजे तो तिथून पळून गेला तर त्याला तुरुंगाचं रुपांतर करता येणार नाही आणि त्यानं ते केलं तर तो पळून जाऊ शकणार नाही. माझं तुमच्याशी असलेलं नातं दुःखदायक असताना जर मला स्वतंत्र व्हायचं असेल तर तुमच्याशी असलेले सगळे संबंध तोडावे लागतील. लग्न ही सगळ्यात मोठी गोष्ट असली आणि त्यातून सगळ्यात थोर स्वातंत्र्य मिळत असलं, तरी त्याचा तुमच्याशी अगदी जवळचा संबंध असेल. त्यामुळे या सगळ्यातून निसटण्याचा प्रयत्न वेडेपणा ठरेल आणि तशा प्रत्येक प्रयत्नाची शिक्षा ही मिळणारच.
हे जवळचं नातंच खरंतर मला लग्नाकडे आकर्षित करतं. मला लग्नानंतर आपल्यात निर्माण झालेली समानता दिसायला लागते. ही समानता तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारच्या समानतेपेक्षा जास्त चांगली कळते. लग्नानंतर सगळं छान असेल, कारण तेव्हा मी एक स्वतंत्र, कृतज्ञ, अपराधीपणाच्या जाणीवेतून मुक्त ताठ असा मुलगा असेन आणि तुम्ही चिंतामुक्त, हुकूमशहा नसलेले, माझ्याविषयी सहानुभूती असलेले समाधानी वडील असाल. पण हे घडण्यासाठी आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी नाहीश्या कराव्या लागतील. म्हणजे आपल्याला स्वतःलाच नाहीसं करावं लागेल.
पण आपला स्वभाव असा असल्यामुळे मला लग्न करता येणार नाही, कारण ते तुमच्या अधिकारक्षेत्रात येतं. कधी कधी मी अशी कल्पना करतो की जगाचा नकाशा पसरलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर आडवे पसरलेले आहात. मला असं वाटतं की त्या नकाशावरचे जे भाग तुम्ही झाकलेले नाहीत किंवा तुमच्या आवाक्यात नाहीत, तिथेच मी राहू शकतो. माझ्या मनात तुमच्या प्रचंडपणाची जी कल्पना आहे, त्यानुसार असे भाग फार नाहीत. जे आहेत ते फारसे सुखावह नाहीत आणि लग्न हा प्रदेश त्यात येत नाही.
याचा अर्थ तुम्ही स्वतःचं उदाहरण देऊन जसं मला तुमच्या व्यवसायापासून दूर केलंत तसं तुम्हाला मला लग्नापासून दूर करायचं आहे असा नाही. खरंतर याच्या अगदी उलट आहे. तुमचं लग्न हे माझ्यासाठी आदर्श लग्न आहे. सातत्य, परस्पर मदत, मुलांची संख्या या सगळ्या बाबतीत आदर्श. अगदी मुलं मोठी झाल्यावर त्यांनी शांतता भंग केली, तरीही लग्न अबाधित राहिलं. कदाचित मी या आदर्शावर माझ्या लग्नाविषयीच्या अवास्तव कल्पना उभारल्या असतील. माझी लग्न करण्याची इच्छा दुर्बल होण्यामागे इतर कारणं आहेत. त्याचा संबंध तुमच्या मुलांशी असलेल्या तुमच्या नात्याशी आहे. हे अख्खं पत्र खरंतर त्याच विषयी आहे.
आपण आपल्या आईवडिलांशी जसे वाईट वागलो, तशी एक दिवस आपली मुलं आपल्याशी वागतील या विचारामुळे काहीजणांना लग्न करायची भीती वाटते अशी एक धारणा आहे. माझ्या बाबतीत तिला फारसा अर्थ नाही. कारण माझ्या अपराधीपणाच्या भावनेचा उगम तुमच्यामध्ये आहे. त्या भावनेच्या एकमेव असण्याची मला एवढी खात्री आहे की तिची पुनरावृत्ती शक्यच नाही. ही एकमेव असण्याची जी भावना आहे तीच त्रासदायक आहे. त्याचवेळी मला माझ्यासारखा घुमा, खिन्न, कोरडा, शापित मुलगा असेल तर मला ते अजिबात सहन होणार नाही. मी अगदी असंही म्हणेन की दुसरी शक्यता नसेल तर मी त्याच्यापासून पळच काढेन. दुसरीकडे जाऊन राहीन, जसं तुम्ही माझ्या लग्नानंतर करण्याचा विचार करत होतात. कदाचित माझ्या लग्न करण्याच्या असमर्थतेवर याचा काही परिणाम झाला असावा.
या सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती माझी स्वतःविषयीची अस्वस्थता. तिचं स्वरुप काहीसं असं आहे: माझं लेखन आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मी स्वतंत्र होण्याचे, तुमच्यापासून लांब जाण्याचे काही प्रयत्न केल्याचं मी या आधी सांगितलं आहेच. अर्थात, त्यांना फारसं यश आलं नाही. येणारही नाही याची मला खात्री आहे. तरीही लेखनाकडे लक्ष देणं, लेखनाला कोणताही धोका निर्माण होऊ न देणं हे माझं कर्तव्य, किंबहुना माझ्या आयुष्याचा गाभाच आहे. लग्न ही अश्या धोक्याची शक्यता आहे. अर्थात, त्यात लेखनाला खूप मदत होण्याचीही शक्यता आहे. पण माझ्यासाठी त्यात धोक्याची शक्यता असणंच पुरेसं आहे. हा धोका प्रत्यक्षात आला तर मी काय करु ! या धोक्याच्या सांगता न येण्याजोग्या, पण नाकारताही न येण्याजोग्या सावटाखाली मी संसार कसा करु? ही शक्यता समोर आल्यावर माझी चलबिचल होईल, पण अंतिम परिणाम नक्की असेल: मी हा प्रयत्न सोडून दिला पाहिजे. हातातला एक पक्षी झाडावरच्या दोन पक्ष्यांपेक्षा चांगला- ही म्हण इथे फक्त दूरान्वयानंच लागू पडते. कारण माझ्या हातात काहीच नाहीये. झाडावर सगळं आहे. तरीही मी ‘काहीच नाही’ ची निवड केली पाहिजे. सद्यस्थिती आणि माझं आयुष्य हेच सांगतं. मी माझ्या व्यवसायाची निवड केली तेव्हाही अशीच परिस्थिती होती.
कुटुंबाचं पालनपोषण आणि मार्गदर्शन करण्यासाठी जे आवश्यक असतं, ते मी तुमच्यामध्ये पाहिलंय ही माझी मान्यता खोडून काढता न येण्यासारखी आहे. खरंतर तीच माझ्या लग्नातला सर्वात महत्वाचा अडथळा आहे. सगळ्या बऱ्यावाईट गोष्टी त्यातच एकवटलेल्या आहेत, जसं तुमच्या व्यक्तिमत्वात शक्ती आणि इतरांविषयीचा दुस्वास, आरोग्य आणि बेबंदपणा, चांगलं वक्तृत्व आणि अपुरेपणा, आत्मविश्वास आणि बाकी सगळ्यांविषयी असमाधान, अनुभवातून आलेलं शहाणपण आणि हुकूमशाही, मानवी स्वभावाचं आकलन आणि बहुतेक सगळ्यांबद्दलचा अविश्वास- हे सगळं एकवटलेलं आहे. त्यातच निर्दोष असे गुणसुद्धा आहेत. उदा. परिश्रम, सहनशीलता, हजरजबाबीपणा आणि बेडरपणा. त्या तुलनेत माझ्यात यातले कोणतेच गुण नाहीत किंवा असलेच तर अगदी कमी प्रमाणात आहेत. तुम्हालाही संसार सांभाळताना किती धडपड करावी लागली आणि मुलांच्या बाबतीत तुम्ही कसे अपयशी ठरलात हे मी पाहिलंय, त्यामुळे मी कोणत्या बळावर लग्न करण्याची जोखीम पत्करु? अर्थात, मी स्वतःला हा प्रश्न एवढ्या जास्त शब्दांत विचारलेला नाही आणि त्याचं एवढं लांबलचक उत्तरही दिलेलं नाही. नाहीतर रोजच्या निरीक्षणातून मला लग्न केलेली आणि त्याच्या दडपणाखील दबून न गेलेली तुमच्यापेक्षा वेगळी माणसं दिसली असती (जवळचं उदाहरण म्हणजे रिचर्ड काका), असं असणं ही किती मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी तेवढी पुरेशी आहे. पण मी हा प्रश्न विचारला नाही. मी तो लहानपणापासून जगत आलो. मी केवळ लग्नाच्या बाबतीत नाही, तर प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींमध्ये स्वतःला तपासून पाहिलं आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःच्या उदहारणातून आणि मुलांना वाढवण्याच्या पद्धतीतून मला माझ्या अक्षमतेची खात्री पटवून दिलीत. त्याविषयी मी आधी सांगितलं आहेच. इतर क्षुल्लक बाबींसंदर्भात तुमचं बरोबर होतं हे सिद्ध झाल्यामुळे लग्नासारख्या सर्वातं महत्वाच्या गोष्टीसंदर्भात ते सिद्ध होणारच होतं. मी लग्नाचे प्रयत्न सुरु केले तेव्हापर्यंत मी एखाद्या व्यावसायिकासारखा जगत होतो. दैनंदिन चिंतांना तोंड देत आणि भविष्यातल्या अनिष्टाची चाहून घेत. पण मी त्यांची नोंद ठेवत नव्हतो. मला कधीतरी थोडाफार नफा व्हायचा- तो दुर्मीळ असल्यामुळे मी मनातल्या मनात त्याचा आनंद घ्यायचो आणि स्वतःला तो वाढवून सांगायचो- पण एरवी मला रोज तोटा सहन करावा लागायचा. प्रत्येक गोष्टीची नोंद व्हायची, पण त्यात ताळमेळ नव्हता. पण लग्नाच्या प्रयत्नामुळे आता त्यात ताळमेळ बसवण्याची गरज निर्माण झाली. मग सगळ्या गोष्टींचा नीट ताळेबंद मांडल्यावर लक्षात आलं, की आपल्याला नफा कधी झालाच नव्हता.सगळंच एक मोठं नुकसान होतं. आता हे सगळं मनात ठेवून लग्न करण्याची वेळ आली !
तर माझं तुमच्याबरोबरचं आजवरचं आयुष्य हे असं होतं आणि त्यात भविष्याच्या अश्या शक्यता आहेत.
मला तुमच्याविषयी वाटणाऱ्या भीतीची मी देत असलेली कारणं ऐकल्यावर तुम्ही कदाचित म्हणाल : “ आपल्या नात्यातल्या समस्यांचं खापर तुझ्यावर फोडून मी स्वतःसाठी सगळं सोपं करुन घेतो असं तू म्हणतोस, पण मला असं वाटतं की तुझ्या वरवरच्या प्रयत्नांमुळे तू स्वतःसाठी आयुष्य जास्त अवघड करुन ठेवत नाहीस, तर जास्त फायदेशीर करतोस. सुरुवातीला तू सुद्धा सगळा दोष आणि त्याची जबाबदारी झटकून टाकलीस. या बाबतीत आपल्या पद्धती सारख्या आहेत. पण मी अगदी प्रामाणिकपणे सगळा दोष तुझ्यावर टाकतो, तर तू ‘जास्त हुशारीनं’ आणि ‘जास्त जिव्हाळा’ दाखवून मला सगळ्या दोषांतून मुक्तसुद्धा करतोस. अर्थात, त्यात तुला यशही येतं (तुला हवं त्याहीपेक्षा जास्त), पण माझं चारित्र्य, स्वभाव, आणि त्यातला विरोधाभास आणि असहाय्यता याविषयी तू जी शब्दांची फिरवाफिरव करतोस त्यातून मी आक्रमक असल्याचं आणि तू आत्मसंरक्षण करत असल्याचं चित्र उभं राहतं. तुझ्या अप्रामाणिकपणातून तू आतापर्यंत बरंच काही साध्य केलं आहेस. कारण तू तीन गोष्टी सिद्ध केल्या आहेस: पहिली ही, की तू दोषी नाहीस; दुसरी, सगळा दोष माझा आहे; आणि तिसरी, निव्वळ मनाच्या मोठेपणामुळे तू फक्त मला माफ करायलाच तयार झाला आहेस असं नव्हे, तर-सत्याच्या उलट- मी दोषी नाही असं मानायलाही तयार झाला आहेस. तुझ्यासाठी एवढं पुरेसं ठरावं, पण तरीही ते पुरेसं नाही. माझ्यापासून पूर्णपणे वेगळं व्हायचं तू डोक्यात घेतलं आहेस. आपली भांडणं होतात हे मी मान्य करतो, पण युद्धं दोन प्रकारची असतात. एक शूरांचं युद्ध. त्यात दोन स्वतंत्र प्रतिस्पर्धी एकमेकांची ताकद आजमावून बघतात. त्यात प्रत्येक जण स्वतंत्र असतो. तो स्वतःच्या बळावर जिंकतो किंवा हरतो. दुसरं असतं उंदीर-घुशींचं युद्धं. ते एकमेकांना फक्त दंशच करत नाहीत, तर स्वतः जिवंत राहण्यासाठी एकमेकांचं रक्तही शोषतात. खरा व्यावसायिक योद्धा असाच असतो आणि तू तसाच आहेस. तू जगायला नालायक आहेस; चिंता आणि आत्मदूषण यापासून मुक्त असं आरामदायक आयुष्य स्वतःसाठी उभं करायला नालायक आहेस. मी तुझा निरोगीपणा तुझ्यापासून हिरावून घेतला आणि स्वतःच्या खिशात टाकला हे तू सिद्ध केलंस. सगळा दोष जर माझा असेल, तर आपण जगायला नालायक आहोत याचा तुला त्रास का व्हावा? कारण तू तर आरामात पसरुन मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या माझ्याकडून स्वतःची रखडपट्टी होऊ देतोयस. उदाहरणार्थ: अलिकडे तू लग्न करण्याचा निर्णय घेतलास, पण त्याचवेळी तुला लग्न करायचंही नव्हतं- आणि हे तू या पत्रात कबूल केलं आहेस- पण यात तुला स्वतःला त्रास करुन घ्यायचा नसल्यामुळे मी तुला लग्न न करण्यात मदत करावी अशी तुझी इच्छा होती, कारण या लग्नामुळे माझ्या लौकिकाला ‘काळिमा’ लागेल अशी भीती तुला वाटत होती. मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे इतर गोष्टींप्रमाणे याही बाबतीत मला तुझ्या आनंदातला अडथळा कधीच व्हायचं नव्हतं आणि दुसरं म्हणजे मला स्वतःच्या मुलाकडून अशी दूषणं ऐकायची नव्हती. पण ज्या आत्मसंयमानं मी लग्नाचा निर्णय तुझ्यावर सोडला, त्याचा काही फायदा झाला का? अजिबात नाही. माझा तुझ्या लग्नाला विरोध असला, तरी त्यामुळे ते थांबलं नसतं, उलट त्यामुळे तुला त्या मुलीशी लग्न करायला जास्तच प्रोत्साहन मिळालं असतं. कारण तुझ्या दृष्टीनं तुझा ‘ सुटकेचा प्रयत्न’ यश्स्वी ठरला असता. मी तुझ्या लग्नाला होकार देऊनही तुझी दूषणं थांबली नाहीत, कारण तुझ्या लग्न न करण्याला मीच जबाबदार आहे हे तू सिद्ध केलंच आहेस. खरंतर, या आणि इतर उदाहरणांतून माझंच म्हणणं योग्य होतं हे तू सिद्ध केलं आहेस, पण यातून एक विशेष खरा असा आरोप गाळला गेला आहे: तो म्हणजे अप्रामाणिकपणाचा, अतिआज्ञाधारकपणाचा आणि परोपजीवी असण्याचा. मला तर असं वाटतं की या पत्रातूनही तू माझी फसवणूकच करतो आहेस.”
याला माझं उत्तर असं की हे प्रत्युत्तर – ते काही अंशी तुमच्या विरुद्धही वापरता येऊ शकेल- तुम्ही दिलेलं नसून ते मीच दिलेलं आहे. तुमचा इतरांविषयीचा अविश्वास माझ्या स्वतःविषयीच्या अविश्वासाएवढा मोठा नक्कीच नाही आणि तो तुम्हीच माझ्यात निर्माण केलेला आहे. या प्रत्युत्तराचं काही अंशी बरोबर असणं मी नाकारत नाही. ते आपल्या नात्याच्या वैशिष्ट्यांमध्ये नव्या सामग्रीची भर घालणारंच आहे. माझ्या पत्रातल्या पुराव्याप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यातल्या गोष्टी अशा व्यवस्थित आपापल्या जागी बसत नाहीत हे उघड आहे. आयुष्य एखाद्या चिनी कोड्यापेक्षा खूप व्यापक असतं. पण या प्रत्युत्तरामार्फत केलेल्या सुधारणेमुळे-तिच्याविषयी मी जास्त काही सांगणार नाही आणि सांगूही शकत नाही- काहीतरी निश्चित साध्य झालंय, ते सत्याच्या एवढं जवळ जाणारं आहे की त्यामुळे आपल्या दोघांनाही थोडा दिलासा मिळेल आणि आपलं जगणं आणि मरण सुसह्य होईल.
[1] एली काफ्का- काफ्काची मोठी बहीण
[2] Assecurazioni Generali- विख्यात इटालियन विमा कंपनी
[3] तोरा- हिब्रू बायबलच्या पहिल्या पाच भागांचा ग्रंथ
[4] बार मित्झवा- ज्यू धर्मात मुलगा तेरा वर्षाचा झाल्यावर करायचा धार्मिक विधी